Amit Shah vs Mamata Banerjee | शहा विरुद्ध ममता

Amit Shah vs Mamata Banerjee |
Amit Shah vs Mamata Banerjee | शहा विरुद्ध ममता(Pudhari File Photo)
Published on
Updated on

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धग दिवसेंदिवस वाढत असून भाजपने आपल्या रणनीतीने तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चोहोबाजूने घेरायला सुरुवात केली आहे. ममता गेली पंधरा वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या पक्षाने राज्यात निर्माण केलेली गुंडगिरी व दहशत शिगेला पोहोचली आहे. तृणमूल काँग्रेससमोर दुसरा राजकीय पक्ष उभा राहता कामा नये व दुसर्‍या पक्षाचे कार्यकर्ते आपल्या विरोधात रस्त्यावर उतरता कामा नयेत, असे भयग्रस्त वातावरण गेली पंधरा वर्षे पश्चिम बंगालमध्ये आहे. रामनवमीची मिरवणूक असो किंवा दुर्गा पूजा उत्सव अशा हिंदू सणांवर राज्यात कमालीचे निर्बंध असतात. मुस्लिमांचा अनुनय करण्यात ममता यांचा दुसरा कोणी हात धरू शकणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केंद्रात सरकार आल्यापासून ममता यांना कोणी तरी जाब विचारणारा नेता भेटला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याला वारंवार भेटी देऊन आणि आपल्या कार्यकर्त्यांना दिलासा देऊन पक्षाची संघटना गेल्या दहा वर्षांत भक्कम पायावर उभी केली आहे. ममता यांनी पंधरा वर्षांपूर्वी डाव्या पक्षांचा गड उद्ध्वस्त केला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सत्तेवरून हटविण्याचा पराक्रम करून दाखवला, पण ममता यांची राजवट हुकूमशहा पद्धतीने चालली आहे. पूर्वी मार्क्सवादी व तृणमूल काँग्रेस यांच्यात सतत रक्तरंजित हिंसाचार होत असे. आता तृणमूलचे कार्यकर्ते भाजपला दहशत दाखवून रोखण्याचा प्रयत्न करीत असतात. तृणमूल काँग्रेसच्या दहशतीतून पश्चिम बंगालला मुक्त करण्यासाठी आणि बांगला देशी मुसलमानांची घुसखोरी रोखण्यासाठी वाट्टेल ते करून ममता व त्यांच्या पक्षाला सत्तेवरून हटविण्याचा भाजपने यावेळी चंग बांधला आहे.

अमित शहा यांच्या नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगालमधील प्रचार दौर्‍याने ममता बॅनर्जी अक्षरश: चेकाळल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत तृणमूल विरुद्ध भाजप अशी थेट लढत आहेच, पण अमित शहा विरुद्ध ममता असा राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला आहे. गेल्या दहा वर्षांत तृणमूल काँग्रेसचे अनेक मोठे नेते ममता यांच्या मनमानीला कंटाळून भाजपमध्ये आले. त्यांना भाजपने सन्मानाने पक्षात घेतले व भयमुक्त केले. आता हेच नेते भाजपचा झेंडा हातात घेऊन ममतांच्या विरोधात हल्लाबोल करताना दिसत आहेत. अमित शहा यांनी निवडणूक प्रचारात ममता सरकारविरोधात कोलकाता येथे एक आरोपपत्रच सादर केले. तृणमूल काँग्रेसच्या 15 वर्षांच्या कारकिर्दीचा पंचनामाच या आरोपपत्रात आहे. प्रत्येक निवडणुकीत ममता या व्हिक्टीम कार्ड खेळतात व लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप शहा यांनी केला. कधी त्या डोक्याला पट्टी बांधतात, कधी पाय मोडला म्हणून व्हीलचेअरवरून प्रचाराला येतात, कधी आजारी पडतात, निवडणूक आयोगाला शिव्यांची लाखोली वाहतात, पण त्यांचे खरे स्वरूप जनतेने आता ओळखले आहे. भाजपशी टक्कर देताना आपली सत्ता टिकविण्यासाठी ममता यांना अक्षरश: आटापिटा करावा लागतो आहे.

