आरोग्य क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता

आरोग्य क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता

आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) आरोग्य क्षेत्रातील वापर अलीकडील काळात वाढत आहे. विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया रोबोंच्या माध्यमातून यशस्वी होताहेत. 'एआय'मुळे रोगनिदानात अचूकता वाढली असली, तरी रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील मानवतेचे नाते प्रस्थापित होईलच, असे नाही.तंत्रज्ञानावर वाढती अवलंबिता ही आरोग्य क्षेत्रातील संशोधन आणि डॉक्टरांची कार्यकुशलता आणि दक्षतेवर परिणाम करू शकते. यासाठी सजग राहण्याची गरज आहे.

मानवी शोधातून निर्माण झालेल्या 'एआय'पासून आजकाल कोणतेच क्षेत्र अपवाद राहिलेले नाही. शाळा, महाविद्यालयात 'एआय' संचलित रोबो टिचर मुलांना शिकविण्याचे काम करत आहेत. वृत्तवाहिन्यांवरच्या बातम्या आता रोबो अँकर सांगत आहेत. मग यास वैद्यकीय क्षेत्र कसे दूर राहील. आता रोबो आणि 'एआय'च्या मदतीने शस्त्रक्रिया आणि आजाराचे निदान केले जात आहे. डॉक्टरना आपल्याकडे नेहमीच ईश्वराच्या स्थानी मानले आहे आणि डॉक्टरही मानवतेच्या द़ृष्टीने रुग्णसेवा करत असतात. या पार्श्वभूमीवर 'एआय'मुळे रोगनिदानात अचूकता वाढली असली, तरी रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील मानवतेचे नाते प्रस्थापित होईलच असे नाही. 'एआय'संबंधित बातम्यांचे आकलन केल्यास, आगामी काळात 'एआय' हा डॉक्टरला पर्याय राहील का? असा प्रश्न निर्माण होत आहे. हा प्रश्न गैर नाही कारण 'एआय'मुळे जगभरातील कोट्यवधी लोकांना रोजगारावर पाणी सोडावे लागले आहे. विषय बातम्यांचा निघाला म्हणून, इथे अमेरिकेचे उदाहरण देता येईल. तेथे एक चार वर्षांच्या मुलीच्या आजाराचे निदान 17 डॉक्टरांना करता आले नाही. मात्र 'एआय' टू चॅट-जीपीटीने मणक्याच्या हाडांशी संबंधित न्यूरोलॉजिकल सिंड्रोम ट्रेथर्ड कॉर्ड नावाचा आजार शोधून काढला.

दुसरी बातमी ही पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट पीजीआय चंदीगडची आहे. तेथे डॉक्टरांनी एक संशोधन केले असून, त्यात 'एआय' तंत्रज्ञानाने रुग्णात होणार्‍या धोकादायक पित्ताशयाच्या कर्करोगाचे निदान केल्याचे म्हटले आहे. एखाद्या अनुभवी रेडिओलॉजिस्ट हा अनेक अहवालांच्या आधारे त्याचे निष्कर्ष काढतो. यानुसार 'एआय'ने त्याचे निदान केले. मेडिकल जर्नल 'द लॅन्सेट'मध्ये प्रकाशित या संशोधनानुसार, रुग्णाच्या वैद्यकीय अहवालाचा एकीकडे 'एआय'चा आढावा घेतला, तर दुसरीकडे दोन अनुभवी रेडिओलॉजिस्टनीही या अहवालाचे विश्लेषण केले. विशेष म्हणजे दोघांचे निष्कर्ष हे सारखेच निघाले. वैद्यकीय क्षेत्रात केवळ 'एआय'चे प्रमाण वाढलेले नाही, तर या क्षेत्रात रोबोटिक सर्जरीचे प्रस्थही वाढत आहे. आरोग्य विज्ञानात 'एआय' आणि रोबोच्या वाढत्या हस्तक्षेपाकडे भारतीय द़ृष्टिकोनातून पाहिले पाहिजे.

