

युवराज इंगवले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जगाच्या केंद्रस्थानी आहेत. बड्या देशाचे राष्ट्राध्यक्ष असतानाही ते कोणत्याही प्रकारचा मुलाहिजा न बाळगता अजब-गजब निर्णय घेत असतात. अजूनही हे ट्रम्प नावाचे वादळ काही शमण्याचे नाव घेत नाही. रोजच त्यांच्या बालक्रीडा सुरू आहेत. अशातच त्यांच्यासारख्या नेत्याचा जपानसारख्या छोट्याशा पण विकसित देशात उदय झाला आहे, हे जर लोकांना कळले, तर सर्वांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही; पण हे खरे आहे. जपानच्या राजकारणात या नव्या वादळाने प्रवेश केला आहे.
20 जुलै रोजी झालेल्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीत पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या सत्ताधारी लिबरल डेमोकॅ्रटिक पार्टीला (एलडीपी) मोठा धक्का बसला आहे. कनिष्ठ सभागृहात आधीच अल्पमतात असलेल्या एलडीपीने आता वरिष्ठ सभागृहातील बहुमतही गमावले आहे. एलडीपी दोन्ही सभागृहांमध्ये अल्पमतात आहे. या ऐतिहासिक पराभवामागे उजव्या विचारसरणीच्या सॅनसेतो पक्षाचा उदय हे प्रमुख कारण मानले जात आहे.
‘जपान फर्स्ट’चा नारा देत निवडणूक रिंगणात उतरलेल्या सॅनसेतो पक्षाने सर्वांना चकित करत 14 जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीपूर्वी 248 जागांच्या वरिष्ठ सभागृहात या पक्षाचा केवळ एकच सदस्य होता. हा निकाल म्हणजे जपानच्या राजकारणातील एक दूरगामी बदलाचा संकेत मानला जात असून, या वादळाचे केंद्रबिंदू ठरले आहेत पक्षाचे संस्थापक सोहेई कामिया, ज्यांना आता ‘जपानचे डोनाल्ड ट्रम्प’ म्हणून संबोधले जात आहे.
कामिया यांनी आपल्या पक्षाची सुरुवात कोणत्याही मोठ्या राजकीय व्यासपीठावरून नव्हे, तर थेट यूट्यूबवरून केली होती. एप्रिल 2020 मध्ये जेव्हा संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात होते आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात होते, तेव्हा कामिया यांनी सॅनसेतो पक्षाची घोषणा केली. सुरुवातीला कामिया यांनी लसीकरण आणि मास्क घालण्याविरोधात आंतरराष्ट्रीय कट असल्याचा सिद्धांत मांडून जगाचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या भूमिकेमुळे अनेकांनी त्यांना गांभीर्याने घेतले नाही आणि एक षड्यंत्रवादी पक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिले. मात्र, हळूहळू कामिया यांनी रणनीती बदलली. त्यांनी स्वतःला आणि पक्षाला एक राष्ट्रवादी आणि लोकाभिमुख पर्याय म्हणून सादर करण्यास सुरुवात केली.
कामिया स्वतः मान्य करतात की, त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून खूप काही शिकले आहे. विशेषतः त्यांची भाषणशैली. ते स्वतःला ट्रम्प यांच्याप्रमाणेच जपानला विदेशी नागरिक, जागतिक शक्ती आणि भ्रष्ट नेत्यांपासून वाचवणारे नेते म्हणून सादर करतात. त्यांचा एकच नारा आहे, ‘जपान केवळ जपानी नागरिकांसाठी!’ त्यांचे म्हणणे आहे की, विदेशी कंपन्या आणि बाह्य शक्ती देशाच्या धोरणांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करत आहेत. जर हे असेच सुरू राहिले, तर जपान एक वसाहत बनेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. अमेरिकेशी संबंध कायम ठेवताना ते संबंध समानतेच्या पातळीवर असावेत, अशी त्यांची मागणी आहे. एकंदरीत सॅनसेतो पक्षाचा उदय हा जपानच्या राजकारणात एका नव्या आणि अनिश्चित युगाची सुरुवात असल्याचे दर्शवत आहे.