

कधीकाळी जेमतेम तीस ते चाळीस हजार रुपये तोळा असणारे सोने आता चक्क एक लाखांच्या वर जाऊन पोहोचलेले आहे. सोने खरेदी करणे ही सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट होत चालली आहे. गुंजभर म्हणजे काही मिलीग्राम सोने खरेदी करायचे असेल तरी हजारो रुपये लागत आहेत. आपल्या देशातील स्त्रियांना सोन्याच्या दागिन्यांची भलतीच आवड आहे. अर्थात बेभरवशाच्या शेअर मार्केटपेक्षा सोन्यामधील गुंतवणूक सुरक्षित समजली जाते. मंगळसूत्र, पाटल्या, बांगड्या इत्यादी दागिन्यांना स्त्री धन असे म्हटले जाते. या स्त्रीधनाच्या किमती वाढल्यापासून मात्र नवीनच वाद उद्भवण्यास सुरुवात झाली आहे.
विवाह झाल्यानंतर पती-पत्नीचा संसार समंजसपणे चालावा असे अपेक्षित असते. एकमेकांमध्ये वाद असले तरी पती-पत्नी त्यावर पांघरूण घालत संसार पुढे ओढत असतात. आजच्या आधुनिक काळात सर्वत्र असे होईलच असे काही नाही. स्त्रिया स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यानंतर त्यांच्याही आकांक्षांना अंकुर फुटण्यास सुरुवात झाली आहे. पती बरोबर जमत नसेल तर सर्रास घटस्फोट घेतले जात आहेत. संसार म्हटले की भांड्याला भांडे लागतच असते. आजकाल वाद इतके विकोपाला जात आहेत की घटस्फोटापर्यंत टोकाची पायरी घातली जाते. घटस्फोटाच्या वेळी सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो स्त्रीधनाचा. नावातच अर्थ स्पष्ट असल्यामुळे कायद्याने स्त्री धनावर हक्क पत्नीचा असतो मात्र सोन्याचे भाव वाढून एक लाखांच्या वर गेल्याने स्त्रीधनावरून कौटुंबिक न्यायालयामध्ये पती-पत्नीमध्ये वाद होत आहेत.
घर तुटताना तुझे आणि माझे होत असते. असे स्वतंत्र होताना पत्नीकडून लग्न समारंभाच्या आधी मिळालेल्या भेटवस्तू, लग्नाच्या वेळी मिळालेल्या भेटवस्तू, प्रेमाने दिलेल्या सर्व प्रकारच्या भेटवस्तू, वधूचे आई-वडील आणि भावाकडून मिळालेल्या सर्व वस्तू यांची जोरदार मागणी होत आहे. घटस्फोट ठरल्यानंतर कोणत्या वस्तू कोणाच्या आहेत हे ठरवणे अत्यंत महत्त्वाचे असते. पतीच्या ताब्यातून आपले दागिने व वस्तू परत मिळण्यासाठी महिला वर्गाकडून छायाचित्रे, व्हिडीओ फुटेज, भेटवस्तूच्या याद्या व बिले आदींची माहिती न्यायालयासमोर सादर करण्याकडे कल दिसून येत आहे. या सर्वांचे कारण म्हणजे सोन्याच्या दरात झालेली वाढ हेच आहे. पोटगी किंवा मालमत्ते ऐवजी स्त्रीधन परत मिळवण्यासाठी महिला वर्गाने अर्जाचा सपाटा लावला आहे.
महिलावर्ग असे करत असेल तर पुरुष मागे कसे राहतील? घरातून निघून जाताना पत्नी सर्व काही घेऊन गेल्याचे सांगत पती मंडळींनी पण अर्जाचा रेटा लावला आहे. काही जणांनी तर पत्नी स्वतःची दागिने तर घेऊन गेलीच पण आपल्या आईचे पण दागिने घेऊन गेली, असा आरोप केला आहे. एकेकाळी मजबूत असलेली भारताची कुटुंब व्यवस्था सध्या कमकुवत झाल्यासारखे दिसत आहे.