तडका : रोबोटिक शिक्षिका..!

तडका : रोबोटिक शिक्षिका..!
Published on
Updated on

कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी आयुष्याच्या प्रत्येक घटकांत इथून पुढे अस्तित्व दाखवणार आहे, असे म्हटले जात होते. गेल्या काही काळात एआय तंत्रज्ञान काही बहुराष्ट्रीय कंपन्या आणि 'इस्रो'सारख्या वैज्ञानिक संस्थांमध्ये वापरले जात आहे. केरळमधील एका शाळेत एआयने तयार केलेली एक रोबोट आणि अर्थात ती स्त्री असल्यामुळे देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्तेची शिक्षिका म्हणून अवतरलेल्या शिक्षिकेचे कौतुक केले जात आहे. तिचे नाव आयरिस असे आहे. सध्या ही शिक्षिका प्रायोगिक तत्त्वावर कार्यरत आहे. तिच्याकडे असलेली माहिती, शिकवण्याची पद्धत आणि मुलांना हाताळण्याची शैली हे पाहता येत्या काळात अन्य शाळांत अशा रोबोटिक शिक्षिका किंवा शिक्षक दिसतील अशी शक्यता आहे. 'छडी लागे छम छम विद्या येई घमघम' असा काही तिचा बाणा आहे का, याविषयी अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही; परंतु शाळेतील शिक्षिका म्हणजे शिस्तप्रिय आणि वेळ प्रसंग पडला, तर विद्यार्थ्यांच्या तळहातावर छडीचा मार देणारे पण असतात हा सर्वसाधारण अनुभव आहे.

या रोबोटिक शिक्षकेला म्हणजे आयरिसला तीन भाषांमध्ये संभाषण करता येते आणि तिच्याकडे इतर शिक्षकांपेक्षा खूप जास्त माहिती आहे, याचे कारण म्हणजे तिचा माहिती साठवण्याचा स्रोत मेमरी कार्ड आहे. जे काय तुम्ही मेमरी कार्डमध्ये भरून द्याल त्याप्रमाणे ती शिकवणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की, समजा एखाद्या विद्यार्थ्याला काही शंका निर्माण झाली, तर आणि त्याने ती शंका शिक्षिकेसमोर सादर केली तर काय होईल? आयरिसचा परफॉर्मन्स असे सांगतो की, तिची शिकवण्याची पद्धत विद्यार्थ्यांना फार आवडली आहे. ती मुलांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अगदी सखोलपणे देते. त्यामुळे विद्यार्थी पण खूश आहेत. पगार द्यावा लागत नाही म्हणून संस्थाचालक खूश, स्मार्ट आणि चांगली बुद्धिमान शिक्षिका मिळाली म्हणून विद्यार्थी खूश; परंतु त्यामुळे इतर शिक्षक मंडळींमध्ये मात्र नाराजीचे सूर आहेत. भविष्यात असे शिक्षक शाळांत शिकवू लागले, तर माणसांचे काय होईल? त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ येईल का, अशी भीती त्यांना सतावत आहे.

भारतात शिक्षकी पेशात पर्याय म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शिक्षकांची फारशी उपयुक्तता नाही. आपल्याकडील शिक्षकांना शिकवण्याच्या कामाशिवाय जनगणना, पशुगणनेपासून ते थेट निवडणूक यंत्रणामध्ये पण काम करावे लागते. बरेचदा शिकवायला वेळच मिळत नाही, अशी तक्रार शिक्षक करत असतात. एआयचे शिक्षक किंवा शिक्षिका हे केवळ शिकवण्याचेच काम करू शकतील. आपल्या राज्यातील आणि देशातील सामान्य शिक्षक जी इतर कामे करतात ती कामे हे यंत्र शिक्षक करू शकणार नाहीत, यात काही शंका नाही. खासगी संस्थांमधील शिक्षक असतील, तर त्यांना या सरकारी आणि गैरसरकारी कामांशिवाय व्यक्तिगत कामेही असतात. म्हणजे उदाहरणार्थ, एखादा संस्थाचालक निवडणुकीसाठी उभा राहणार असेल, तर त्याच्या संस्थेतील शिक्षकांना प्रचाराला जावे लागते. संस्थाचालकाला निवडणुकीसाठी पैसा उभा करायचा असेल, तर बरेचदा ते लोक शिक्षक मंडळींच्या नावावर बँकांची कर्जे उचलतात आणि निवडून आले किंवा पडले तरी ते कर्ज परत करण्याची जबाबदारी त्या शिक्षकाची असते.

– कलंदर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news