

महाराष्ट्रातून प्रकाशित होणार्या दै. ‘पुढारी’ या मराठी वृत्तपत्राचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे ‘सिंहायन : पाच तपांचे पर्व’ हे समग्र आत्मचरित्र आहे. प्रतापसिंह जाधव यांच्या जीवनाचे अंतरंग आणि त्याची व्याप्ती एवढी प्रचंड आहे की, एक सहस्र पृष्ठे व्यापूनही दशांगुळे उरलेले आहे. कारण, जिथे या ग्रंथाच्या शेवटच्या पृष्ठावर ‘समाप्त’ असं छापलेलं आहे, तिथून पुढेही त्यांचा जीवनप्रवास अखंडितपणे चालूच राहणार आहे. या आत्मचरित्राचे शीर्षक ‘सिंहायन : पाच तपांचे पर्व’ असे असले, तरी प्रत्यक्षात हे साडेसात तपांचे पर्व आहे. कारण, प्रतापसिंहांच्या कारकीर्दीचा काळ साठ वर्षांचा असला, तरी प्रतापसिंह आपली आत्मकथा सांगायला सुरुवात करतात तीच मुळी आपल्या बालपणापासून आणि तसे पाहता प्रतापसिंहांच्या एकूण पाच तपांच्या कारकिर्दीइतकीच त्यांच्या बालपणीच्या आणि तरुणपणीच्या दीड तपाची कहाणीसुद्धा तेवढीच रोचक, रंजक आणि रोमांचक आहे.
त्यांचे सुमारे ऐंशी वर्षांचे जीवनगाणे एका कालखंडाचे जणू खंडकाव्यच बनून गेलेलं आहे. त्यांच्या ऐंशी वर्षांच्या जीवन प्रवासात एका वास्तवस्पर्शी नाट्याची अनुभूती वाचकाला आल्याशिवाय राहत नाही. आत्मचरित्राच्या पहिल्या पृष्ठापासूनच त्यांचा जीवन चित्रपट आपल्यासमोर उलगडत जातो. अगदी पहिल्या प्रकरणापासूनच आपण त्यात गुंतत जातो आणि पुढे कधी हरवून जातो, ते आपल्याला समजतच नाही. वृत्तपत्र हा लोकशाहीचा चौथा खांब असल्यामुळे त्या खांबाला बळकटी देण्यासाठीच नियतीनं प्रतापसिंहांना जन्माला घातले असावे. पत्रकारितेचा वारसा तर त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच लाभला होता. असंही म्हणता येईल की, प्रतापसिंहांच्या जन्माआधीच दै. ‘पुढारी’ला जन्माला घालून प्रकृतीनं प्रतापसिंहांच्या पत्रकारितेची आगाऊच व्यवस्था करून ठेवली होती. त्यामुळेच प्रतापसिंहांचं बालपण हे केवळ घराच्या अंगणातच नव्हे, तर ‘पुढारी’च्या प्रांगणातही बागडण्यात गेलं.
खरं तर, प्रतापसिंहांना आधी वकीलच व्हायचं होतं. म्हणून त्यांनी कायद्याची पदवी घेतली; परंतु नंतर त्यांना असं वाटू लागले की, कोर्टामध्ये वकिली करून खर्याचं खोटं करण्यापेक्षा सत्याची बाजू घेऊन समाजाची वकिली करावी आणि मग त्यासाठी पत्रकारितेइतका अन्य कुठला मार्ग असेल बरं? 1969 मध्ये त्यांनी ‘पुढारी’ची धुरा सांभाळली आणि तेव्हापासून आजतागायत ते समाजाचीच वकिली करत आलेले आहेत. एक संपादक म्हणून प्रतापसिंहांनी जसे लेखणीनं लढे दिले, तसेच ते प्रत्यक्ष रस्त्यावरही दिले. त्यांच्या सामाजिक संघर्षाच्या सत्य कथा या आत्मचरित्राच्या पानापानांवर पेरल्या गेलेल्या आहेत. उद्याच्या पिढ्यांना त्या प्रेरणादायी ठरतील, यात शंकाच नाही.
