चित्त्यांची चिंता

चित्त्यांची चिंता

भारतीय जंगलात चित्त्यांची संख्या वाढविण्याची मोहीम जेवढी कठीण आहे, तितकीच नैसर्गिक समतोल राखण्यासाठी महत्त्वाची आहे. सात दशकांपूर्वी भारतातून चित्ता नाहीसा झाला आणि त्यानंतर देशातील प्रत्येक पिढीला प्रत्यक्षपणे चित्ता दिसणारच नाही का? असे वाटू लागले. मात्र, गेल्यावर्षी केंद्र सरकारने पुढाकार घेत आफ्रिकेतून चित्ते आणले. दुर्दैवाने काही जणांच्या मृत्यूमुळे या मोहिमेला गालबोट लागले. परंतु, आपण एवढ्यावरच अभियानाच्या यशापयशाचे मोजमाप न करता संयम बाळगत चित्ता वृद्धीसाठी आणखी वाट पाहणे संयुक्तिक ठरेल.

चित्त्याबाबत संवेदनशील राहण्याबरोबरच सरकारकडून होणार्‍या प्रयत्नांत संभाव्य आणि झालेल्या चुका सुधारण्याचेदेखील काम होत आहे. एकीकडे अशा प्रकारच्या घटनांनी दु:खी होणार्‍या लोकांची संख्या बरीच आहे. त्याचवेळी काही लोक हा प्रयत्न यशस्वी करण्यासाठी झटत असून, त्याच्या मेहनतीवर सर्वांनी गांभीर्याने विचार करायला हवा. 17 सप्टेंबर 2022 रोजी भारतात चित्ते आणले आणि त्यानंतर एकानंतर एक अशा 8 चित्त्यांचा मृत्यू झाला. यात पाच मोठ्या चित्त्यांचा समावेश होता आणि ते आयात केलेले होते. तसेच तीन बछड्यांचा जन्म भारतात झालेला होता. गेल्या आठवड्यातील चित्त्याच्या मृत्यूनंतर टीका बरीच झाली. मात्र, सरकारने यावर स्पष्टीकरण दिले आहे. चित्त्याचा मृत्यू हा संसर्गामुळे नसून, त्याच्या मानेवर बांधलेल्या रेडिओ कॉलरमुळे झाला आहे. राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाने कुनोतील सर्वच चित्त्यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे म्हटले आहे. यावेळी पर्यावरण, वन मंत्रालयाने आफ्रिकेतील अनुभवाचा दाखला दिला आहे. तेथे प्रारंभी चित्त्यांचे बस्तान बसवताना पहिल्या टप्प्यात 50 टक्के मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.

चित्ता मोहीम हाताळणार्‍या राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाला या अभियानाबाबत विश्वास असून, देशात चित्त्यांचा संचार वाढेल, असे ठाम मत आहे. अभियान सुरू होऊन एक वर्षदेखील झाले नाही आणि त्याला आताच अपयशी असल्याची पावती देणे चुकीचे राहू शकते. अर्थात, चित्त्यावरून काही अफवा आणि तर्क-वितर्क बांधले जात आहेत. चित्त्याच्या अनेक जाती भारतात होत्या. त्यामुळे भारतात चित्त्याला अनुकूल वातावरण नाही, असे म्हणणेही संयुक्त नाही. चित्त्याचा स्वभाव हा नाजूक आणि संवेदनशील आहे. त्यांना मूळ देशातील वातावरण आणि अन्य ठिकाणचे वातावरण यातील तफावतीचा अनुभव आला असेल. मात्र, अजूनही 11 चित्ते आठ ते दहा महिन्यांपासून भारतीय जंगलात संचार करत आहेत. पाच चित्त्यांत एका बछड्याचादेखील समावेश आहे. त्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे.

चित्ता संरक्षण आणि संवर्धन करणे ही दीर्घकालीन योजना असून, यासाठी आपल्याला आणखी संयम बाळगायला हवा. चित्त्याला वाचविण्यासाठी नैसर्गिक रूपाने उपाय केले जात आहेत. त्यास मोठ्या गवतात सोडत रात्र-दिवस लक्ष ठेवून वाचविण्याचे प्रयत्न होऊ शकतात. सध्या असेच प्रयत्न पाहावयास मिळत आहेत; पण कुनोत नैसर्गिक रूपाने चित्त्यांची संख्या जेव्हा वाढेल तेव्हाच या अभियानाला यश येईल. भारतीय तज्ज्ञ सातत्याने आंतरराष्ट्रीय चित्ता तज्ज्ञ, दक्षिण आफ्रिका आणि नामिबियाचे पशुवैद्यकीय अधिकारी संपर्क करत आहेत. चित्त्याचे पोषण चांगल्यारीतीने होण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. कोणावर खापर फोडण्याची ही वेळ नाही. या देशात सात दशकांपूर्वी हजारो चित्ते होते आणि त्यांना निर्दयतेने संपविण्यात आले. त्यावेळी आपण संवेदनशील राहिलो असतो, तर चित्ते आयात करण्याची वेळ आली नसती. आजघडीला एक एक चित्ता मौल्यवान असून, त्याचे जीवनही तितकेच अमूल्य आहे. भारत सरकारने कुनो अभयारण्यात स्थानिक अधिकार्‍यांशिवाय समन्वयासाठी एक 'एनटीसीए'ची टीमही तैनात केली. आपल्या तज्ज्ञांवर आणि त्यांच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवायला हवा. देशाचे महत्त्वाकांक्षी अभियान पारदर्शक ठेवण्याबरोबरच चित्ते संरक्षण आणि संर्वधन करण्याची क्षमताही सिद्ध करायला हवी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news