

आशिष शिंदे
ऑफिसचे काम असो, विद्यार्थ्यांचा अभ्यास, ई-मेल पाठवणे असो वा दैनंदिन ऑनलाईन व्यवहार, आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला संगणक आणि लॅपटॉपवर एआयची मदत घ्यावीच लागते. मात्र, यासाठी आपल्याला सतत संगणकाच्या स्क्रीनवर वेगवेगळ्या खिडक्या उघडाव्या लागतात. माऊसने कर्सर इकडे तिकडे फिरवावा लागतो आणि कीबोर्डवर बोटे आपटत वारंवार मजकूर टाईप करावा लागतो. दिवसभर संगणकासमोर बसून चालणाऱ्या या कसरतीमुळे डोळे तर थकतातच; शिवाय हाताची बोटेही दुखू लागतात. आपण वर्षानुवर्षे वापरत असलेला नेहमीचा माऊस आणि कीबोर्ड या गतिमान आधुनिक कामांसाठी फारसा सोयीस्कर उरलेला नाही, ही सर्वसामान्यांची खरी अडचण आहे. याच रोजच्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी आणि कामे सुटसुटीत करण्यासाठी ‘गॅजेट वर्ल्ड’मध्ये एक अनोखा ‘एआय व्हॉईस कीपॅड’ अवतरला आहे. ‘व्हॉईस कीपॅड’मुळे स्क्रीनवर काहीही टाईप करायचे असल्यास फक्त एक बटण दाबायचे आणि बोलायला सुरुवात करायची, तुमचे बोललेले शब्द क्षणात अचूकपणे स्क्रीनवर टाईप होतात.
या संचाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यातील अत्यंत संवेदनशील मायक्रोफोन. तुम्ही ऑफिसमध्ये सहकाऱ्यांच्या घोळक्यात काम करत असाल, घरात कुटुंबीय झोपलेले असताना रात्री बसला असाल किंवा लायब्ररीमध्ये असाल, अशा वेळी इतरांना त्रास होऊ नये म्हणून अगदी हळू आवाजात किंवा कुजबुजल्यासारखे बोललात, तरीही हा कंट्रोलर प्रत्येक शब्द अचूक टिपतो. त्यामुळे मोठा मजकूर लिहिणे असो, इंटरनेटवर माहिती शोधणे असो वा एआय साधनांशी संवाद साधणे असो, कीबोर्डवर बोटे न अडकवता विचारांच्या वेगाने सर्व मजकूर थेट स्क्रीनवर उतरतो.
सतत माऊस पकडल्यामुळे हाताची बोटे किंवा मनगट दुखण्याची तक्रार असणाऱ्यांसाठी यात खास शॉर्टकट बटणे आणि एक गोल फिरणारा रोटरी डायल देण्यात आला आहे. स्क्रीनवरील मजकूर तपासणे, होकार-नकार देणे, नवीन पेज उघडणे किंवा पानावर खाली-वर स्क्रोल करणे या सगळ्या गोष्टी आता या लहानशा उपकरणावरून एका बोटाच्या इशाऱ्यावर होतात.
हा कीपॅड वापरण्याची पद्धतही अत्यंत सोपी आणि सुटसुटीत आहे. ब्लूटूथ किंवा वायफायच्या सहाय्याने संगणकाशी हे उपकरण क्षणात कनेक्ट होते. वापरकर्त्याला जेव्हा जेव्हा काही टाईप करायचे असेल किंवा एआयला सूचना द्यायची असेल, तेव्हा फक्त यावरील ‘प्रेस टू टॉक’ बटण दाबून बोलायचे असते. यातील संवेदनशील मायक्रोफोन तुमच्या आवाजाचे रूपांतर तत्काळ अचूक मजकुरात करून स्क्रीनवर टाईप करतो तर बाजूला दिलेली शॉर्टकट बटणे आणि रोटरी डायल फिरवून तुम्ही एका बोटाच्या इशाऱ्यावर स्क्रीन स्क्रोल करणे, मेसेज पाठवणे किंवा चॅट स्वीकारणे-नाकारणे यांसारखी कामे माऊसला हात न लावता चुटकीसरशी करू शकता. या उपकरणासोबत येणारा छोटा डेस्कटॉप पिक्सेल स्क्रीन तर टेबलाची शोभा आणखी वाढवतो. लॅपटॉपवर काम सुरू असताना मध्येच येणारे महत्त्वाचे मेसेज, बैठकांची वेळ किंवा रोजच्या नियोजित कामांचा टायमर या स्क्रीनवर थेट दिसतो. जागतिक बाजारपेठेत या ‘एआय व्हॉईस कीपॅड’ची किंमत साधारणपणे ६१ ते ६२ डॉलर्स भारतीय चलनात सुमारे सहा हजार रुपयांच्या आसपास ठेवण्यात आली आहे.