

ज्या देशांत, समाजात नदी, पर्वतरांगा या वंदनीय, पूजनीय नाहीत तेथे मात्र त्यांच्या उगमस्थानाचे, काठाचे पावित्र्य जपण्यात आले असून स्वच्छता, नितळ सौंदर्यही अबाधित राखण्यात आले आहे. आम्ही मात्र नद्यांचे-पर्वतांचे मारेकरी आहोत. नर्मदा असो किंवा कृष्णा, गंगा किंवा यमुना नदी या नद्या श्रद्धास्थानी आहेत. दुर्दैव म्हणजे आपणही तेवढ्याच प्रमाणात तेथे श्रद्धेने कचरा टाकतो.
सर्वजण निसर्गाला ईश्वर मानतो, त्याची पूजा करतो. नदी, पर्वतरांगा, सूर्य, चंद्र या सर्व गोष्टी आपल्यासाठी पूजनीय आणि वंदनीय आहेत. जगासाठी आपण भारतीय असामान्य आहोत. जगात अन्यत्र कोठेही अशा प्रकारची श्रद्धा पाहावयास दिसत नाही. नद्या तर आपल्यासाठी जीव की प्राण! गंगा नदीला तर आई मानतो. नर्मदेला महादेवाची कन्या मानले आहे. भारतीय संस्कृतीचे पालन पोषणही नदीकाठावर अधिक दिसून येते. देशातील सर्वच नद्यांची नियमितपणे पूजा अर्चा होताना आणि त्याविषयी श्रद्धा बाळगत असताना मध्य प्रदेशातील नर्मदेबाबत एक परिणामकारक निर्णय घेतला गेला. नर्मदा नदीचे उगमस्थान मध्य प्रदेशात असल्याने सरकारने घेतलेला निर्णय महत्त्वाचा. या सरकारने ज्या ठिकाणांहून नर्मदा वाहते तेथील काठावरची शहरे, गावांत मद्यपान आणि मांसाहार यासारख्या गोष्टींवर निर्बंध लावण्याचे ठरविले. यामागचा उद्देश नर्मदा नदीचे पावित्र्य जपणे. यानुसार नदीचे पावित्र्य जपण्यासाठी नदी काठावर मांसाहार अणि मद्यपान करता येणार नाही. मध्य प्रदेशच्या अमरकंटक येथे उगम पावणारी आणि खुंबाटच्या खाडीत मिसळणारी नर्मदा नदी 1 हजार 312 किलोमीटरचा अंतर कापते आणि मध्य प्रदेशातील तिचा प्रवास 1 हजार 79 किलोमीटर आहे. राज्यातील 21 जिल्हे, 68 तहसील आणि एक हजार 126 घाट नर्मदा नदीने व्यापलेले आहेत. मध्य प्रदेश सरकारच्या निर्णयाचा दूरगामी परिणाम या सर्व भागांवर होणार, हे निश्चित!
नर्मदा नदीची काळजी यापूर्वी एवढ्या प्रमाणात घेतल्याचे ऐकिवात नाही. अनंत काळापासून वाहत आलेल्या नर्मदा नदीला आता मद्य आणि मांसाहाराच्या सावलीतून वाचविण्यासाठी पुढाकार घेतला गेला असून ती मोठी बाब मानावी लागेल. आतापार्यंत केवळ गंगा नदीबाबतच बोलले जायचे. तिची स्वच्छता, तिचे पावित्र्य जपण्याचाच मुद्दा मांडला जायचा आणि आजही दिसतो. अर्थात, गंगा नदी सुमारे 40 कोटी लोकांचे पालन पोषण करते. गंगा नदीच्या काठावर वसलेल्या 97 शहरांतील मद्यपान, मांसाहाराबाबत काही बोलू शकत नाही; पण या शहरांतून 2 हजार 953 दशलक्ष मीटर सांडपाणी बाहेर पडते आणि ते गंगा नदीत मिसळले जाते. हे प्रकार थांबविण्यासाठी 1983 मध्ये ‘मिशन क्लिन गंगा’ नावाची मोहीम सुरू केली आणि सर्वांनी पोटचा मारा करून कोट्यवधीचा पैसा गंगा नदीसाठी खर्च केला. त्याच्या खर्चाचा अंदाज लावायचा असेल, तर 2014 ते आतापर्यंत दहा वर्षांत ‘नमामि गंगे’ प्रकल्पापोटी 40 हजार कोटी रुपये खर्च केले गेले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 2018 रोजी जारी केलेल्या अहवालानुसार भारतात 351 नद्या दूषित आहेत.
निसर्गावरचे प्रेम आपले स्पृहनीय आहे. पिंपळाच्या झाडाची आम्ही पूजा करू, नद्यांची पूजा करू, पर्वताला नमस्कार करू; पण अशी पूजा काय कामाची की, ती झाल्यावर त्याचा सर्व कचरा नदीत टाकत हात झटकत निघून जाऊ. वृक्ष पूजनीय आहे; पण त्यांना तोडताना, कापताना थोडाही वेळ दवडत नाहीत. नद्या पूजनीय म्हणतो, पण पूजा आटोपल्यानंतर कॅरिबॅगमध्ये पूजेचे राहिलेले साहित्य गोळा करून ते नदीत टाकतो आणि हात जोडत निघून जातो. शिखरे पूजनीय आहेत; पण डोंगरावर, पर्वतांवर प्लास्टिकच्या कॅरिबॅग, पेपर नॅमकिन, दारूच्या बाटल्या, यूज अँड थ्रोचे ग्लास असा बराच कचरा दिसतो. पर्वतावर बर्फ फेकणारे, धबधब्याचा आनंद घेणारे, पठारावर भटकंती करणारे भरपूर आहेत; पण त्याची शिक्षा पर्वतांना मिळत आहे, याचा कधी विचार केला का? या सर्व गोष्टी ठाऊक असतानाही कचरा फेकताना त्याचा अजिबात विचार केला जात नाही. ही स्थिती अशीच राहिली, तर कालांतराने पर्वत, डोंगररांगा मातीत मिसळून जातील आणि झाडांची, जंगलाचीही अशीच अवस्था होईल.