

निसर्गचक्र बदलले असल्याचा अनुभव गेली काही वर्षे सातत्याने येत आहे. दुष्काळ, अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस या तिहेरी संकटात जगाप्रमाणे भारतही सापडला आहे. उत्तर भारतात मुसळधार पावसाने आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे सध्या भीषण स्थिती निर्माण झाली आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये पूर व भूस्खलनामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, शेकडो गावांचा संपर्क तुटला.
सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर बचावकार्य करत असून, मृतांची संख्या वाढत आहे. हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यातील भरमौर येथे शुक्रवारी मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात मणिमहेश यात्रेसाठी निघालेल्या 11 भाविकांचा मृत्यू झाला. यात्रेकरू मणिमहेशच्या दिशेने जात असताना अचानक दरड कोसळली आणि अनेक जण त्याखाली दबले. दुसरीकडे प्रचंड पावसामुळे मंगळवारी जम्मूतील माता वैष्णोदेवी मार्गावर भूस्खलन झाल्याने 41 भाविकांचा मृत्यू झाला.
या नैसर्गिक आपत्तीमुळे वैष्णोदेवी यात्रा स्थगित करावी लागली. पंजाबमधील 7 जिल्हे आणि दीडशेहून अधिक गावांना पुराचा तडाखा बसला असून, तेथील शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. हिमाचल प्रदेशात सततच्या पाऊस आणि भूस्खलनामुळे सर्वाधिक नुकसान झाले. चंदीगड-मनाली महामार्गावर दरडी कोसळल्या असून श्रीनगरमध्ये तर मुसळधार पावसामुळे पाणी नागरी वस्तीत शिरले. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेशात संततधार पावसाने कहर केला. ढगफुटीपासून पुरापर्यंत अनेक संकटांचा संपूर्ण हंगामात अनुभव आला. मान्सूनचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याशी सरकला असून हवामानातील तीव्र बदलांमुळे उत्तर भारतात तुफान पाऊस पडत आहे. जेव्हा दोन विविध प्रकारच्या हवामान प्रणालींची परस्परांशी टक्कर होते, तेव्हा थंड हवा आणि वाढीव आर्द्रता दिसून येते. या विचलनामुळे ढग तयार होऊन, उत्तर भारतात मुसळधार पाऊस पडत आहे. अशावेळी भूस्खलन आणि पावसाशी संबंधित अन्य धोक्यांचाही उद्भव होत असतो. केदारनाथमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे 2013 मध्ये जणू काही प्रलयच आला होता. त्या दुर्घटनेत 5 हजारांपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले होते.
आता उत्तराखंडमधील कोटद्वार येथे आलेल्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग वाहून गेला. बद्रीनाथ महामार्गावर भूस्खलन झाल्याने हजारो यात्रेकरू अडकले होते, तर उधमसिंह नगरमध्ये घराघरांत पाणी शिरले. गंगोत्री धाम मार्गावरील लोकप्रिय पर्यटनस्थळ धराली तीन आठवड्यांपूर्वी अवघ्या 34 सेकंदांत उद्ध्वस्त झाले. खीरगंगा नदीतून अचानक ढिगार्यासह येणार्या पाण्याच्या लाटेमुळे संपूर्ण गाव वाहून गेले. उत्तराखंडमध्ये गेल्या काही वर्षांत वारंवार संकटे येत असून, दोन वर्षांपूर्वी जोशीमठ या धार्मिक स्थळाची प्रचंड हानी झाली होती. खीरगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या ढगफुटीमुळे अचानक पूर येऊन अनेक घरेही वाहून गेली, तर डोंगराळ भागात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पंजाबातील पठाणकोट, जालंदर, गुरुदासपूर, होशियारपूर, अमृतसर, कपूरथळा, फिरोजपूर आणि फाजिलकी जिल्ह्यातील अनेक गावे सध्या पुराच्या विळख्यात सापडली आहेत.
