International Interpreter | डॉ. गुरदीप कौर चावला

International Interpreter |
International Interpreter | डॉ. गुरदीप कौर चावला
Published on
Updated on

मुरलीधर कुलकर्णी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युरोप आणि नॉर्डिक देशांच्या दौऱ्यात नेदरलँड आणि नॉर्वेमध्ये स्थानिक पत्रकारांनी माध्यम स्वातंत्र्यावरून भारतीय शिष्टमंडळाला थेट आणि तीक्ष्ण प्रश्न विचारले. या सर्व तणावाच्या प्रसंगी, पंतप्रधान मोदींना सहाय्य करण्यासाठी त्यांच्या शेजारी बसलेली एक शांत, संयमी महिला अधिकारी दिसली. जागतिक राजकारणाच्या मंचावर दोन देशांच्या प्रमुखांमधील संवादाचा मुख्य दुवा असलेल्या त्या महिला अधिकारी म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित दुभाषी (Interpreter) डॉ. गुरदीप कौर चावला.

मूळच्या पंजाबमधील एका सुशिक्षित आणि शिस्तबद्ध कुटुंबात जन्मलेल्या गुरदीप कौर यांची कौटुंबिक पार्श्वभूमी त्यांना सुरुवातीपासूनच अभ्यासू वातावरणाकडे घेऊन जाणारी ठरली. त्यांचे वडील भारतीय सैन्यात अधिकारी होते. वडिलांच्या नोकरीमुळे त्यांची सतत वेगवेगळ्या राज्यांत बदली होत असे. या फिरतीमुळे गुरदीप यांना लहानपणापासूनच भारताची विविध प्रांतीय संस्कृती आणि भाषा अतिशय जवळून अनुभवता आल्या. वेगवेगळ्या भाषा समजून घेण्याची त्यांची आवड याच कौटुंबिक पार्श्वभूमीतून निर्माण झाली. त्यांचे उच्च शिक्षण दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून झाले. त्यांनी इंग्रजी साहित्य आणि राज्यशास्त्र अशा दोन्ही विषयांत पदव्युत्तर पदव्या संपादन केल्या असून पुढे भाषांतर क्षेत्रातील विस्मयकारक योगदानाबद्दल त्यांनी डॉक्टरेटदेखील मिळवली.

गुरदीप या अनुवादक या आव्हानात्मक व्यवसायाकडे कशा वळल्या, हा प्रवासही रंजक आहे. दिल्लीत शिक्षण घेत असताना त्यांना भारतीय संसदेमध्ये दुभाषी पदासाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याचे समजले. केवळ एक वेगळा अनुभव आणि भाषांवरील प्रभुत्वाची चाचणी घेण्यासाठी त्यांनी या कठीण परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. आपल्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी संसदेची अत्यंत क्लिष्ट परीक्षा उत्तीर्ण केली आणि अवघ्या २१ व्या वर्षी त्यांची संसदेत अधिकृत अनुवादक म्हणून निवड झाली. इथूनच त्यांच्या जागतिक कारकिर्दीची पायाभरणी झाली. पुढे १९९६ मध्ये लग्नानंतर त्या पतीसोबत अमेरिकेत स्थायिक झाल्या आणि तिथे ‘सिलिकॉन व्हॅली’मध्ये ‘इंडियन लँग्वेजेस सर्व्हिसेस’ ही स्वतःची यशस्वी कंपनी सुरू केली. त्यांचे इंग्रजी, हिंदी, पंजाबी आणि उर्दू या भाषांवर विलक्षण प्रभुत्व आहे.

गेल्या ३० वर्षांपेक्षा जास्त काळ आंतरराष्ट्रीय राजनैतिक वर्तुळात कार्यरत असलेल्या डॉ. कौर यांनी भारताच्या तब्बल ७ पंतप्रधानांसाठी (व्ही. पी. सिंग यांच्यापासून ते थेट आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत) काम केले आहे. केवळ भारतीयच नव्हे, तर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, ज्यो बायडेन आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या ‘हाय प्रोफाईल’ बैठकांमध्येही त्यांनी दोन्ही देशांमधील संवादाची धुरा सांभाळली आहे. २०१४ मधील मोदींचे न्यूयॉर्कमधील ‘मॅडिसन स्क्वेअर गार्डन’ येथील ऐतिहासिक भाषण असो, २०१८ मध्ये लंडनमध्ये बीबीसीच्या महिला पत्रकाराने विचारलेला अडचणीचा प्रश्न असो किंवा नुकताच नॉर्वेजियन पत्रकाराने विचारलेला प्रश्न असो; डॉ. गुरदीप कौर यांनी कायमच हजरजबाबीपणे प्रत्युत्तर देत पंतप्रधानांना साथ दिली आहे. राजनैतिक नियमांनुसार अनुवादकाला स्वतःची कोणतीही वैयक्तिक प्रतिक्रिया चेहऱ्यावर दाखवता येत नाही. हाच नियम पाळत, प्रश्न कितीही वादग्रस्त असला तरी, त्याचा अचूक आशय पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्याचे आणि पंतप्रधानांची भूमिका माध्यमांपर्यंत पोहोचवण्याचे कठीण काम त्या लीलया करतात. आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत दोन देशांना जोडणारा हा प्रभावी आवाज आज जागतिक पातळीवर भारताची मान उंचावत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news