

आशिष शिंदे
गेल्या दोनशे वर्षांपासून स्टेथोस्कोप हे डॉक्टरांच्या गळ्यातील अविभाज्य अंग मानले जाते. रुग्णांच्या छातीवर वा पाठीवर ते लावून डॉक्टर हृदयाचे ठोके किंवा श्वसनाच्या हालचाली ऐकतात आणि निदान करण्याचा प्रयत्न करतात. पण, तंत्रज्ञान जसजसे बदलत गेले तसतसे या पारंपरिक साधनातही आमूलाग्र बदल घडून आला.
आता या स्टेथोस्कोपमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘एआय’ अवतरले आहे. एआय-आधारित हा स्मार्ट स्टेथोस्कोप हृदय आणि फुफ्फुसांच्या ध्वनींचे बारकाईने विश्लेषण करून काही सेकंदांतच असामान्य लक्षणे ओळखतो. विशेष म्हणजे याचा वापर केवळ डॉक्टरच नाही, तर सामान्य नागरिकही घरबसल्या कुटुंबाच्या आरोग्य तपासणीसाठी करू शकतात. त्यामुळे हा स्टेथोस्कोप वैद्यकीय क्षेत्रासाठी क्रांतिकारी नक्कीच ठरेल.
जगातील पहिला ऑल इन वन स्मार्ट स्टेथोस्कोप आहे. यात एज एआय तंत्रज्ञान, उच्च क्षमतेचा सीपीयू, टच डिस्प्ले, इनबिल्ट कॅमेरा आणि थर्मामीटरसारख्या सुविधा आहेत. कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारांच्या प्राथमिक स्क्रीनिंगसाठीही हे उपकरण महत्त्वाची भूमिका बजावू शकते. घरबसल्या तपासणीसाठीही या स्टेथोस्कोपचा वापर शक्य आहे. गर्भवती महिलांच्या व भ्रूणाच्या हालचालींचे परीक्षण करण्याची सोय यामध्ये आहे.
याशिवाय ब्लूटूथ आणि मोबाईल अॅप्सद्वारे रेकॉर्ड केलेला डेटा डॉक्टरांपर्यंत तत्काळ पोहोचवता येतो. त्यामुळे टेलीमेडिसिन क्षेत्रातही या साधनाचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. या स्मार्ट स्टेथोस्कोपमध्ये एआयच्या मदतीने हृदय व श्वसनविषयक सुमारे 12 विविध आजारांचे निदान करण्याची क्षमता आहे. त्यामुळे हे साधन केवळ डॉक्टरांच्या क्लिनिकसाठी मर्यादित न राहता, घरगुती आरोग्य व्यवस्थापन, टेलीमेडिसिन आणि सार्वजनिक आरोग्य प्रकल्पांमध्येही मोठ्या प्रमाणावर वापरले जाण्याची शक्यता आहे.फीचर्सकडे पाहिल्यास, या स्टेथोस्कोपमध्ये एमईएमएस मायक्रोफोनद्वारे स्पष्ट ध्वनी नोंदवला जातो, लिथियम-आयन रिचार्जेबल बॅटरीमुळे सलग 8 तास वापरता येते. आयपीएक्स-4 वॉटरप्रूफ सपोर्टमुळे टिकाऊपणाही जास्त आहे. मल्टी टच स्क्रीन, यूएसबी-सी चार्जिंग, ऑडिओ प्लेबॅक आणि क्लाऊड बॅकअप अशा सुविधा आरोग्य तपासणी अधिकविश्वासार्ह आणि वापरकर्ता-सुलभ करतात. सध्या हा स्टेथोस्कोप पाश्चात्त्य देशांमध्ये उपलब्ध असून, लवकरच तो भारतातही उपलब्ध होईल. याची किंमत 35 ते 40 हजार रुपयांपासून सुरू होते.