जम्मू-पठाणकोट महामार्गावरील वाहतूक बंद असून, ट्रकच्या लांबच लांब रांगा कित्येक किलोमीटरपर्यंत तेथे लागल्या आहेत. 1988 नंतर पहिल्यांदाच रावी नदीने जनजीवन विस्कटून टाकले. पंजाबमधील पुरामुळे होणारी शेतीची अपरिमित हानी अधिक गंभीर आहे. कारण, त्यामुळे गव्हासारख्या प्रमुख पिकांनाही झळ पोहोचते. पंजाब हे देशाचे धान्याचे कोठार समजले जाते. तेथील महामार्ग ठप्प होणे म्हणजे धान्यपुरवठ्याची साखळी विस्कळीत होणे. जम्मूत भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले. तेथील अनेक छोटे पूल व मोबाईल टॉवर कोसळले. अतिवृष्टीमुळे जम्मूच्या विविध भागांतील परिस्थिती गंभीर असून, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रशासनाला सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले. या राज्यातही सतत दरडी कोसळत असतात.
मुळात हिमालयाच्या रांगांमधील प्रदेश हा भूकंपप्रवण असून, हिमालय पर्वत हा भुसभुशीत आहे. तेव्हा रस्ते अथवा बोगदे या स्वरूपाची कामे हाती घेताना निसर्गाच्या समतोलास धक्का लावला जातो, त्याचे भयंकर परिणाम दिसून येत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. रस्ते, पर्यटन आणि विकासकामांसाठी हिमालयात डोंगर आडवे-उभे कापले जात आहेत. पर्वतरांगा आतून-बाहेरून पोखरल्या जात आहेत. उत्तराखंडमधील अर्थव्यवस्था गतिमान करण्यासाठी तेथे पर्यटन विकास करण्याचीही गरज आहे; पण हा विकास साधताना पर्यावरणाचा तोल ढळणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी झाडे वाट्टेल तशी तोडणे, जंगले ओसाड करणे आणि एकूणच निसर्गाशी खेळ धोकादायकच. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडात असे काही बर्फाच्छादित भाग आहेत, जे कधीही तुटू शकतात. सिंधू नदीच्या उत्तरेस नंगा पर्वतापासून अफगाणिस्तानपर्यंत काराकोरम पर्वताची रांग पसरली असून ती धोकादायक समजली जाते.
काराकोरममधील श्योक नदीचा प्रवाह एका हिमखंडाने रोखला आहे. यामुळे तेथे छोटे छोटे तलाव बनले आहेत. 21व्या शतकाचा आरंभ होताना निसर्गाची राजरोस आणि सातत्याने हत्या होत असून, या कटू वास्तवाची जाणीव सर्वांना होऊ लागली. जीवसृष्टीच नष्ट झाली, तर मानवजात जगू शकणार नाही, या भयप्रद भविष्याकडे गतीने वाटचाल सुरू आहे, असे मत जगद्विख्यात पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी व्यक्त केले होते. सध्या निसर्ग हाच अडथळा मानून त्याला नष्ट करण्याचा चंग माणसाने बांधला आहे. निसर्गापासून झालेली मानवाची फारकत हेच सर्व समस्यांचे मूळ आहे. आदिवासी व शेतकरी यांच्याकडे जे उपजत पर्यावरणीय शहाणपण असते, तथाकथित विकासवाद्यांमध्ये मात्र त्याचा अभाव असल्याचे जाणवू लागले आहे. विकासाच्या नावाखाली निसर्गावर हल्ले करण्याचे आपण थांबवत नाही, तोपर्यंत हिमस्खलन, भूस्खलन, महापूर यासारखी संकटे वारंवार येतच राहतील. निसर्ग आपणास भरभरून देत असतो. त्यामुळे माणसाने किमान निसर्गातील हस्तक्षेप टाळून मानवजातीचे आणि पुढच्या पिढ्यांचे भवितव्य धोक्यात येणार नाही, याची तरी काळजी घ्यायला हवी.