

मुरलीधर कुलकर्णी
यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक बेल्जियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ फ्रान्सिस हाल्झेन यांना जाहीर झाले. ‘आईसक्यूब न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरी’ मधील त्यांच्या क्रांतिकारी योगदानासाठी आणि अंतराळातील उच्च ऊर्जा न्यूट्रिनोच्या शोधासाठी त्यांना हा बहुमान मिळाला आहे. विशेष म्हणजे, १९९२ नंतर प्रथमच भौतिकशास्त्राचा हा नोबेल पुरस्कार संयुक्तपणे न देता केवळ एकाच व्यक्तीला प्रदान करण्यात आला आहे, यावरून या संशोधनाची महती स्पष्ट होते.
फ्रान्सिस हाल्झेन यांचा जन्म २३ मार्च १९४४ रोजी बेल्जियममधील लेउव्हेन शहरात झाला. त्यांचे कुटुंब शैक्षणिक आणि बौद्धिक वातावरणाशी जोडलेले होते. लहानपणापासूनच त्यांना विज्ञान, खगोलशास्त्र आणि निसर्गाच्या गूढ नियमांबद्दल कमालीचे कुतूहल होते. त्यांचे शालेय आणि उच्च महाविद्यालयीन शिक्षण बेल्जियममध्येच झाले. त्यांनी कॅथॉलिक युनिव्हर्सिटी ऑफ लेउव्हेन मधून भौतिकशास्त्रात आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीपासूनच भौतिकशास्त्राच्या क्लिष्ट सिद्धांतांमध्ये विशेष रुची असल्यामुळे त्यांनी संशोधन क्षेत्रातच आपले करिअर घडवण्याचा निर्णय घेतला. पुढे संशोधनाच्या ओढीने ते अमेरिकेत स्थायिक झाले आणि सध्या ते विसकॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
फ्रान्सिस हाल्झेन यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक टप्पा म्हणजे अंटार्क्टिकाच्या गोठवणाऱ्या बर्फाखाली IceCube Neutrino Observatory नावाच्या जगातील सर्वात मोठ्या न्यूट्रिनो दुर्बिणीच्या कल्पनेचे आणि प्रकल्पाचे नेतृत्व करणे होय. न्यूट्रिनो हे अत्यंत सूक्ष्म उपअणू कण आहेत, ज्यांना कोणताही विद्युत भार नसतो आणि त्यांचे वस्तुमान नगण्य असते. हे कण मानवी शरीरातून किंवा संपूर्ण पृथ्वीवरून सेकंदाला काही ट्रिलियनच्या संख्येने न अडकता आरपार निघून जातात, म्हणूनच त्यांना ‘गोस्ट पार्टिकल्स’ किंवा ‘भूत कण’ म्हणून ओळखले जाते. विश्वाच्या दूरच्या कोपऱ्यातील ब्लॅक होल किंवा सुपरनोव्हासारख्या अतिकठीण ठिकाणांवरून प्रवास करून येणारे हे कण कुठेही न थकता थेट पृथ्वीवर पोहोचतात. विश्वाच्या उत्पत्तीचे मूळ शोधण्यासाठी हे कण अत्यंत महत्त्वाचे दुवे मानले जातात; परंतु ते अदृश्य आणि कशाशीही न चिकटणारे असल्यामुळे त्यांचा अभ्यास करणे हे वैज्ञानिकांसमोर मोठे आव्हान होते.
या समस्येवर मात करण्यासाठी हाल्झेन यांनी अंटार्क्टिकाच्या एका घन किलोमीटर बर्फाखाली हजारो सेन्सर्स पसरवून ही अनोखी दुर्बीण उभी केली. जेव्हा एखादा न्यूट्रिनो बर्फातील अणूंच्या केंद्रांशी आदळतो, तेव्हा निर्माण होणाऱ्या सूक्ष्म निळ्या प्रकाशाला हे सेन्सर्स टिपतात. त्यांच्या या अभूतपूर्व प्रकल्पामुळे ‘न्यूट्रिनो अॅस्ट्रॉलॉजी’ या नवीन शाखेचा जन्म झाला. त्यांच्या या क्रांतिकारी संशोधनामुळे शास्त्रज्ञांना आपल्या आकाशगंगेव्यतिरिक्त इतर दूरवरच्या आकाशगंगांमधून येणाऱ्या उच्च ऊर्जा न्यूट्रिनोचे पहिले थेट पुरावे मिळाले.
आपल्या खडतर आणि प्रेरणादायी वैज्ञानिक प्रवासात फ्रान्सिस हाल्झेन यांना जगभरात अनेक प्रतिष्ठित मानसन्मान लाभले आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संस्थांनी त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांना गौरव, फेलोशिप्स आणि पदके प्रदान केली आहेत. आता त्यांना मिळालेले नोबेल पारितोषिक हे त्यांच्या अनेक दशकांच्या अथक संशोधनाचे आणि वैज्ञानिक निष्ठेचे सर्वोच्च फलित आहे. हाल्झेन यांच्या या महान शोधामुळे मानवतेचा विश्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला असून, खगोलशास्त्रात एका नवीन युगाची पायाभरणी झाली आहे, असे म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही.