

तानाजी खोत
आपल्याकडे सर्वसाधारण विशीतली मुलं जेव्हा करिअरच्या वाटा शोधत असतात, त्याच कोवळ्या वयात काही तरुण स्वतःच्या अशा वाटा निर्माण करतात की, ज्यावरून संपूर्ण जगाला चालायला लागते. सिलिकॉन व्हॅलीतील अशाच एका तरुणाचे नाव आहे अमन सेंगर. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी, अमनने सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची व्याख्या बदलून टाकली आहे. अमन आज जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील एक ‘पोस्टर बॉय’ बनला आहे.
अमनचा प्रवास हा केवळ बुद्धिमत्तेचा नाही, तर शिस्तीचा आणि जिद्दीचा संगम आहे. जगातील सर्वोत्तम शिक्षण संस्था समजल्या जाणार्या ‘मॅसॅच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून त्याने संगणकशास्त्र आणि गणितात पदवी घेतली. विशेष म्हणजे, अभ्यासात नेहमीच अव्वल असणारा अमन दुसरीकडे विद्यापीठाच्या ‘स्क्वॅश’ टीमचा कॅप्टनही होता. खेळाडूची चिकाटी आणि गणिताची अचूकता त्याच्या स्वभावात तिथेच भिनली. त्यातूनच त्याने अल्पवयात थक्क करणारी मजल मारली आहे.
अमनने स्थापन केलेली ‘अॅनिस्पिअर’ ही कंपनी आणि त्यातून जन्माला आलेले ‘कर्सर’ हे एआय कोडिंग एडिटर आज सॉफ्टवेअर विश्वात क्रांती घडवत आहे. पूर्वी ज्या कोडिंगसाठी तास लागायचे, ते ‘कर्सर’च्या मदतीने काही सेकंदात पूर्ण होऊ लागले. या साधनाने डेव्हलपर्सना ‘रायटर’कडून ‘आर्किटेक्ट’ बनवले आहे. 2025 च्या अखेरपर्यंत या कंपनीने 1 अब्ज डॉलर्सच्या महसुलाचा टप्पा ओलांडला. इतकेच नाही, तर नुकतीच एलन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’कडून या कंपनीसाठी झालेली 60 अब्ज डॉलर्सची ऑफर ही अमनच्या दूरद़ृष्टीवर शिक्कामोर्तब करणारी ठरली.
अमनचे हे यश भारतासाठी आणि जगभरातील भारतीयांसाठी एका नवी आशा आहे. एकेकाळी भारत हा जगाचा ‘बॅक ऑफिस’ समजला जायचा; आज अमनसारखे अनेक तरुण जगाला ‘फ्रंट एंड’ वरून दिशा दाखवत आहेत. आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी असलेले त्याचे वडील आणि सिलिकॉन व्हॅलीची स्टार्टअप संस्कृती यांचा सुरेख मेळ अमनच्या कामात दिसतो. आता आपण फक्त सेवा पुरवत नाही, तर जगाला उत्पादन देत आहोत, हे त्याने सिद्ध केले. अमनच्या यशाचा अर्थ असा की, कोडिंग आता केवळ काही ओळी लिहिण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. मानवी कल्पकता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या संयोगातून आपण अशक्य वाटणार्या गोष्टी साध्य करू शकतो.
अमनने हे दाखवून दिले की, जर तुमच्याकडे अचूक द़ृष्टी आणि खेळाडूसारखी चिकाटी असेल, तर एका हॉस्टेलच्या रूममधून सुरू झालेला प्रवास जगातील सर्वात मोठ्या टेक-डीलपर्यंत पोहोचू शकतो. तो केवळ एक उद्योजक नाही, तर भविष्यातील डिजिटल लीडर ठरणार आहे. हा करार केवळ एका सॉफ्टवेअर कंपनीची खरेदी नाही, तर भविष्यातील अंतराळ संशोधन आणि प्रगत इंजिनिअरिंगमध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा’ वापर किती कळीचा ठरणार आहे, याचे संकेत यातून मिळत आहेत. ‘स्पेसएक्स’ला आपल्या रॉकेट सायन्स, स्टारलिंक प्रकल्प आणि मंगळ मोहिमेसाठी अत्यंत वेगवान आणि अचूक कोडिंगची गरज आहे, जी ‘कर्सर’च्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते.