AI Gadget | समोरच्याच्या मनातील सांगेल हे एआय गॅजेट!

AI Gadget |
AI Gadget | समोरच्याच्या मनातील सांगेल हे एआय गॅजेट!
Published on
Updated on

आशिष शिंदे

तुझ्या मनात काय चाललंय, हे मला सगळं समजतंय... सिनेमातले हे डायलॉग आता प्रत्यक्षात उतरणार आहेत! विचार करा, तुम्ही एखाद्या पार्टीत आहात किंवा ऑफिसच्या महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आणि तुमच्या खिशातले एक छोटे गॅजेट तुम्हाला गुपचूप सांगतेय की, समोरची व्यक्ती तुमच्यावर खूश आहे की वैतागली आहे. ऐकायला एखाद्या जादुई शक्तीसारखे वाटत असले तरी तंत्रज्ञानाने हे शक्य करून दाखवले आहे. गॅजेट वर्ल्डमध्ये नुकतेच अवतरलेले एक छोटेसे वेअरेबल एआय डिव्हाईस आता समोरच्या व्यक्तीच्या मनाचा आरसा बनणार आहे! हे तुमच्या समोर येणार्‍या व्यक्तीचे हावभाव आणि भावनांचे अचूक विश्लेषण करून तुम्हाला माहिती पुरवते. हे गॅजेट म्हणजे तुमच्या खिशातील एक सोशल एक्सपर्टच आहे.

या डिव्हाईसची तांत्रिक कार्यक्षमता खरोखरच थक्क करणारी आहे. हे तुम्ही अंगावर किंवा कपड्यांवर कुठेही सहजपणे लावू शकता. तुम्ही जेव्हा लोकांशी संवाद साधता, तेव्हा हे यंत्र समोरच्या व्यक्तीच्या चेहर्‍यावरील हावभाव, त्यांच्या नजरेचा रोख आणि देहबोलीची नोंद घेते. यानंतर यातील प्रगत आर्टिफिशियल इंटेलिजन्स अल्गोरिदम या डेटाचा अर्थ लावून ती व्यक्ती तुमच्याकडे कोणत्या भावनेने बघत आहे किंवा तिला तुमच्या बोलण्यात किती रस आहे, याची माहिती तुम्हाला देते. कॉर्पोरेट मीटिंग्ज, प्रेझेंटेशन किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये समोरच्याचा कल ओळखण्यासाठी हे गॅजेट अत्यंत उपयुक्त ठरू शकते.

प्रायव्हसी किंवा गोपनीयतेच्या बाबतीत हे गॅजेट अत्यंत सुरक्षित आहे. या ट्रॅकरमध्ये फोटो किंवा व्हिडीओ स्टोअर करण्याची कोणतीही सोय नाही. हे यंत्र समोरून येणार्‍या माहितीचे रिअल टाईममध्ये विश्लेषण करते आणि डेटा अनामित स्वरूपात ठेवते. त्यामुळे कोणाचीही खासगी माहिती लीक होण्याची भीती राहात नाही. केवळ सांख्यिकीय निष्कर्ष आणि सामाजिक संकेत समजून घेण्यासाठीच याचा वापर केला जातो, ज्यामुळे युजर्सना एक प्रकारचे मानसिक समाधान मिळते. या गॅजेटचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याचा अल्गोरिदम मार्केटप्लेस. युजर्स त्यांच्या गरजेनुसार विविध प्रकारचे अल्गोरिदम डाऊनलोड करून घेऊ शकतात. समजा, तुम्हाला फक्त समोरच्या व्यक्तीचे अटेंशन म्हणजेच तुमच्याकडे असणारे लक्ष ट्रॅक करायचे असेल किंवा संवादातील पॅटर्न समजून घ्यायचे असतील, तर त्याप्रमाणे तुम्ही हे यंत्र कस्टमाईज करू शकता.

यातील डेटा मोबाईल अ‍ॅपशी सिंक होतो, जिथे तुम्हाला ग्राफ आणि रिपोर्टच्या माध्यमातून दिवसभरातील संवादाचे विश्लेषण पाहायला मिळते. यामुळे तुम्हाला स्वतःच्या संवाद कौशल्यात सुधारणा करण्याची संधी मिळते. सध्या हे गॅजेट कॉम्पॅक्ट आणि स्टायलिश डिझाईनमुळे ते कोणत्याही पेहरावावर शोभून दिसते. यामध्ये रात्रीच्या वापरासाठी नाईट एडिशन आणि वायरलेस चार्जिंगसाठी डॉकस्टेशनसारख्या सुविधाही देण्यात आल्या आहेत. एकूणच मानवी स्वभाव आणि भावनांची भाषा डीकोड करण्यासाठी हे गॅजेट वर्ल्डमधील एक क्रांतिकारक पाऊल मानले जात आहे. या वेअरेबल एआय डिव्हाईसची आंतरराष्ट्रीय बाजारातील मूळ किंमत 199 डॉलर्स आहे. भारतीय चलनात याचा विचार केला तर ती सुमारे 18 ते 19 हजार रुपयांच्या घरात जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news