Independence Day of India | स्वतंत्र भारताच्या उभारणीचे शिल्पकार

Independence Day of India |
Independence Day of India | स्वतंत्र भारताच्या उभारणीचे शिल्पकारPudhari File Photo
Published on
Updated on

सी. पी. राधाकृष्णन, उपराष्ट्रपती

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी पर्वात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ज्ञात-अज्ञात वीरांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांच्या शौर्याला अभिवादन करण्याचा हा प्रसंग आहे. त्यांच्या बलिदानातून प्रेरणा घेत विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी राष्ट्रनिष्ठेची ज्योत अधिक प्रखर करूया!

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या या महान घटनेच्या निमित्ताने मी प्रत्येक भारतवासीयाला मनापासून शुभेच्छा देतो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांनी स्वतःचे बलिदान दिले, त्या सर्वांनाही आदरपूर्वक अभिवादन करतो.

गेल्याच आठवड्यात मी अंदमान आणि निकोबार बेटांना भेट दिली. या भेटीत ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा भाग म्हणून मला राष्ट्रध्वज फडकवण्याचा तसेच थोर देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा फडकवलेल्या तिरंग्याला वंदन करण्याचा तसेच त्यांचे स्मरण करण्याचा बहुमान मिळाला. ३० डिसेंबर १९४३ रोजी नेताजींच्या आझाद हिंद सेनेने भारतीय भूभागावर जिथे पहिल्यांदा तिरंगा फडकवला, अगदी त्याच पवित्र भूमीवर उभे राहणे हा माझ्यासाठी अत्यंत भावुक करणारा अनुभव होता. सुभाषचंद्र बोस यांनी पशुपॉन मुथुरामलिंग थेवर यांच्या निमंत्रणावरून सप्टेंबर १९३९ मध्ये मदुराईला भेट दिली होती, त्यांच्या या भेटीचे स्मरणही या घडामोडींनी मला करून दिले. त्यावेळच्या या ऐतिहासिक घडामोडीने या प्रदेशातील असंख्य देशभक्तांना प्रेरणा दिली होती.

राष्ट्रीय स्मारक असलेल्या सेल्युलर कारागृहाला दिलेली भेट हादेखील माझ्यासाठी दुसरा अत्यंत प्रेरणादायी क्षण ठरला. भारतमातेचे थोर सुपुत्र वीर सावरकर, योगेंद्र शुक्ला, बटुकेश्वर दत्त, शचिंद्र नाथ सान्याल आणि इतर अनेकांना या कारागृहात तुरुंगात डांबून एकांतात ठेवले होते. आजही या राष्ट्रीय स्मारकाच्या भिंती भारत स्वतंत्र व्हावा आणि सन्मानाने जगावा म्हणून आपले प्राण पणाला लावलेल्या त्या शूरवीरांच्या धैर्याच्या, त्यांनी भोगलेल्या यातनांच्या आणि त्यांच्या सर्वोच्च त्यागाच्या कथा आपल्याला सांगत असतात. खरे तर, या भेटीनेच मलाही कोट्यवधी लोकांच्या मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करून देशाला स्वातंत्र्याच्या दिशेने नेणाऱ्या या सर्व मशालवाहकांना आदरांजली अर्पण करण्याकरिता हा लेख लिहिण्याची प्रेरणा दिली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १९४२ मध्ये ‘भारत छोडो’ आंदोलनाला सुरुवात केली आणि त्यासोबतच देशाला ‘करेंगे या मरेंगे’ ही स्फूर्तिदायक घोषणा दिली. त्यांच्या या आवाहनामुळेच तर, देशभरात स्वातंत्र्य मिळवण्याच्या एका तीव्र इच्छेने जोर धरला. त्या काळात वसाहतवादी सत्तेविरुद्ध खंबीरपणे उभ्या राहिलेल्या पिढीमुळेच आज आपल्याला स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून श्वास घेण्याचे आणि लोकशाही व्यवस्थेअंतर्गत घटनात्मक हक्कांसह जगण्याचे भाग्य लाभले आहे. या देशाच्या कानाकोपऱ्यांतील लाखो शूर स्वातंत्र्यसैनिकांनी अढळ निष्ठा आणि त्यागाने लढा दिला. भारतमाता मुक्त व्हावी, यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली.

