

आली, आली, आली, बीड जिल्ह्यात रेल्वे आली. 1965 या वर्षापासून बीडमध्ये रेल्वे येण्याची चर्चा सुरू होती. त्याला आता सुमारे साठ वर्षे उलटून गेली आहेत. प्रत्येक निवडणुकीमध्ये बीडमध्ये रेल्वे येणार का, हा एक कळीचा मुद्दा असायचा. ती रेल्वे बीडमध्ये येण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून मराठवाडा मुक्ती दिन म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी बीडमध्ये रेल्वेचे अधिकृत आगमन होणार आहे. बीडमध्ये रेल्वे येण्यापूर्वी कोकण रेल्वेसारखे प्रचंड अवघड असे प्रकल्प पूर्ण करण्यात आले. जम्मू-काश्मीरसारख्या पहाडी भागातसुद्धा रेल्वे पोहोचली; परंतु बीड रेल्वेच्या नकाशावर अजिबात नव्हते. ती रेल्वे आता बीडमध्ये येण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे मार्गाचे जाळे अजिबातच नव्हते असे नाही. परळी येथून हैदराबाद आणि मुंबई या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध होत्या. एकंदरीत बीडकरांना मात्र रेल्वे प्रवासाची उत्कंठा आहे. कारण, त्यांना त्याची बालपणापासूनच सवय नाही. एखाद्या बीडच्या मुलाने रेल्वे पाहण्याचा हट्ट वडिलांकडे केला, तर त्याला बसचे तिकीट काढून परळीला जावे लागत असे. आता बीड-अहमदनगर रेल्वेने जोडले गेल्यामुळे बीडकरांना संपूर्ण भारताबरोबर जोडले जाण्याचा आनंद मिळणार आहे.
संपूर्ण भारतभरात रेल्वेचे जाळे विणले जात असताना बीडकर मात्र अत्यंत दुःखी अंत:करणाने देशाची प्रगती पाहत होते. ज्या भागात रेल्वे पोहोचते, त्या भागाची झपाट्याने प्रगती होते, यात आता कोणालाही शंका राहिलेली नाही. रेल्वे जाणार्या भागातून नाशवंत उत्पादने जसे की फुले, भाज्या, धान्य तातडीने देशाच्या इतर भागांमध्ये पोहोचवता येतात. महाराष्ट्रासाठी जवळपास सव्वा कोटी लोकसंख्येची मुंबई हे एक फार मोठे मार्केट आहे. मुंबईतील लोकांची अन्नधान्याची, दुधाची, भाज्यांची गरज पूर्ण महाराष्ट्र पुरवत असतो. रेल्वेच्या आगमनाबरोबरच बीडकरांसाठी प्रगतीची कवाडे खुली झाली आहेत, असे म्हणायला हरकत नाही. पर्यटन, तीर्थाटन, व्यापार, व्यवसाय, मालाची ने-आण या सर्वांसाठी रेल्वेचा नवीन पर्याय बीडकरांसाठी उपलब्ध झाला आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.
बीड हे माहेर असणार्या आणि पुणे, मुंबई, नगर या भागात नांदणार्या लेकी-बाळींसाठी आता माहेरी जाणे सोपे आणि आरामदायक होणार आहे. बीडमध्ये आजोळ असणार्या बालकांना आता ‘झूक झूक गाडी’ने मामाच्या गावाला जाण्याची सोय झालेली आहे. येणार्या काळात रेल्वेच्या जाळ्याच्या माध्यमातून बीडची झपाट्याने प्रगती झालेली पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे. हो- नाही करता करता तब्बल साठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रेल्वे बीडमध्ये येत आहे, यासाठी समस्त बीडकर आता आनंदात आहेत.