

डॉ. दीपक शिकारपूर
फिफा विश्वचषक २०२६ मध्ये मैदानावर खेळाडू गोलसाठी झुंज देत असताना, पडद्यामागे पंचगिरीपासून प्रसारणापर्यंत आणि खेळाडूंच्या तंदुरुस्तीपासून चाहत्यांच्या अनुभवापर्यंत, ‘एआय’ने फुटबॉलला नव्या युगात प्रवेश करून दिला आहे.
फिफा विश्वचषक २०२६ ची रंगत आता शिगेला पोहोचली आहे. फुटबॉल हा परंपरेने भावनांचा, अनपेक्षित क्षणांचा आणि मानवी कौशल्याचा खेळ मानला जातो. मात्र, यंदा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ तथा ‘एआय’ने या खेळाच्या प्रत्येक पैलूमध्ये अक्षरशः क्रांती घडवून आणली आहे आणि त्याचा प्रभाव किती सखोल आहे, हे आता जगाला दिसत आहे.
पंचांची अचूकता
फुटबॉलमध्ये पंचांचा एक चुकीचा निर्णय संपूर्ण सामन्याचे चित्र आणि चाहत्यांच्या भावना बदलू शकतो. या विश्वचषकात मानवी चुकांना फाटा दिला आहे. एआयच्या मदतीने ‘सेमी-ऑटोमेटेड ऑफसाईड टेक्नॉलॉजी’ आता तिच्या सर्वोच्च शिखरावर आहे. स्टेडियमच्या छताखाली बसवलेले अत्याधुनिक डझनभर ट्रॅकिंग कॅमेरे आणि प्रत्यक्ष चेंडूच्या आत स्थिरावलेली ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स मायक्रोचिप’ प्रति सेकंद शेकडो वेळा पोझिशनल डेटा पाठवते. प्रत्येक खेळाडूच्या शरीरावरील २९ वेगळ्या अंगांचे रिअल-टाईम ट्रॅकिंग करून ऑफसाईडचा निर्णय केवळ काही मि.लि. सेकंदात घेतला जात आहे. पूर्वी व्हिडीओ असिस्टंट रेफरीमुळे निर्णय घेण्यासाठी खेळ अनेक मिनिटे थांबवावा लागायचा; आता एआयमुळे हे निर्णय अत्यंत वेगाने आणि १०० टक्के अचूकतेने होत आहेत.
खेळाडूंची ‘प्रेडिक्टिव्ह’ कामगिरी
एआयचा सर्वात मोठा फायदा संघांच्या व्यवस्थापनाला आणि प्रशिक्षकांना होत आहे. प्रत्येक संघाकडे आता स्वतःचे प्रगत एआय मॉडेल्स आहेत. खेळाडूच्या धावण्याचा वेग, पोझिशनिंग, स्नायूंवरील ताण आणि हृदयगती या सर्वांचे रिअल-टाईम विश्लेषण एआयद्वारे केले जात आहे. हे तंत्रज्ञान एवढे प्रगत झाले आहे की, एखाद्या खेळाडूच्या हालचालीतील सूक्ष्म बदल ओळखून एआय प्रशिक्षकांना आधीच चेतावणी देते की, ‘सध्याच्या ताणानुसार या खेळाडूला पुढील पंधरा मिनिटांत गंभीर दुखापत (उदा., हॅमस्ट्रिंग) होण्याची शक्यता ९० टक्के आहे.’ अशावेळी प्रशिक्षक तातडीने सबस्टिट्यूट खेळाडू मैदानात उतरवू शकतात. याशिवाय, प्रतिस्पर्धी संघाच्या त्रुटी शोधून काढण्याचे आणि त्या आधारावर ‘टॅक्टिकल फॉर्मेशन’ सुचवण्याचे काम एआय क्षणार्धात करत आहे.
४८ संघ आणि लाखो चाहते, यामुळे गर्दीचे व्यवस्थापन हे महाकाय आव्हान आहे. स्टेडियम परिसरातील ‘स्मार्ट क्राऊड मॅनेजमेंट सिस्टीम’ गर्दीचा प्रवाह सुरक्षितपणे नियंत्रित करण्यासाठी एआयचा वापर करत आहे. ‘फेशियल रेकग्निशन’ आणि स्मार्ट तिकिटिंगमुळे रांगा नाहीशा झाल्या आहेत. एआयआधारित ॲप्स चाहत्यांना ‘तुमच्या सीटपर्यंत पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता’ इथपासून ते ‘कोणत्या फूड स्टॉलवर सर्वात कमी गर्दी आहे’ इथपर्यंतची माहिती रिअल-टाईम देतात. घरी बसून डिजिटल प्लॅटफॉर्मवर सामना पाहणाऱ्या चाहत्यांसाठी ‘पर्सनलाईज्ड व्ह्युईंग’चा अनुभव एआयने शक्य केला आहे. एखाद्या चाहत्याला विशिष्ट कोनातून गोल पाहायचा असेल, तर ‘एआय त्वरित तो कॅमेरा अँगल तयार करून देते.
प्रसारणात एआय जनरेटेड कंटेंटचा मोठा प्रभाव दिसून येत आहे. मैदानातील अनेक कॅमेरे आता ऑपरेटरशिवाय चालतात; एआय या कॅमेऱ्यांना मुख्य कृती आणि चेंडूच्या गतीनुसार आपोआप चालवते. दुसरी मोठी क्रांती कॉमेंटरीमध्ये झाली आहे. एआयमुळे ‘रिअल-टाईम ऑडिओ ट्रान्सलेशन’ शक्य झाले असून, इंग्रजी कॉमेंटरी जगातील कोणत्याही स्थानिक भाषेत (अगदी मराठीतही) त्याच भावना आणि आवाजाच्या जोशासह ऐकायला मिळते. सामना संपल्यानंतर अवघ्या काही सेकंदात सामन्यातील सर्वोत्कृष्ट क्षणांचे अचूक संपादन माणसांऐवजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपोआप करते आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जगभर प्रसारित करते. एआय खेळाचा एक अविभाज्य आणि निर्णायक भाग बनले आहे. याने खेळाडूंचे करिअर सुरक्षित केले आहे, पंचांवरचा अनावश्यक ताण दूर केला आहे आणि जगभरातील अब्जावधी चाहत्यांचा रोमहर्षक अनुभव एका नव्या शिखरावर नेऊन ठेवला आहे.