

चायनाचे काहीही भारतामध्ये आले तर पहिल्यांदा ते डुप्लिकेट समजले जाते. चायनीज वस्तू असोत, घड्याळे असोत किंवा चायनीज खेळणी असोत, ती किती काळ चालतील याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. चले तो शाम तक, नही तो जहान तक म्हणजेच त्याची कुठलीही खात्री दिली जात नाही. चायनीज पदार्थ मात्र आज भारतामध्ये सर्वत्र अगदी खेडोपाडीसुद्धा मिळतात. गोबी मंच्युरियन हा चायनीज पदार्थ भारतामध्ये चांगल्यापैकी लोकप्रिय झाला आहे.
गोव्यातील म्हापसा आणि वास्को येथील नगरपरिषदांनी गोबी मंच्युरियनवर बंदी घातली आहे. आता तुम्ही म्हणाल, यात बंदी घालण्यासारखे काय आहे? या नगरपरिषदांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये चायनीज पदार्थांच्या गाड्यांभोवती प्रचंड अस्वच्छता आढळून आली, त्याचबरोबर या मंच्युरियनमध्ये फार मोठ्या प्रमाणावर कृत्रिम रंगांचा वापर केला गेला असल्याचे दिसून आले आहे. आपल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी म्हणून या नगरपरिषदांनी या पदार्थांवर बंदी घातली, याचे स्वागतच व्हायला पाहिजे.
चायनीज पदार्थ हे मुळात भारतीय लोकांना तसे फारसे आवडणारे नाहीत, कारण त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर विनेगार वापरले जाते आणि त्याची तुरट चव भारतीय लोकांना आवडण्याची अजिबात शक्यता नव्हती; पण म्हणतात ना, खाऊन खाऊन हळूहळू ते पदार्थ आवडायला सुरुवात होते, तसेच चायनीज पदार्थांचे झाले आहे. साहजिकच तरुणवर्ग चायनीज खाण्याला सरावला आणि जागोजागी चायनीज खाद्यपदार्थांचे गाडे, हॉटेल्स येण्यास सुरुवात झाली. अगदी मोठ्या हॉटेलमध्येही स्टार्टर म्हणून चायनीज पदार्थ मागवले जातात.
खरे सांगायचे तर आपण आज काय खातोय, हेच कळत नाही. पूर्वी लोणची घरोघरी तयार केली जायची. महिलावर्ग भरपूर श्रम करून पापड, शेवया, कुरवड्या, पापड्या घरी तयार करायचा. कुटुंबाला चविष्ट आणि पौष्टिक खायला मिळावे यासाठी भारतीय घराघरांमध्ये असंख्य पदार्थ तयार केले जायचे. उन्हाळ्याच्या दिवसांत वाळवण नावाचा प्रकार असायचा. म्हणजे आपल्या घराच्या अंगणात कडक उन्हात कुरवड्या, पापड्या आणि तत्सम पदार्थ वाळवून ते वर्षभर वापरले जायचे. आता लोणची घरी तयार करण्याच्या फंदात कोणी पडत नाही. कुठलाही सोशल मीडिया उघडला की, तुमच्यापुढे अशा सगळ्या पदार्थांच्या जाहिराती यायला सुरुवात होते. विविध प्रकारची चव आणि विविध प्रकारची लोणची घरपोच येत असतील तर ती घरी कोण तयार करेल?
चटण्यासुद्धा घरी तयार केल्या जात असत. शेंगदाण्याची चटणी, कारळ्याची चटणी, जवसाची चटणी, खोबर्याची चटणी अशा असंख्य प्रकारच्या चटण्या घरोघरी तयार केल्या जात असत. आता हे सर्व आकर्षक पॅकिंगमध्ये तुमच्या घरी येते. त्यात नेमके काय टाकलेले आहे किंवा कुठले कृत्रिम रंग टाकले आहेत, हे कळायला मार्ग नसतो आणि त्याचे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होत आहेत, याची आपल्याला जाणीव नसते. असाच काहीसा प्रकार चायनीज पदार्थांबद्दल गोव्यात घडला व या दोन नगरपरिषदांनी गोबी मंच्युरियनवर बंदी घातली. झटपट तयार केलेेले उत्तम चवीचे व आकर्षक रंगाचे गोबी मंच्युरियन तुमच्यासमोर येत असले तरी त्यात नेमके काय आहे, याची खातारजमा केल्याशिवाय खाणे बरोबर नाही.