Morocco First Female Prime Minister | फातिमा अल मन्सुरी

Morocco First Female Prime Minister |
Morocco First Female Prime Minister | फातिमा अल मन्सुरी
Published on: 
Updated on: 

युवराज इंगवले

जगभरात सध्या अनेक महिला देशाच्या सर्वोच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांनी कर्तृत्वाचा ठसा उमटवून जगाचे लक्ष वेधले आहे. आता यामध्ये आणखी एका महिलेची भर पडली आहे. त्या म्हणजे मोरोक्कोच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरलेल्या ५० वर्षीय फातिमा एझ्झहरा अल मन्सुरी होत. मोरोक्कोचे राजा मोहम्मद सहावे यांनी फातिमा यांची नियुक्ती केली आहे. अरब जगतात पंतप्रधानपद भूषवणाऱ्या त्या तिसऱ्या महिला आहेत.

फातिमा यांच्यापूर्वी अरब जगतातील ट्युनिशिया या देशाच्या नजला बौडेन यांनी २०२१ ते २०२३ या काळात पंतप्रधानपद सांभाळले. त्यानंतर ट्युनिशियाच्या विद्यमान पंतप्रधान सारा झाफरानी यांची मार्च २०२५ मध्ये नियुक्ती झाली.

नगरविकासमंत्री आणि माराकेच या प्रमुख शहराच्या महापौर असलेल्या फातिमा यांच्यावर नवीन सरकार स्थापन करण्याची जबाबदारी सोपवली आहे. देशाला संबोधित करताना फातिमा यांनी आपल्या नियुक्तीचे वर्णन 'खरोखरच ऐतिहासिक' असे केले. त्या म्हणतात की, इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेवर माेरोक्को सरकारचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवली आहे. ही केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर देशातील सर्व महिलांसाठी अभिमानाची बाब आहे. गेल्या आठवड्यात संसदीय निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर चार दिवसांनी त्यांची नियुक्ती झाली. राजघराण्यांशी निकटचे संबंध असलेल्या फातिमा यांच्या ऑथेंटिसिटी अँड मॉडर्निटी पार्टीने (पीएएम) सर्वाधिक मते मिळवत ३९५ सदस्यांच्या प्रतिनिधी गृहातील ९७ जागा जिंकल्या; मात्र स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक १९८ जागांपेक्षा पीएएम बराच मागे आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला अन्य पक्षांसोबत आघाडी करावी लागणार असून, हीच फातिमा यांच्यासमोरील पहिली मोठी जबाबदारी असेल.

विकासकामे आणि गुंतवणुकीची जबाबदारीही नव्या सरकार समोरील प्रमुख आव्हान असेल. इतकेच नाही, तर २०३० मध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली जाणार असून या विश्वचषकाचे प्रमुख यजमान मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्पेन हे देश असतील. १९७६ मध्ये माराकेच येथे जन्मलेल्या फातिमा यांनी कायद्याचे शिक्षण घेतले.

फ्रान्समधील माँपेलिए विद्यापीठातून त्यांनी उच्च शिक्षणाचे पदविकापत्र प्राप्त केले असून अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठातून अँग्लो सॅक्सन व्यावसायिक कायद्यातील पदविका त्यांनी मिळवली आहे. स्थानिक राजकारणात प्रवेश केल्यानंतर २००९ मध्ये त्या माराकेचच्या महापौर म्हणून निवडून आल्या आणि या पदावर विराजमान होणाऱ्या शहराच्या पहिल्या महिला ठरल्या. महापौरपदाचा पहिला कार्यकाळ संपल्यानंतर २०२१ च्या निवडणुकीनंतर त्यांनी पुन्हा माराकेच महानगरपालिकेचे नेतृत्व स्वीकारले. तसेच त्यांनी राष्ट्रीय राजकारणातही अनुभव मिळवला असून, सलग काही कार्यकाळांसाठी प्रतिनिधिगृहाच्या सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. ऑक्टोबर २०२१ मध्ये फातिमा यांनी केंद्र सरकारमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी राष्ट्रीय भूअवकाश नियोजन, नगरविकास, गृहनिर्माण आणि शहरी धोरण मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली, हे विशेष! फातिमा यांची नियुक्ती मोरोक्कोच्या राजकारणातील तसेच अरब जगतातील महिलांच्या राजकीय सहभागाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news