

हे जे काय तुमचं-आमचं दैनंदिन जीवनाचं रहाटगाडगं सुरू असतं ना ते कशासाठी सुरू आहे, हा एक मोठाच प्रश्न असतो. आपण कमावतो कशासाठी तर खाण्यासाठी, हे याचे साधे सोपे उत्तर आहे. दीड वितीची पोटाची खळगी भरण्यासाठी ही सगळी धडपड सुरू असते. अर्थात आपण एकट्याने खाण्याचा उद्देश नसतो तर संपूर्ण कुटुंबाला जगवण्याचा यात उद्देश असतो. खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये यावरून बरेचदा वाद होत असतात. पण सुख म्हणजे तरी काय असते. याचा सर्वांनी विचार करायला हवा. नोकरी असो अथवा व्यवसाय, प्रत्येकजण आपल्या कुटुंबासाठी राबत असतो. त्यासाठी त्याला कष्ट हे करावेच लागतात. काम करत असताना वाद हे होणारच! असाच वाद नुकताच एका संस्थेत घडला. काम करता करता एका कर्मचार्याला भूक लागली आणि घरून आणलेला डबा घेऊन तो जेवणाच्या जागेकडे निघाला. मॅनेजर म्हणजेच साहेब या प्रकारचे लोक खासगी असो की सरकारी नोकरी असो, तिथे असतातच. या कर्मचार्याला मॅनेजरने तो जेवणासाठी जात आहे हे पाहिले. तत्काळ त्याला थांबवले आणि आधी काम पूर्ण करा आणि मग जेवायला जा, असा आदेश दिला.
आपण जे काम करत आहोत ते खाण्यासाठी करत आहोत आणि मला भूक लागली आहे, त्यामुळे मी जेवायला जात आहे, असे बाणेदार उत्तर देऊन तो कर्मचारी आधी जेवणासाठी निघून गेला. या कर्मचार्याची ही सडेतोड प्रतिक्रिया सध्या सर्वत्र व्हायरल झालेली आहे. साहेबांचा एवढा धाक असतो की, कर्मचारी जेवत असेल तर त्याला उठून आधी काम करावे लागते. फार काही नाही तर किमान साहेबांचा फोन जेवताना उचलावा लागतो. भारतामध्ये संगणक कंपन्या आल्या असल्या आणि त्या जागतिक पातळीवरच्या असला तरी साहेब ही प्रवृत्ती मात्र खासगी कंपन्यांमध्येसुद्धा आहे.
अशा प्रकारामध्ये मॅनेजरची पण काही चूक असते असा भाग नाही. नेमून दिलेले काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी त्याच्यावर असते. त्यामुळे तोही प्रेशरमध्ये असतो. असे सगळेच लोक दबावाखाली काम करत असतील तर कधी ना कधी तरी त्याचा स्फोट होणारच असतो. भारतीय कंपन्या बक्कळ पगार देत असल्या तरी कामही तितक्याच कौशल्याने करण्याची अपेक्षाही असते. त्यामुळेच आजकाल संगणक अभियंते घरून काम करत असले तरी त्यांना एकही मिनिट वेळ मिळू शकत नाही.
आपण काम करतो ते पोटासाठी या तत्त्वावर ज्या कर्मचार्यांची श्रद्धा आहे, ते जेवण वेळच्या वेळी करतात आणि कंपनीचे काम जेवणापेक्षा महत्त्वाचे समजणारे कर्मचारी दिवसाचे 15 तास काम करत असतात. इतके कष्ट करणारे आमचे महानगरामधील कर्मचारी पाहिले तर ग्रामीण भागातील संथ जीवनात समाधानाने भाजी भाकरी खाणारे लोक अधिक सुखी आहेत असे म्हणावे.