सामाजिक कार्याबरोबरच प्रतापसिंहांचा राजकारणाशीही अत्यंत जवळून संबंध आलेला आहे. खरं पाहता प्रतापसिंहांचे हे आत्मचरित्र म्हणजे 1969 ते 2025 या कालखंडातील भारतीय राजकारणाचा एनसायक्लोपीडियाच आहे, असं म्हटलं, तर ते अतिशयोक्तीचं होऊ नये. कारण, इंदिरा गांधींपासून ते थेट नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीपर्यंतच्या राजकारणातील उलाढालींचा, उलथापालथींचा, कटकारस्थानांचा ज्वलंत इतिहास या आत्मचरित्राच्या रूपाने आपल्याला वाचायला मिळतो. या सर्व राजकीय घटनांचे प्रतापसिंह जाधव हे एक पत्रकार म्हणून साक्षीदार राहिलेले आहेत. जेव्हा ‘पापाराझी’ हा शब्दही जन्माला आलेला नव्हता, तेव्हा प्रतापसिंहांनी अत्यंत कौशल्यानं शोधपत्रकारिता राबवलेली होती. त्यांनी अनेक नेत्यांना जवळून अभ्यासलेलं आहे. ‘पुढारी’च्या सुवर्ण महोत्सवाला तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरला आले होते, तर ‘पुढारी’च्या अमृत महोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आवर्जून उपस्थित राहिले होते. यातूनच प्रतापसिंहांचे राजकीय हितसंबंध लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत.
सामाजिक लढा देणं म्हणजे केवळ चळवळ राबवणे नव्हे, तर सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन समाजसेवा करणे होय! या गोष्टीची कल्पना प्रतापसिंहांना जात्याच होती. किंबहुना त्याचे बाळकडू त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच मिळालेले होतं. त्याच भावनेतून त्यांनी गुजरातमधील आधोई या गावी भूकंपाने जी प्रचंड हानी झाली, त्यासाठी प्रतापसिंहांनी मोठा निधी उभारला आणि त्या निधीतून तिथे एक मोठे हॉस्पिटल बांधून दिले. त्यांच्या हातून झालेलं अत्यंत महत्त्वाचे कार्य म्हणजे, त्यांनी सियाचीन येथे बांधून दिलेले लष्करी हॉस्पिटल होय. हे ऐतिहासिक हॉस्पिटल सरकारकडून एकही रुपया निधी न घेता ‘पुढारी’तर्फे सुमारे अडीच कोटींचा निधी उभा करून त्यातून बांधण्यात आले. एका अर्थाने प्रतापसिंहांनी अटकेपारच झेंडा लावला.
प्रतापसिंहांच्या कार्याची नोंद समाजानं आणि शासनानंही घेतलेली आहे. भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा किताब देऊन त्यांचा यथोचित गौरव केलेला आहे. विशेष म्हणजे, त्यांचे वडील ग. गो. जाधव यांनाही भारत सरकारतर्फे पद्मश्री हा किताब बहाल करण्यात आला होता. एकच किताब पिता-पुत्रांना दिल्याची घटना कदाचित पहिलीच असेल. प्रतापसिंह हे मराठी भाषेतील वृत्तपत्र चालवत असले, तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रादेशिक पातळीवरून राष्ट्रीय पातळीवर केव्हाच जाऊन पोहोचलेलं आहे. म्हणूनच त्यांना हिमाचल प्रदेश विद्यापीठानं डॉक्टरेट देऊन त्यांचा यथोचित गौरव केलेला आहे. तसेच त्यांना पत्रकारितेतील सर्वोत्कृष्ट, मानाचा मानला गेलेला पांचजन्य नचिकेता पुरस्कार लाभलेला आहे. तसं पाहता ते अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेले आहेत.
ज्ञान, जिज्ञासा, बुद्धिमता, जिद्द, चिकाटी, द्रष्टेपणा आणि व्यावहारिकता या गुणांच्या बळावर प्रतापसिंहांनी आपले साम्राज्य निर्माण केलं आणि पुत्र योगेशच्या रूपाने त्या साम्राज्याला अत्यंत सक्षम असा वारसही दिला. हे आत्मचरित्र वाचल्यानंतर येणार्या पिढ्यांच्या मनामध्ये नवी उमेद निर्माण होऊन ते प्रतापसिंहांचा आदर्श घेतील, यात तिळमात्रही शंका नाही.