जगभरात ज्या रितीने नवनवीन आजार आणि महासाथींचा शोध लागत आहे, तसतसे आरोग्य विज्ञानात संशोधन आणि तंत्रज्ञानाचा विकास होत आहे. आधुनिक आरोग्य विज्ञानाने सुरुवातीपासून ते आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात बर्‍याअंशी संशोधनात्मक विकास केला आहे. त्यामुळे संसर्गजन्य आणि सामान्य आजारांवरदेखील निदान करता आले. आजाराचे निदान होणे ही आरोग्य क्षेत्रातील पहिली पायरी आहे. त्यानंतरच उपचार आणि रुग्णाचे आरोग्य अवलंबून असते. आरोग्य विज्ञानात लस आणि औषधांबरोबरच आरोग्य उपकरणांचाही बराच विकास झाला आहे म्हणून आजघडीला डायग्नोस्टिक इक्यूपमेंट आणि पॅथॉलाजी तपासणीवरच रुग्णांचे उपचार अवलंबून राहत आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सध्याचे डॉक्टर वैद्यकीय शिक्षणाच्या काळात पुस्तकात वाचलेल्या माहितीच्या आधारे लक्षणांना ओळखण्याऐवजी उपकरणावर अवलंबून राहत आहेत. त्याचवेळी जुन्या काळातील डॉक्टर हे एखाद्या रुग्णाच्या आजारपणाचा शोध घेण्यासाठी पुस्तक आणि प्रशिक्षणाचा आधार घेत असत. एकुणातच, डॉक्टरची आजघडीला डायग्नोस्टिक टूल्सवरची अवलंबिता वाढली आहे.

एके काळी डॉक्टर रुग्णाची लक्षणे, आहार आणि वांशिक आजाराची माहिती घेत उपचाराची दिशा निश्चित करत असत आणि पथ्यपाणी सांगत असत. मात्र आज या सर्व गोष्टी एका मशिनमध्ये आणि वेगवेगळ्या वैशिष्ट्यामध्ये विभागलेल्या आहेत. परिणामी, उपचाराचा खर्च हा बराच वाढला आहे. मात्र या परिस्थितीला केवळ एकटा डॉक्टरच नाही, तर वाढती लोकसंख्या, संसर्गजन्य आजारांचा वाढता प्रभाव, संसर्गबाधित रुग्णांची वाढती संख्या, संक्रमणाची तीव्रता, तीव्रतेतील बदल, वैद्यकीय स्रोतांची कमतरता त्याचवेळी रुग्णांचा डॉक्टरांवरचा अविश्वास या गोष्टी कारणीभूत आहेत. साधारणपणे आजकालचे रुग्ण हे डॉक्टरांकडे जाण्याच्याऐवजी स्वत:च पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजिकल तपासणी करून लक्षणाच्या आधारावर औषधांचे सेवन करत आहेत.

वास्तविक, जगभरात वैद्यकीयशास्त्र हे नेहमीच नावीन्यपूर्ण शोध, विकासाचे क्षेत्र राहिलेले आहे. त्यात आजारांपासून बचाव करण्यासाठी लस, जीवाणू आणि विषाणूरोधक औषधांचा शोध, मानवी शरीरातील हार्मोन्स, जीनमधील बदल यावरील संशोधनापासून ते आजार निश्चित करण्यासाठी डायग्नोस्टिक उपकरण विकसित केले आणि त्यात आरोग्य शास्त्रज्ञांनी अभूर्तपूर्व यश मिळविले आहे. अलीकडच्या काळात शस्त्रक्रियेत रोबोटिक सर्जरीच्या रूपातून क्रांती झाली आहे. त्यात सर्जनच्या नियंत्रणाखाली रोबो हा किचकट ऑपरेशनही सहजपणे करताना दिसून येत आहे.

सर्जरीच्या क्षेत्रात ओपन सर्जरीचा पर्याय हा आतापर्यंत लॅप्रास्कोपिक सर्जरीचा होता. मात्र रोबोटिक सर्जरीने शल्य तज्ज्ञांचे काम आणखीच सोपे झाले आहे. संगणकाच्या आधारे रोबोटिक सर्जरीचे संचलन आणि नियंत्रण होते. जगभरातील सर्जन रोबोटिक सर्जरीचे गुणगान गात आहेत आणि हे तंत्रज्ञान कर्करोगासह अन्य कठीण सर्जरीत मॅन्यूअल सर्जरीच्या तुलनेत अधिक अचूक परिणाम हाती देत आहे. नवे शोध आणि संशोधन हे मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यापासून कोणतेच क्षेत्र अपवाद राहिले नाही. भारताच्या द़ृष्टिकोनातून आरोग्य क्षेत्रात एआय आणि रोबोटिक सर्जरीचे परिणाम पाहता, अजूनही आपण द्विधा मन:स्थितीत असल्याचे दिसून येतेकारण भारतात आरोग्य क्षेत्र हे नेहमीच सन्मानाचे क्षेत्र राहिलेले आहे. याठिकाणी डॉक्टरांना देवदूत म्हणून संबोधले जाते. त्यामुळे डॉक्टर आणि रुग्ण हे नव्या तंत्रज्ञानाबरोबर कितपत ताळमेळ बसवू शकतील? हे आगामी काळच सांगू शकेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news