

सालाबादप्रमाणे यावर्षीही मुंबईमध्ये दहीहंडी जोरदार साजरी झाली. काय ते गोविंदांचे अफाट थर, काय तो डीजेचा आवाज, काय त्या नाचणार्या नृत्यांगना सगळेच काही अद्भुत होते. यावर्षीचा दहीहंडीचा उल्हास काही वेगळाच होता, असे तुला वाटत नाही का?
अरे ते तेव्हाच लक्षात आले, जेव्हा प्रत्येक दहीहंडीला राजकीय मंडळींनी भेटी दिल्या. लाखो रुपयांची बक्षिसे आणि करोडो रुपये खर्चून दहीहंडी साजरी केली गेली. मुंबई आणि पुण्यामध्ये असलेले हे दहीहंडीचे लोणी म्हणजेच लोण आता राज्यभर पसरलेले आहे. माखनचोर कृष्ण कन्हैयाचे बॅनर वरील फोटो आणि त्यासोबत असलेले नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे फोटो पाहून माखन खाण्यास कोण उत्सुक आहे, हे ओळखू येत होते. यावर्षीच्या कोणत्याही सणाला फंडिंग कमी पडणार नाही, हे निश्चित.
मित्रा, मी काय म्हणतो, फंडिंग का नाही कमी पडणार? काही विशेष कारण आहे का? होय तर. विशेषच कारण आहे आणि ते म्हणजे मुंबई आणि पुणे महानगरपालिकांच्या निवडणुका दिवाळीनंतर येऊ घातल्या आहेत. यावर्षीची दहीहंडी ही मतांची हंडी होती, यात मला तरी शंका राहिलेली नाही.
निवडणुकांचा आणि दहीहंडीचा काय संबंध? मला लक्षात नाही आला. हे बघ, येणार्या मनपा निवडणुकांसाठी असणार्या इच्छुकांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. कोणत्या ना कोणत्या पक्षाचे तिकीट मिळवून बरेच मोठे कार्यकर्ते निवडणूक लढविण्यास सज्ज झालेले आहेत. तिकीट मिळवण्याची खटपट आतापासूनच सुरू आहे. भव्य-दिव्य अशा दहीहंडीचे आयोजन करून इच्छुक उमेदवार केवळ जनतेचेच नव्हे, तर आपल्या पक्षश्रेष्ठींचेही लक्ष वेधून घेत आहेत. पक्षाचे तिकीट मिळाले की निवडणूक सोपी जाते. यावर्षीची मुंबई मनपाची निवडणूक विशेष अटीतटीची होणार आहे. म्हणजे बघ, दोन भाऊ एकत्र आले आणि त्यांनी दोघांची युती करून निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे.
आघाडी आणि युती या निवडणुकांमध्ये होणार की नाही, हे अजून निश्चित नाही; परंतु दोन्ही बंधू एकत्र निवडणूक लढवणार, हे त्यांनी जाहीर केलेले आहे. साहजिकच या दोन बंधूंना नेस्तनाबूत करण्यासाठी बाकीच्यांनी पण जोरदार तयारी केलेली आहे. बरं, म्हणजे तू म्हणतोस त्याप्रमाणे हा लोण्याचा गोळा मटकाविण्यासाठी दहीहंडीवर अमाप पैसा खर्च केला आहे केला गेला आहे. बरोबर? अगदी अचूक. दहीहंडीला जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करून त्यांच्यासमोर कर्तृत्व दाखवण्याची संधी इच्छुक नगरसेवकांनी साधली आहे. याशिवाय बरेच इच्छुक असे आहेत की, कोणत्याही पक्षाचे तिकीट नाही मिळाले, तर बंडाचा झेंडा उभारत अपक्ष म्हणून उभे राहण्याची पण त्यांची तयारी आहे. अशी तयारी असते तेव्हा आतापासूनच लाखो रुपये खर्च करण्याची मानसिकता त्यांनी केलेली असते.