

प्रकाश गायकवाड
पाकिस्तानच्या इतिहासात अनेक दशकांपासून धुमसत असलेला बलुचिस्तानचा संघर्ष आता एका नव्या आणि अधिक धोकादायक वळणावर पोहोचला आहे. या संघर्षाची आग आता केवळ बलुचिस्तानपुरती मर्यादित न राहता खैबर पख्तुनख्वाच्या अशांत आदिवासी पट्ट्यातही पसरली आहे. तेथे दडपशाही करणारे पाकिस्तानी लष्कर आणि बलूच स्वातंत्र्य समर्थक यांच्यातील हा संघर्ष आता नव्या भौगोलिक क्षेत्रात पोहोचल्याने डबघाईला आलेल्या पाकसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.
या संघर्षाची मुळे 1948 मध्ये बलुचिस्तानच्या पाकिस्तानमधील वादग्रस्त विलीनीकरणात रुजलेली आहेत. तेव्हापासून बलूच राष्ट्रवादी गट आपल्या प्रदेशातील नैसर्गिक संसाधनांचे शोषण, राजकीय आणि आर्थिक उपेक्षा आणि पाकिस्तानी लष्कराकडून होणार्या दडपशाहीविरोधात आवाज उठवत आहेत. बलुचिस्तानमध्ये गॅस, सोने आणि तांब्याचे प्रचंड साठे असूनही तेथील जनता गरिबी आणि मागासलेपणाच्या छायेत जगत आहे. या ऐतिहासिक अन्यायामुळेच अनेक सशस्त्र गटांचा उदय झाला, जे स्वातंत्र्यासाठी लढत आहेत.
सद्यस्थितीत बलूच बंडखोर गटांनी आपली रणनीती बदलून आता खैबर पख्तुनख्वामध्ये पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. हे क्षेत्र आधीच तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानसारख्या गटांमुळे अस्थिर आहे. बलूच गट आणि टीटीपी यांचे अंतिम ध्येय वेगळे असले, तरी पाकिस्तानी लष्कर हा त्यांचा समान शत्रू आहे. त्यामुळे या दोन गटांमध्ये सामरिक आघाडी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तानी लष्कराकडून या बंडखोरीला नेहमीच बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. ‘एन्फोर्स्ड डिसअपिअरन्सेस’ म्हणजेच लोकांना सक्तीने गायब करणे, हे या प्रदेशातील एक भीषण वास्तव बनले आहे; मात्र दडपशाहीमुळे हा संघर्ष अधिकच चिघळला आहे. आता खैबर पख्तुनख्वामध्ये सुरू झालेल्या नव्या आघाडीमुळे पाकिस्तानी लष्कराला दोन आघाड्यांवर लढावे लागत आहे.
बलूच लिबरेशन आर्मीला बलुचिस्तानचे स्वातंत्र्य हवे आहे. अनेक वांशिक विद्रोही गटांपैकी हा सर्वात मोठा गट आहे, जो अनेक दशकांपासून पाकिस्तान सरकारशी लढत आहे. या संघटनेचे म्हणणे आहे की, सरकार बलुचिस्तानच्या समृद्ध वायू आणि खनिज संसाधनांचे अन्यायकारकरीत्या शोषण करत आहे. बीएलएला पाकिस्तान, इराण, चीन, बि—टन, अमेरिका, संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन युनियनने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. केवळ लष्करी बळाचा वापर करून हा प्रश्न सुटणार नाही, हे इतिहासाने सिद्ध केले आहे. बलूच जनतेच्या राजकीय आणि आर्थिक हक्कांचा सन्मान करून त्यांच्याशी प्रामाणिक संवाद साधणे हाच या संघर्षावरचा एकमेव शाश्वत उपाय आहे. अन्यथा, बलुचिस्तानमधून निघालेली ही संघर्षाची आग पाकला कवेत घेऊ शकते.