वाढत्या लष्करीकरणाला जर्मनीत तरुणांचा विरोध

Youth Protest
वाढत्या लष्करीकरणाला जर्मनीत तरुणांचा विरोध
Published on: 
Updated on: 

- सचिन पाटील

जर्मनीमध्ये लष्करी भरतीच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. १ जानेवारी २०२६ पासून लागू झालेल्या नवीन लष्करी कायद्यामुळे देशभरातील १८ वर्षीय तरुणांना लष्करी नोंदणी पत्रे पाठवली जात आहेत. या निर्णयामागे युरोपमधील बदललेली भूराजकीय परिस्थिती आणि रशियाचा संभाव्य धोका ही प्रमुख कारणे आहेत; मात्र जर्मनीतील तरुण पिढीने या लष्करीकरणाला विरोध दर्शवला आहे. आम्हाला आमचे करिअर निवडू द्या, अशी तरुणांची संतप्त भावना आहे. लष्कराने तरुणांना पाठविलेल्या प्रश्नावलीत आजार, उंची, वजन आणि खेळाची आवड यांसारखे अनिवार्य प्रश्न होते, तर ड्रायव्हिंग लायसन्स आणि भाषांचे ज्ञान यांसारखे ऐच्छिक प्रश्नही विचारण्यात आले होते.

ज्यामध्ये माहिती न भरल्यास २५० युरो दंड आकारण्याचा इशारा देण्यात आला आहे. ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत जर्मनीतील तरुणांना सुमारे ६ लाख नोंदणी पत्रे पाठवण्यात आली आहेत. यामध्ये २,८६,८०० पत्रे तरुण मुलांना, तर २,७१,७०० पत्रे मुली आणि तृतीयपंथियांना पाठवण्यात आली आहेत. सध्या हा फॉर्म भरणे केवळ तरुण पुरुषांसाठीच अनिवार्य आहे.

२०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर जर्मनीने आपल्या संरक्षण धोरणात मोठे बदल केले आहेत. या वर्षाच्या १ जानेवारीपासून जर्मनीत लष्करी सेवा आधुनिकीकरण कायदा लागू झाला आहे. २०३० च्या मध्यापर्यंत पूर्णवेळ सैनिकांची संख्या २,६०,००० पर्यंत नेणे आणि २,००,००० राखीव सैनिक तयार करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. पुरेसे सैनिक न मिळाल्यास किंवा सुरक्षा परिस्थिती बिघडल्यास संसद पुन्हा सक्तीची लष्करी भरती लागू करू शकते. संरक्षण मंत्रालय याबाबत सारवासारव करत असून त्यांच्या मते, सरकारच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ऑक्टोबर २०२६ पर्यंत सैन्यातील कर्मचाऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ६,४०० ने वाढली असून, सरकारने निश्चित केलेले उद्दिष्ट ओलांडले आहे. दुसरीकडे शाळांची दुरवस्था होत असल्याची तक्रार विद्यार्थी करत आहेत. २०२७ च्या मसुदा अर्थसंकल्पानुसार संरक्षण खर्च ८२.७ अब्ज युरोवरून वाढवून १०९.७ अब्ज युरो करण्याचा प्रस्ताव आहे. याउलट, शिक्षण आणि कुटुंब मंत्रालयाचे बजेट गेल्या वर्षीच्या १६.६ अब्ज युरोवरून कमी होऊन १५.९ अब्ज युरो राहण्याचा अंदाज आहे. जर्मनीतील तरुणही महागाई, राहणीमानाचा वाढता खर्च, हवामान बदल, आर्थिक असमानता आणि उजव्या विचारसरणीचा वाढता प्रभाव यांमुळे चिंतेत आहेत. विद्यार्थी संघटनांच्या नेतृत्वाखाली ४० हून अधिक शहरांमध्ये मोर्चे काढले जात आहेत.

२०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यात युरोपची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली आहे. या दशकाच्या अखेरीस रशिया नाटो देशांसमोर लष्करी आव्हान उभे करू शकतो, असा इशारा जर्मन अधिकाऱ्यांनी दिला आहे.

नाटोच्या सामूहिक सुरक्षा उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी जर्मनीला आपल्या सैन्याची क्षमता वाढवणे बंधनकारक आहे. सुरक्षेसाठी अमेरिकेवर पूर्णपणे अवलंबून न राहता युरोपियन देशांनी स्वतःचे संरक्षण सामर्थ्य वाढवले पाहिजे, या विचारातून जर्मनीत लष्करी सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रीय सुरक्षेची गरज आणि तरुणांचे वैयक्तिक स्वातंत्र्य यांचा समतोल जर्मन सरकार कसा साधते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.