

दोन मैत्रिणींनी इंटरव्ह्यूला सुरुवात केली. पार्लरवाली मैत्रीण होती सुगंधा आणि इंटरव्ह्यूअर रजनीगंधा... आणि बघणारे परागंदा असे समजू...
रजनीगंधा : नमस्कार, मी रजनीगंधा. ‘मीच सुंदर’ चॅनेलवर आपलं स्वागत. मिस सुगंधा आपल्याला ब्युटी टिप्स देतील. यांच्या नितळ त्वचेचे रहस्य आपण जाणून घेऊ. इंटरव्ह्यू चालू करूया. सर्वप्रथम सुगंधाताई अं... काय बरं... हा. मी एक प्रश्न विचारू?
सुगंधा : (थिजल्यागत स्माईल देत) आपण त्यासाठीच आलोत ना. विचारा.
रजनीगंधा : हा. तर सुगंधाताई, सुगंधी उटण्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे. ते करत असालच तुम्ही सणासाठी.
सुगंधा : (काय विचारते ही बाई या आविर्भावात) हो... म्हणजे नाही. आता दसराही लांब आहे. दिवाळी तर अजून लांब. मग त्यानंतर मी उटणे करायला घेते. रजनीगंधा : अगं बाई. हो का? विसरलेच मी, दिवाळी लांब आहे अजून. वाह वाह. म्हणजे सुंदर तर आहातच तुम्ही. उत्तरही सुंदर दिलात. आता दुसरा प्रश्न. सुगंधा : विचारा. अगदी मोकळेपणाने. रजनीगंधा : आपली त्वचा लहान मुलाप्रमाणे इतकी नितळ आहे तर यामागचं रहस्य सांगाल का. काय वापरता आपण त्वचा चांगली राहण्यासाठी? सुगंधा : काहीच नाही. मी खाण्याची सवय तीच ठेवली आहे. नाष्टा, जेवण लहानपणापासून अगदी तेच आहे. त्यामुळे बाकी काहीच खटाटोप नाही करावा लागत.
रजनीगंधा : अं... हे हे... (अनपेक्षित उत्तर मिळाल्याने गडबडते) मला वाटतं, आपण पार्लरच्या प्रॉडक्टवर बोलू.
सुगंधा : हो हो. नक्की. चेहऱ्याला अंड्याचा बलक लावावा. लिंबाच्या रसाने थोडं मॉलिश करून घ्यावं. याने खूप छान त्वचा राहते. सख्यांनो नक्कीच ट्राय करा.
रजनीगंधा : (हळूच) अगं पण तुझा यात रोल काय? घरगुती टिप्स काय देते. ते मलाही माहिती आहे. हे हे हे. यापुढील प्रश्नाचा नक्कीच आपणा सर्वांना फायदा होईल. तर मिस सुगंधा, आपण इतर काही टिप्स द्या सुंदर दिसण्यासाठी.
सुगंधा : ते मी काहीच नाही वापरत खरं तर. तुला सांगते मी सकाळच्या नाष्ट्यामध्ये अजूनही फॅरेक्स घेते आणि आंघोळीसाठी बेबी सोप. बस्स एवढंच. त्यामुळे मी अजूनही बालिश आणि लहान मुलांप्रमाणे दिसते.
रजनीगंधा : मला वाटतं, तू पार्लरमध्ये पण बेबी सोप वापरत असशील ना? हे हे (हळूच कानाशी - ये बाई, हेच खरंय तर पार्लर कशाला उघडली तू?) (कॅमेऱ्याकडे पाहात) मला वाटतं हे सर्वांनी ट्राय करा. हिच्या पार्लरमध्ये नाही गेलात तरी चालेल. महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! (इंटरव्ह्यूसकट चॅनेल बंद आहे अजून)