Maharashtra Day : सर्वांगीण विकासात महाराष्ट्र अव्वल

महाराष्ट्र म्हणजे इतिहास, भूगोल आणि संस्कृतीचा समुच्चय
Maharashtra Day
सर्वांगीण विकासात महाराष्ट्र अव्वल
Published on
Updated on

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

महाराष्ट्र दिनाच्या महाराष्ट्रातील आणि जगभरातील मराठी बांधवांना मनापासून शुभेच्छा. आज कामगार दिनसुद्धा आहे, सर्व कामगार बंधू, भगिनींनाही मन:पूर्वक शुभेच्छा!

महाराष्ट्र केवळ भौगोलिक सीमांनी बांधलेले राज्य नाही. महाराष्ट्र म्हणजे इतिहास, भूगोल आणि संस्कृतीचा समुच्चय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेली स्वराज्याची प्रेरणा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला न्याय आणि प्रज्ञेचा पाया, संतांच्या अभंगवाणीचा दिव्य वारसा, महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पेटविलेली शिक्षण आणि समतेची मशाल, लोकमान्य टिळक यांनी जागविलेली राष्ट्रभावना, देशासाठी अनन्यसाधारण यातना सहन करण्याची ताकद देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर या सगळ्यांच्या विचारांचा एकत्रित संगम म्हणजे महाराष्ट्र. केवळ भौगोलिक रचनेत महाराष्ट्र व्यक्त होत नाही तर महाराष्ट्र धर्मातून महाराष्ट्र प्रकट होतो. सर्वांवर हा महाराष्ट्र धर्म जगभरात वर्धिष्णू करण्याची जबाबदारी आहे.

यंदाचा महाराष्ट्र दिन विशेष आहे. महात्मा फुले यांच्या 200 व्या जयंतीचे हे वर्ष आहे, संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंतीचे वर्ष आहे, चवदार तळ्याच्या ऐतिहासिक लढ्याचे शताब्दी वर्ष आहे. हे वर्ष आपण ‌‘समता आणि सामाजिक समरसता‌’ वर्ष म्हणून साजरे करत आहोत. आज जग आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाची झळ सोसत आहे. त्याचवेळी आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकारने ऊर्जा सुरक्षेसाठी, पर्यायी तेल स्रोतांसाठी आणि सौर ऊर्जेच्या विस्तारासाठी उभारलेल्या कामामुळे जगातील अन्य देशांना ज्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले, तसे भारतात झाले नाही.

जगातील 30 वी अर्थव्यवस्था म्हणून झेप

जगात कितीही आव्हाने असताना महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्र देशाच्या जीडीपीमध्ये 13.5 टक्क्यांहून अधिक योगदान देत आहे. 2024-25 मध्ये महाराष्ट्राने 1,64,875 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक आकर्षित केली. हे प्रमाण देशात आलेल्या एकूण एफडीएच्या 39 टक्के इतके आहे. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने 30 लाख कोटींचे सामंजस्य करार केले, ज्यातून 40 लाख रोजगार निर्माण होणार आहेत. जगात आर्थिक समस्या असताना महाराष्ट्राने जगातील 30 वी अर्थव्यवस्था म्हणून झेप घेतली आहेे.

जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारच्या कामांना गती

यावर्षी एल-निनो परिस्थितीमुळे 2026 च्या हंगामातील पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आपला खरीप हंगाम पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे हा अंदाज गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. पेरणीची घाई करू नका. कृषी विभागाकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनांकडे लक्ष द्या. त्यातून या संकटापासून बचाव करणे सोपे जाईल. त्याचवेळी मला शेतकरी बांधवांना आश्वस्त करायचे आहे की, राज्य शासन म्हणून आम्ही आधीपासूनच पाणी, चारा याचे नियोजन प्रारंभ केले आहे. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारच्या कामांना गती देण्यास तसेच त्यासाठी प्राधान्याने निधी देण्यास सांगण्यात आले आहे.

शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना

गेल्या वर्षी पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर 15,576 कोटी रुपये जमा केले गेले. शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आपण जाहीर केली आहेच. शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जात आहे, आता सौर ऊर्जेचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नैसर्गिक कितीही संकटे आली तरी महाराष्ट्राच्या विकासाचा रथ थांबणार नाही. विकसित महाराष्ट्राचा आराखडा आपण तयार केला आहे. महाराष्ट्राला 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न आणि त्या दिशेने आपण आतापासूनच काम सुरू केले आहे.

वाढवण येथे चौथे मुंबई बंदर विकसित केले जाणार

महाराष्ट्र आज देशातच नाही, जगातही पायाभूत सुविधांच्या निर्मितीत आघाडीवर आहे. सध्या मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये 173 किलोमीटरच्या मेट्रो मार्गिका कार्यरत आहेत. दरवर्षी 50 कि.मी.ची मेट्रो सेवेत येईल, असे नियोजन आहे. समृद्धीच्या साथीला शक्तिपीठ येतो आहे. वाढवण येथे चौथे मुंबई बंदर विकसित केले जाणार आहे, जे जगातील ‌‘टॉप टेन‌’ पैकी एक असेल. आज महाराष्ट्र दिनी मला एक अत्यंत आनंदाची बातमी सांगायची आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील 13.3 कि.मी.चा ‌‘मिसिंग लिंक‌’ प्रकल्प आज जनतेसाठी खुला होत आहे. यामुळे दोन शहरांमधील अंतर सुमारे 6 कि.मी.ने आणि प्रवासाची वेळ 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे.

लखपती दीदींची संख्या यावर्षी 50 लाखांपर्यंत नेण्याचे नियोजन

40 लाखांहून अधिक महिला आता ‌‘लखपती दीदी‌’ झाल्या आहेत. उमेद अभियानांतर्गत 64 लाखांहून अधिक कुटुंबांना बँक कर्जे उपलब्ध करून दिले आहे. लखपती दीदींची संख्या यावर्षी 50 लाखांपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. लाडकी बहीण योजनेतून आमच्या बहिणींना मदत केली जाते आहे. सारथी, बार्टी, महाज्योती, आर्टी, वनार्टी, अमृत अशा विविध संस्थांच्या माध्यमातून समावेशकतेची पायाभरणी केली जाते आहे.

उद्योजक व स्टार्टअप्सला सहाय्य

महाराष्ट्राने स्टार्टअप, उद्योजकता आणि नावीन्यता धोरणाद्वारे पुढील पाच वर्षांत 1.25 लाख उद्योजक आणि 50,000 स्टार्टअप्सला सहाय्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. युवकांसाठी स्वतंत्र क्रीडा धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुप्रशासनासाठी अनेक पावले उचलण्यात आली असून, शासनाच्या सर्व सेवा व्हॉटसॲपवर देण्यासाठी मोठा पुढाकार घेण्यात आला आहे. गडचिरोली नक्षलमुक्त झाले आहे. महाराष्ट्रातील 11 किल्ले युनेस्को जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची जगाने ही घेतलेली दखल आहे. महाराष्ट्र अधिक मजबूत आहे. अधिक आत्मनिर्भर आहे. अधिक महत्त्वाकांक्षी आहे. शेतकरी, कामगार, महिला, तरुण, उद्योजक प्रत्येकासाठी या राज्य शासनाने आपली कटिबद्धता सिद्ध केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 च्या स्वप्नात महाराष्ट्र सर्वात पुढे राहील, हे माझे महाराष्ट्र दिनी आपल्याला वचन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news