

एलॉन मस्क हे अमेरिकन उद्योगपती एक फार करामती व्यक्तिमत्त्व आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते ट्रम्प यांच्या पाठीशी जाहीरपणे उभे राहिले आणि त्यांनीच ट्रम्प यांना निवडून आणले असेही म्हणतात. विना ड्रायव्हरची चालणारी टेस्ला कार ही त्यांचीच निर्मिती आहे. प्रचंड पैसा हाती असल्यामुळे ते उद्योगाच्या विविध क्षेत्रांमध्ये येत असतात. टेस्ला कारची जगभर चर्चा होत असतानाच मस्क महोदयांनी कृत्रिम बुद्धिमत्तेने मैत्रीण उपलब्ध करून देण्याचा मार्ग प्रशस्त केलेला आहे.
आपल्या देशामध्ये गर्लफ्रेंड किंवा मैत्रीण या बाबीला फारशी मान्यता नाही. साताजन्माच्या बंधनात बांधून घेणारे नवरा-बायको ही मूळ संस्कृती आहे. अमेरिकेत आणि युरोपमध्ये मात्र असे नाही. झालेले लग्न टिकेल का, याची खात्री नाही म्हणून बरेच लोक लग्न न करताच राहत असतात. आपल्या देशातही हळूहळू ही संकल्पना मोठ्या शहरांमधून येण्यास सुरुवात झाली आहे. बर्याच तरुणांना लग्न करणेच नको वाटते. ते लग्न नको, बायकोची झंझट नको, ती तडजोड नको, मुलाबाळांची जबाबदारी नको यामुळे ते एकटे राहतात. अशा एकट्या राहणार्या लोकांना किंवा आहे त्या विवाहाला कंटाळलेल्या पुरुषांना मस्क यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची गर्लफ्रेंड तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे.
ही गर्लफ्रेंड कशी असेल, याविषयी त्यांनी जुजबी माहिती पण दिलेली आहे. तुमच्या एकटेपणावर उपाय म्हणून, तुमच्याशी रोमँटिक बोलणारी मैत्रीण म्हणून किंवा एकंदरीतच एक बुद्धिमान आणि सुंदर स्त्री व्यक्तिमत्त्व तुमच्यासोबत 24 तास राहू शकते. जसे तुम्ही गाडी बुक करता तसे गर्लफ्रेंड बुक करायची आणि मस्क महोदय तिला तुमच्या घरी पाठवून देतील.
अमेरिकेत आणि युरोपात ही आयडिया भन्नाट चालण्यासारखी आहे; पण भारतात तिला मर्यादा आहेत. आपल्या नवर्याची जुनी मैत्रीण भेटली, तरी राग राग करणार्या विवाहित महिला आपल्याकडे आहेत तोपर्यंत गर्लफ्रेंड नावाच्या प्रकाराला आपल्याकडे मान्यता मिळण्याची शक्यता अजिबात नाही. मस्क महोदयांचा कहर म्हणजे, ते तुम्हाला जशी पाहिजे तशी गर्लफ्रेंडपण तयार करून देणार आहेत. अर्थात, याचा एक गुगल फॉर्म असेल. त्यात तुम्हाला गर्लफ्रेंडची उंची किती असावी? तिचा आकार कसा असावा? तिचा रंग कसा असावा? स्वभाव कसा असावा, याविषयीची माहिती तुम्हाला भरता येईल आणि तुम्ही दिलेल्या वर्णनाप्रमाणे तुम्हाला गर्लफ्रेंड मिळेल. आहे की नाही गंमत? आपल्या देशात घटस्फोटांचे प्रमाण वेगळ्या राहणार्या पुरुषांना घटस्फोटानंतर नैराश्य येऊ नये म्हणून अशी कृत्रिम बुद्धिमत्तेची गर्लफ्रेंड किंवा मैत्रीण घरी आणून तिच्याबरोबर लुटुपुटुचा संसार करता येण्याची सोय मात्र यांनी केली आहे. तूर्त पुरुषी व्यक्तिमत्त्वाचे अवगुण लक्षात घेऊन त्यांनी गर्लफ्रेंड तयार केली आहे.