अष्टपैलू कामगिरीची आठ वर्षे

अष्टपैलू कामगिरीची आठ वर्षे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कारकिर्दीला आज (दि. 26) आठ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त…

प्रशांत किशोर यांना मी राजकीय द़ृष्टिकोनातून फारसे महत्त्व देत नाही. कारण, ते निवडणूक व्यवस्थापन करणारे कंत्राटदार आहेत; परंतु माध्यमांनी त्यांना राजकारणाचा चाणक्य बनवले आहे. असे असूनही गेल्या पंधरवड्यात त्यांनी एक्सप्रेस अड्डा येथे जे सांगितले होते, त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे की, पुढील 30 वर्षे भारताचे राजकारण भाजपभोवती फिरणार आहे.

21 मे रोजी जयपूर येथे झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की भाजपने पुढील 25 वर्षांचे लक्ष्य निश्चित करण्याची आणि ते साध्य करण्यासाठी सातत्याने काम करण्याची वेळ आली आहे. प्रशांत किशोर यांनी त्यांचा निवडणूक व्यवस्थापनाचा प्रवास नरेंद्र मोदींसोबत सुरू केला होता. त्यामुळे त्यांना नरेंद्र मोदींची नाडी कळते. मोदींना दहा दिवसांनी जे बोलायचे होते ते प्रशांत किशोर दहा दिवसांपूर्वी 12 मे रोजीच बोलले होते. वास्तविक, मे 2014 नंतर भाजपचा सुवर्णकाळ सुरू होईल, असे 2013 पर्यंत कोणालाही वाटले नव्हते.

2009 मध्ये अडवाणींचा करिष्मा संपल्यानंतर भाजपकडे नितीन गडकरी, राजनाथ सिंह आणि सुषमा स्वराज असे तीन पर्याय होते. नरेंद्र मोदींच्या नावाचा विचारच नव्हता. त्यांचे नाव जनतेतून पुढे आले. भाजप आणि काँग्रेसमधील मुख्य फरक इथेच दिसून येतो. जेव्हा नरेंद्र मोदींचे नाव भाजपमध्ये कुठेच नव्हते, तेव्हा 2013 मध्ये सर्वजण म्हणू लागले की, भाजप नरेंद्र मोदींना पुढे का आणत नाही? याची दोन कारणे होती.

एक म्हणजे अनुभव नसजानाही त्यांनी गुजरातला मॉडेल राज्य बनविण्यात लक्षणीय यश मिळविले. दुसरे म्हणजे, त्यांनी कणखर हिंदू नेता अशी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. त्याआधी कल्याणसिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना अशी प्रतिमा निर्माण केली होती; मात्र बाबरीची संरचना ढासळल्यानंतर राजीनामा देऊन ते धर्मनिरपेक्ष राजकारणाला शरण गेले, तर गुजरातमध्ये दशकभर मुस्लिमविरोधी दंगलींच्या आरोपांना तोंड देत मोदींनी स्वतःला एक मजबूत हिंदू नेता बनविले. धर्मनिरपेक्ष समूहापुढे गुडघे टेकणार नाही आणि त्यांच्या हिताचे रक्षण करणार नाही, अशा नेत्याचा शोध हिंदूंकडून साठ वर्षांपासून घेतला जात होता. 2014 च्या निवडणुकीपूर्वीच देशातील जनतेने त्यांना निवडून दिले होते.

गुजरातच्या जनतेच्या हिताचे रक्षण करण्यात मोदी जसे यशस्वी ठरले, त्याचप्रमाणे देशाचे आणि देशातील जनतेचे हित जोपासण्यात ते यशस्वी ठरले. त्यांनी गुजरातमध्ये ज्याप्रमाणे विकासाचे मॉडेल मांडले, त्याच पद्धतीने त्यांनी देशात विकासाचे मॉडेल मांडले. दहा वर्षांच्या कारकिर्दीनंतर यूपीए सरकारकडे लोकांना दाखवण्यासारखी मनरेगा ही एकच योजना होती. मोदींनी गेल्या आठ वर्षांत आठ उल्लेखनीय कामे करून दाखविली आणि त्या कामांची व्याप्ती अमर्याद आहे.

