‘एमपीएससी’ परीक्षेतील बदल

‘एमपीएससी’ परीक्षेतील बदल
Published on
Updated on

[author title="अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी" image="http://"][/author]

राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणार्‍या राज्यसेवा मुख्य परीक्षेत वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासूनच लागू केला जाईल, अशी माहिती आयोगाने दिली आहे. काही विद्यार्थ्यांनी आयोगाकडे माहितीच्या अधिकाराअंतर्गत याविषयी विचारणा केली होती. 'एमपीएससी'च्या या उत्तरामुळे समाजमाध्यमांत असलेल्या परीक्षा पॅटर्नसंबंधित संभ्रमाला पूर्णविराम मिळाला.

24 जून 2022 रोजी राज्य लोकसेवा आयोगाने सर्वप्रथम हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. हा निर्णय जाहीर करण्यापूर्वी तीन सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. 'यूपीएससी' परीक्षेच्या धर्तीवर 'एमपीएससी'ची मुख्य परीक्षादेखील वर्णनात्मक केली जाईल; मात्र नव्या पॅटर्ननुसार अभ्यासाला पुरेसा वेळ मिळणार नाही, अशी तक्रार परीक्षा देणार्‍या काही विद्यार्थ्यांनी केली. शिवाय मागील 4-5 वर्षांपासून तयारी करत असताना परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची होती. आता वर्णनात्मक परीक्षेची तयारी करताना अभ्यास पद्धतीत बदल करण्यास पुरेसा वेळ मिळावा, अशी त्यांची मागणी होती. ही मागणी लक्षात घेता, आयोगाने 31 जानेवारी, 2023 रोजी आपल्या निर्णयात सुधारणा केली आणि परीक्षेचा हा नवा पॅटर्न 2025 च्या परीक्षेपासून लागू करण्याचा निर्णय घेतला. आता आयोगाने हा पॅटर्न 2025 पासून लागू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

नव्या पॅटर्ननुसार वर्णनात्मक परीक्षेत एकूण नऊ पेपर असतील. निबंध, सामान्य अध्ययनाचे 4 पेपर, वैकल्पिक विषयाचे 2 पेपर आणि मराठी-इंग्रजीचे दोन भाषा पेपर असे स्वरूप असेल. मुख्य परीक्षेचा टप्पा पार करत मुलाखतीला पात्र होणार्‍या विद्यार्थ्यांची मुलाखत 275 गुणांची असेल.

'एमपीएससी'मार्फत महाराष्ट्राचे प्रशासन चालवणार्‍या कर्तबगार अधिकार्‍यांची निवड केली जाते, म्हणून या नागरी सेवा परीक्षा किती गंभीर आहेत, याचे भान आयोगासहित परीक्षेची तयारी करणार्‍या युवकांनीही बाळगायला हवे.

पूर्वपरीक्षेतली 'माहिती' आणि मुख्य परीक्षेतील 'ज्ञान' यांच्यातला मुख्य फरक म्हणजे असलेल्या माहितीचा वापर करून अन्वयार्थ लावता येणे, समोर येणार्‍या मुद्द्यांच्या दोन किंवा त्याहून जास्त बाजू असतात; मन आणि बुद्धी खुली ठेवून त्या सर्व बाजू समजून घेणे, त्यावर स्वतंत्र बुद्धीने विचार करणे, त्याआधारे निःपक्षपातीपणाने एका निर्णयावर येणे आणि झालेली सर्व प्रक्रिया नेमक्या आणि योग्य शब्दांत मांडता येणे, हे कौशल्य उद्या ज्याला अधिकारी होण्याची इच्छा आहे, त्याच्याजवळ असणे अत्यावश्यक आहे. त्यासाठीच मुख्य परीक्षा लेखी, निबंधवजा हवी. परीक्षा देणार्‍याच्या व्यक्तिमत्त्वातील या कौशल्याचा तिथे कस लागायला हवा.

म्हणून, 'एमपीएससी' नागरी सेवा परीक्षेची तयारी करणार्‍या युवकांचे काम – आता त्याप्रमाणे अभ्यासाला लागा! नागरी सेवा परीक्षा ही कुणाच्या वैयक्तिक करिअरसाठी नाही. ही लोकसेवा आहे. या परीक्षेला ज्यांना सामोरे जायचे आहे त्यांना परीक्षेची उत्तम तयारी करून, स्वतःमध्ये बदल करून, परीक्षेला सामोरे जाणे जमलेच पाहिजे! तरच ते उद्या प्रशासनात वेळोवेळी येणारी आव्हाने पेलू शकणार आहेत.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या सर्वच युवकांनी या सगळ्याचे भान ठेवून स्वतःला घडवले पाहिजे, स्वतःचे व्यक्तिमत्त्व समृद्ध केले पाहिजे आणि येणार्‍या काळाची आव्हाने स्वीकारण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. सामान्य अध्ययनचा चौथा एथिक्स, इंटिग्रिटी, अ‍ॅप्टिट्यूडचा पेपर हेदेखील त्याद़ृष्टीने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. या बदलांमुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होणार आहे. तर असे स्वच्छ आणि कार्यक्षम प्रशासन आम्ही चालवू आणि महाराष्ट्र-भारताचे, म्हणजेच लोकांची सेवा करणारे 'कार्यकर्ता अधिकारी' होऊ, अशा जिद्दीने, तडफेने सर्वांनीच अभ्यासाला लागावे यासाठी अनेक, कायमच्याच – सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news