ममता यांनी त्यांच्या धोरणामुळे बंगालचे शोषण केले आहे, देशाच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर त्या धोक्याचा खेळ खेळत आहेत आणि राज्यात गुन्हेगारी, गुंडगिरी, दहशत व बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. या तीन मुद्द्यांवरून शहा यांनी ममतांवर हल्लाबोल केला आहे. आसाममध्ये भाजपचे सरकार आल्यापासून घुसखोरी थांबली आहे. बंगालमधील घुसखोरीमुळे देशाच्या सुरक्षिततेलाच धोका निर्माण झाला आहे. बंगालमध्ये प्रशासनात भ—ष्टाचार प्रचंड बोकाळला आहे, गुन्हेगारांच्या टोळ्या खुलेआम सामान्य जनतेला त्रास देताना दिसत आहेत. बंगालमधील सामान्य जनतेला स्वत:चा प्राण गमावण्याची अहोरात्र भीती वाटत असते, आपली मालमत्ता कोणी तरी हिसकावून घेईल, असे भय कायम असते आणि आपले स्वातंत्र्य दबावाखाली आहे, अशा दबावाच्या वातावरणात लोक जगत आहेत. आज आपल्याला उपजीविकेचे साधन आहे, ते उद्या असेल की नाही, याची शाश्वती सर्वसामान्य बंगाली नागरिकाला नाही, अशी परिस्थिती या राज्यात आहे.

ममता बॅनर्जी यांनीही भाजपवर आरोपपत्र घोषित केले आहे. भाजपचे लोक पश्चिम बंगालमध्ये दंगली व हिंसाचार घडवतात, असा त्यांनी आरोप केला आहे. भाजपमुळेच बंगालमधील वातावरण दूषित झाले आहे व हिंदू- मुस्लिम तेढ निर्माण होते आहे. राज्यात सर्व बंगाली भाषिक गुण्यागोविंदाने राहत होते, पण भाजपने त्यांच्यात भेदभाव करून आणि जातीय राजकारण खेळून राज्यातील वातावरण बिघडवले, असा आरोप ममता यांनी केला आहे. आमच्या पक्षाचे कार्यकर्तेही रामनवमी साजरी करतात, मिरवणुका काढतात; पण भाजपने त्या दिवशी दंगली घडवून उत्सवाला गालबोट लावले, असा आरोप ममता यांनी केला आहे. राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने मुख्य सचिव, गृहसचिव, पोलिस आयुक्तांपासून शंभराहून जास्त वरिष्ठ व उच्च पदांवरील अधिकार्‍यांना बदलले व स्वत:च्या मर्जीतील अधिकार्‍यांच्या नेमणुका केल्या. निवडणूक आयोगाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर अधिकार्‍यांच्या बदल्या यापूर्वी कधीच केल्या नव्हत्या.

मोदी सरकार निवडणूक आयोगाच्या मदतीने त्यांनी नेमलेल्या अधिकार्‍यांना हाताशी धरून निवडणूक लढवत आहे, असा आरोप ममता प्रत्येक प्रचार सभेत करीत आहेत. तृणमूल काँग्रेसचे महिला मेळावेसुद्धा भाजपचे लोक दंगली घडवून उधळून लावत आहेत व पोलिस त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा प्रचार तृणमूल काँग्रेस करीत आहे. निवडणूक आयोगाने मर्जीतील अधिकारी नेमून व स्वत:ची यंत्रणा उभी करून आपले मुख्यमंत्री म्हणून घटनेने दिलेले अधिकारही काढून घेतले आहेत. केंद्रातून व बाहेरील राज्यातून भाजपचे नेते येथे येतात व लोकांना आमच्या विरोधात भडकविण्याचे काम करतात, असा दावा ममता यांनी केला आहे. प्रचार करताना एक लक्ष्मणरेषा असावी, पण भाजपने ती कधीच ओलांडली आहे. मतदार याद्यातील वगळलेले लाखो मतदार हेच भाजपसाठी धोकादायक ठरू शकतात, असा इशारा ममता यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news