जीबीएस : बरा होणारा आजार

GBS: हा एक प्रकारे ऑटो इम्युन स्वरूपाचा आजार
GBS
जीबीएस : बरा होणारा आजारpudhari photo
Published on
Updated on
प्रा. डॉ. मिलिंद भोई, वैद्यकीय तज्ज्ञ

गुलियन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचा किंवा सिंड्रोमचा शोध फ्रेंच न्युरॉलॉजिस्ट जॉर्जेस गुलियन आणि जेन अलेक्झांडर बॅरे यांनी 1916 मध्ये लावला. त्यांच्या नावामुळे या सिंड्रोमचे नाव गुलियन बॅरे सिंड्रोम असे पडले. या आजारामध्ये माणसाची स्वतःची प्रतिकारशक्ती स्वतःच्या चेता संस्थेवर हल्ला चढवते आणि शरीरातील नसा आणि स्नायू यांचे कार्य त्यामुळे बाधित होते. म्हणजेच हा एक प्रकारे ऑटो इम्युन स्वरूपाचा आजार आहे.

जीबीएस हा आजार अचानक एखाद्याला का होतो, याचे अजून ठाम स्वरूपाचे उत्तर सापडलेले नाही; पण असे लक्षात आले आहे की, बरेचदा एखादा विषाणू संसर्ग झाल्यानंतर काही वेळेला लसीकरणानंतर किंवा एखादी मोठी शस्त्रक्रिया झालेली असते अशा वेळेला हा आजार उद्भवतो. अशा वेळेला शरीराची स्वतःची प्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात रिअ‍ॅक्ट होते. कधी कधी काही रुग्णांमध्ये याचे निदान पटकन होत नाही.

एखादा रुग्ण पायामध्ये अशक्तपणा वाटत आहे किंवा संवेदना कमी झालेल्या आहेत म्हणून डॉक्टरांकडे येतो. अशा वेळेला त्या रुग्णांमध्ये हा आजार असेल याचा पटकन अंदाज येत नाही. परिणामी, अन्य कारणांचा विचार केला जातो; पण कालांतराने पायामधील संवेदना कमी होणे तसेच ताकद कमी होणे, उभे राहण्यासाठी-चालण्यासाठी पायात जीव न राहणे अशी लक्षणे दिसू लागल्यानंतर या आजाराचा संशय येतो. हे रुग्ण सुरुवातीला कमी न होणारा ताप, ज्याचे नक्की निदान होत नाही असे लक्षण घेऊन येतात आणि नंतर या रुग्णांमध्ये मज्जासंस्था (नर्व्हस सिस्टीम रिलेटेड विकनेस) आणि इतर लक्षणे दिसू लागतात. काही रुग्णांमध्ये श्वसनाचे स्नायू दुर्बल होऊ लागतात. परिणामी, रुग्णाला स्वतःहून श्वास घेता येत नाही आणि मग त्याला श्वसनासाठी व्हेंटिलेटरची गरज भासू लागते.

जीबीएस हा दुर्मीळ परंतु बरा होणारा आजार आहे. या आजारात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती, नसा कमजोर करते. यामुळे हातपाय, मान, डोळे आणि चेहरा यावर परिणाम होतो. शरीरामध्ये बधिरता येते. गंभीर प्रकरणांमध्ये चालता येत नाही, श्वास घेता किंवा गिळता येत नाही. हा आजार अचानक सुरू होतो आणि चार आठवड्यांत वाढतो. काही जणांमध्ये आजार लवकर बळावतो, तर काहींमध्ये हळूहळू वाढतो. गंभीर प्रकरणांमध्ये आयसीयू व व्हेंटिलेटरची गरज भासते. उपचारांसाठी आयव्हीआयजी इंजेक्शन किंवा प्लाझ्मा एक्स्चेंज केला जातो. दूषित अन्न किंवा पाणी घेतल्यामुळे कॅम्पिलोबॅक्टर विषाणू संसर्ग होतो. यामुळे जुलाब आणि पोटदुखी होऊ शकते. काही जणांमध्ये या संसर्गामुळे प्रतिकारशक्ती कमी होते. डेंग्यू, चिकुनगुनिया आणि इतर संसर्गदेखील याला कारणीभूत ठरू शकतात. जुलाब (रक्तासह होऊ शकतो), पोटदुखी, ताप, मळमळ किंवा उलट्या अशी याची लक्षणे आहेत.

नेहमी पाणी उकळून प्या. सकस व ताजे अन्न घ्या. भाज्या व फळे स्वछ धुऊन घ्या. चिकन, मासे चांगले शिजवून घ्या (75 अंश सेल्सिअस तापमानाला). अर्धवट शिजलेले अन्न व कच्चे अंडे खाणे टाळा. जेवणापूर्वी आणि टॉयलेटनंतर हात साबणाने स्वछ धुवा. दुसर्‍यांसोबत भांडी वा अन्न वाटून खाणे टाळा. किचन स्वच्छ ठेवा. कच्चे व शिजलेले अन्न वेगवेगळे ठेवा. स्वयंपाकघर व भांडी स्वच्छ ठेवा. हा आजार सामान्यतः दुर्मीळ आहे; पण अलीकडील काही दिवसांत पुण्यातील सिंहगड रोड भागात याची प्रकरणे वाढली आहेत. अशा स्थितीत सुरुवातीला जाणवणारी लक्षणे ओळखणे महत्त्वाचे आहे. अतिसार किंवा खोकला येणे, पाय किंवा हातात अचानक अशक्तपणा जाणवणे, चालता न येणे किंवा शरीर बधिर होणे, रक्तासह अतिसार होणे अशी लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू नका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news