पहिले- गरिबांच्या हिताच्या आठ उल्लेखनीय योजना (जनधन, पंतप्रधान विमा पेन्शन योजना, सर्वांसाठी घरे, उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत, किसान सन्मान निधी, स्वच्छ भारत अभियान आणि मुद्रा योजना), दुसरे- बहुसंख्य लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हिंदूंनी स्वतंत्र व्हावे, यासाठी दिलेले आठ मुद्दे (अयोध्येत राम जन्मभूमीवर भव्य मंदिर बांधणे, भगव्या दहशतवादाच्या आरोपांवरून तुरुंगात असलेले असीमानंद, साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांची सुटका, कैलास मानसरोवर यात्रेचा दुसरा मार्ग खुला, कैलास मानसरोवर यात्रेसाठी दुप्पट निधी वाटप, वैष्णोदेवी मंदिराजवळ रेल्वेमार्ग पोहोचला, जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याबरोबरच राज्याबाहेर लग्न करणार्‍या जम्मू-काश्मीरमधील हिंदू मुलींना समान हक्क मिळण्यासाठी 35 अ रद्द करणे, मुस्लिम देशांमधील हिंदूंना भारताच्या नागरिकत्वाचे दरवाजे खुले करणे.)

तिसरे- पायाभूत सुविधांमध्ये विक्रमी कामगिरी. यात प्रामुख्याने 18 हजार गावांना वीज पुरवणे, चार धाम यात्रेसाठी सर्व हवामानात टिकतील असे रस्ते बांधणे आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देत चीन सीमेजवळ रस्ते आणि पुलांचे जाळे उभारणे, चौथे- पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करून आणि चीनला गलवान खोर्‍यात चोख प्रत्युत्तर देऊन देशाला स्वाभिमानी बनवून, लष्कराचे मनोबल वाढवून, जगाला नवीन शक्तिशाली भारताची ओळख करून दिली.

पाचवा- कोरोनाशी यशस्वीपणे मुकाबला करणे आणि संपूर्ण जगाला भारताच्या क्षमतेची खात्री पटवणे. सहावा- अनेक विसंगती आणि विरोध असतानाही देशात जीएसटीच्या स्वरूपात नवी करप्रणाली सुरू करणे. सातवे- जगाची अर्थव्यवस्था अडचणीत असताना भारताची अर्थव्यवस्था प्रगतिशील ठेवणे. 2014 पासून अनेक सुधारणा आणि व्यवसाय-अनुकूल प्रशासन बाजाराच्या मागण्या लक्षात घेऊन काम करीत आहे. परिणामी, 25 मे 2022 रोजी बीएसई सेन्सेक्स 26 मे 2014 रोजीच्या 24,716.88 वरून 54,379.59 वर पोहोचला. जीडीपीनेही 7.4 टक्क्यांवर झेप घेतली. आठवे- युक्रेन-रशिया युद्धाच्या वेळी भारत रशियाच्या दबावाखाली आला नाही आणि अमेरिकेच्याही दबावाखाली आला नाही. भारताने आक्रमक परराष्ट्र धोरणाद्वारे जगाला जाणीव करून दिली आहे की, भारत आता दुबळा देश नाही.

मोदींचा राज्यकारभार, त्यांचे भावनिक आवाहन आणि सामान्य माणसांशी असलेला संबंध इतका सखोल आहे की, ते सर्वोच्च विजेते बनले आहेत. 80 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. कोट्यवधी लोकांच्या नशिबात बदल करून त्यांनी त्यांची मने जिंकली आहेत. आज ब्रँड मोदी हे राष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक विजयी नेते आहेत, तर त्यांच्या मान्यतेचे जागतिक रेटिंग 70 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. इतिहासात सर्वात जास्त लोकप्रिय 'डायस्टोपियन' काळातील कोणत्याही नेत्याला देण्यात आलेले हे
सर्वोच्च रेटिंग आहे.

– अजय सेतिया,
राजकीय विश्लेषक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news