स्वातंत्र्यसैनिकांचे वैविध्यपूर्ण योगदान

स्वातंत्र्यसैनिक सर्व प्रदेशांतील, वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या, वेगवेगळ्या वय आणि लिंगाचे लोक एका सामायिक ध्येयासाठी एकत्र आले होते आणि ते ध्येय होते भारतमातेच्या स्वातंत्र्याचे. पहिल्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान प्रतिकाराचे एक अमर प्रतीक बनलेल्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचे शौर्य, मंगल पांडे यांचे धैर्य, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या घोषणेने राष्ट्राला जागे करणाऱ्या बाळ गंगाधर टिळक यांनी निर्भीडपणे दिलेली हाक, अशा प्रत्येक अभिव्यक्तीने स्वातंत्र्याच्या दिशेने होत असलेल्या वाटचालीला बळकटी दिली. व्ही. ओ. चिदंबरम पिल्लाई यांनी भारताचा पहिला स्वदेशी जहाजबांधणी उद्योग सुरू करून वसाहतवादी आर्थिक वर्चस्वाला आव्हान दिले. त्यांच्या या कृतीने स्वातंत्र्याचा लढा केवळ रणांगणावरच नव्हे, तर व्यापार क्षेत्राअंतर्गतही लढला गेला होता, हीच बाब सिद्ध होते. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या क्रांतिकारी साहसाने पिढ्यान्‌ पिढ्यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचा त्याग करण्याची प्रेरणा दिली. त्याचवेळी राणी गाइदिनल्यू यांच्या अदम्य साहसाने ईशान्य भारतात ब्रिटिश राजवटीविरोधातली प्रतिकाराची ज्योत धगधगत ठेवली. आसाममध्ये कनकलता बरुआ या तरुण महिला स्वांतत्र्यसैनिकाने अढळ धैर्याने राष्ट्रध्वज हातात धरून भारत छोडो आंदोलनाचे नेतृत्व करताना प्राण अर्पण केले. भगवान बिरसा मुंडा आणि इतर अनेक आदिवासी नेत्यांनी देखील ऐतिहासिक प्रतिकाराचे नेतृत्व केले. इतिहासाच्या पानांमधून अशा प्रतिकाराच्या, धैर्य आणि दृढनिश्चयाच्या कितीतरी कथा समोर उलगडल्या जाऊ शकतात. एकंदरीत या सर्व गाथा धैर्य आणि त्यागाचे एक समृद्ध चित्र आपल्यासमोर मांडतात, ज्यांचा वारसा आजच्या पिढ्यांना प्रेरणा देत असलेल्या, असंख्य नायकांच्या सामूहिक संकल्पानेच भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे, याचे स्मरण करून देतात.

स्वातंत्र्यसैनिक तिरुप्पूर

स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यानिमित्त मी कोडी काथा कुमारन (ध्वजरक्षक, कुमारन) म्हणून सुपरिचित असलेल्या तिरुप्पूर कुमारन यांना आदरांजली अर्पण करतो. स्वातंत्र्य लढ्यादरम्यान तिरुप्पूर (माझे मूळ गाव) येथे मृत्यू समोर असतानाही त्यांनी राष्ट्रध्वज खाली पडू दिला नाही. यासाठी त्यांनी प्राणांचे बलिदान दिले. त्यानंतर ते या नावाने ओळखले जाऊ लागले. अगदी लहान वयात कुमारन यांच्या हृदयात देशभक्तीची ज्योत प्रखरपणे तेवत होती. ते स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले. महात्मा गांधी यांच्या आदर्शांनी खोलवर प्रभावित होऊन कुमारन यांनी तरुणांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत करण्यासाठी ‘देशबंधू युवा संघटने’ची स्थापना केली. कुमारन यांचा ठाम विश्वास होता की, जेव्हा लोकांना वसाहतवादी राजवटीच्या अन्यायाची जाणीव होईल आणि त्यांच्यामध्ये त्याचा प्रतिकार करण्याचे धैर्य आणि स्पष्टता निर्माण होईल, तेव्हाच खरे स्वातंत्र्य मिळू शकेल. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या व्यापक ध्येयासाठी दारूच्या दुकानांसमोर निदर्शनांमध्ये भाग घेतला आणि लोकांना दारू सोडून स्वयंशिस्त अंगीकारण्याचे आवाहन केले. कुमारन यांनी १० जानेवारी १९३२ रोजी सविनय कायदेभंग चळवळीत एका मोर्चाचे नेतृत्व केले. हातात राष्ट्रध्वज घेऊन आणि काही शूरवीरांच्या साथीने तिरुपूरच्या रस्त्यांवर ‘वंदे मातरम्‌’च्या जोरदार घोषणा घुमत होत्या. सैन्याने या गटावर हल्ला केला. त्यांच्या ओठांवर ‘वंदे मातरम्‌’चा जयघोष होता. त्यांनी ध्वज शरीराजवळ घट्ट धरून ठेवला. कुमारन यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली. मृत्यूसमयी त्यांचे वय अवघे २७ वर्षे होते. तिरुप्पूर कुमारन यांच्याबद्दल लिहिताना, आज मला अशा अनेक तरुणांची आठवण येते, ज्यांनी भारतमातेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. काही नावे अशी आहेत : भगतसिंग (वय २३), सुखदेव (२३), राजगुरू (२२), खुदीराम बोस (१८), कनकलता बरुआ (१८), अनंत लक्ष्मण कान्हेरे (१९), वनचीनाथन (२५) आणि इतर अनेक जणांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ते अमर झाले. आपल्या राष्ट्रीय चळवळीतील अनाम वीरांना केंद्रस्थानी आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकाराची मी प्रशंसा करतो. अशा सर्व ज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांना मी वंदन करतो.

या महत्त्वाच्या प्रसंगी आपण आपल्या मातृभूमीप्रति वचनबद्धता नव्याने व्यक्त करूया. या अमृत काळात विकसित भारत @२०४७ च्या उभारणीसाठी आपण स्वतःला समर्पित करूया आणि आपल्या राष्ट्राची प्रगती आणि समृद्धीसाठी एकत्र येऊन काम करूया! देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अढळ धैर्याने लढणाऱ्या आणि आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांना हीच खरी आदरांजली ठरेल.

जय हिंद! भारत माता की जय!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news