

होय, तो या माया साम्राज्याचा राजा... एका सकाळी झुकल राजाने आपल्या शिलिकॉन व्हॅलीच्या भव्य राजवाड्यात प्रधानजींना तातडीने पाचारण केले. विषयच गंभीर तसा... राजाने विचारले, ‘प्रधानजी, आपल्या माया राज्यात सगळं कसं चाललंय?’ प्रधानजी हात जोडून म्हणाले, ‘महाराज, प्रजा अत्यंत सुखात आहे. ‘रील्स’ नावाच्या मायाजालात तरुण पिढी दिवसाचे बारा तास डोकं आणि कंबर हलवण्यात पूर्णपणे दंग आहे. कोणालाही जगाचे भान उरलेले नाही; पण महाराज, एक चिंतेची बाब आहे. लोक आता फेसबुकवर फक्त म्हाताऱ्या लोकांसारख्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येतात. इन्स्टाग्रामवर फक्त शेजाऱ्याला आणि नातेवाईकांना जळवायला महागड्या हॉटेलातले फोटो टाकतात. यामुळे आपल्या खजिन्यात जाहिरातींचे नाणे थोडे कमी पडू लागले आहे.’
झुकल राजाने नेहमीप्रमाणे आपली मान थोडी तिरकी केली, विचार केला आणि म्हणाला, ‘प्रधानजी, चिंता करू नका. प्रत्येक यूजरकडून महिन्याला ‘ब्ल्यू टिक’चे पैसे घ्यायला सुरुवात करा. जो पैसे देईल, तोच आपल्या राज्यातील खरा शहाणा आणि प्रतिष्ठित नागरिक मानला जाईल!’ प्रधानजी घाबरत म्हणाले, ‘पण सरकार, प्रजा बंड करेल. लोक संतापून इलॉन मस्कच्या ‘एक्स’ (ट्विटर) दरबारात पळून जातील.’
राजा मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला, ‘प्रधानजी, आपण तिथेही ‘थ्रेडस्’ नावाचे नवे कुरण तयार करून ठेवले आहेच की! लोक तिथे जातील, तरी शेवटी आपल्याच जाळ्यात अडकतील. बरं, आपल्या त्या ‘मेटाव्हर्स’ या काल्पनिक नगरीचे काय झाले?’ प्रधानजींनी कपाळावर हात मारून घेतला, ‘महाराज, त्या नगरीत अजून फक्त तुम्ही आणि तुमचे थ्री-डी भूत (अवतार) फिरत आहात. जिवंत माणूस अजून तिथे फिरकायला तयार नाही. प्रजा म्हणतेय, ‘डोळ्यावर तो जड चष्मा लावून आभासी जगात फिरण्यापेक्षा, गल्लीतल्या टपरीवर प्रत्यक्ष चहा पिणे जास्त सोयीचे आहे!’
झुकल राजाने शेवटी हुकूम सोडला, ‘काहीही करा प्रधानजी, प्रजेला चोवीस तास स्क्रीनला चिकटवून ठेवा. त्यांचा डेटा गोळा करत राहा. शेवटी, डेटा म्हणजेच आपले खरे साम्राज्य!’ प्रधानजी ‘ज्यो आग्या महाराज’ म्हणत, प्रजेला न समजणाऱ्या नवीन अटी आणि शर्ती लिहायला निघून गेले... पाठीमागे दरबाऱ्यांनी एकच जयघोष केला... झुकल महाराजांचा विजय असो.!!