

आशिष शिंदे
अरे यार! एका हाताने बॅग पकडू की मोबाईलवरून फोटो काढू? प्रवासात किंवा एखाद्या मोठ्या कार्यक्रमात फिरताना आपल्या सगळ्यांचीच अशी तारांबळ उडते. आज मोबाईल आपल्याकडे चोवीस तास असतो आणि तो आपण कधीच घरी विसरत नाही; पण प्रत्येक सुंदर क्षण कॅमेर्यात कैद करण्याच्या नादात आपण तो क्षण डोळे भरून अनुभवूच शकत नाही. विचार करा, जर तुमच्या कपड्यांवर एक असे छोटे गॅजेट लावले, जे तुमच्या नकळत दिवसभराचे सुंदर व्हिडिओ आणि रोजनिशी तयार करेल, तर किती भारी होईल? गॅजेट वर्ल्डमध्ये नुकतीच एन्ट्री झालेल्या एआय कॅमेर्याने ही किमया साधली आहे.
या छोट्या गॅजेटचे डिझाईन अत्यंत कॉम्पॅक्ट आणि वजनाने हलके (अवघे 32 ग्रॅम) आहे, ज्यामुळे ते कपड्यांवर कुठेही सहज लावता येते. यात 12 मेगापिक्सेलचा कॅमेरा, तीन मायक्रोफोन्स आणि 32 जीबीची इनबिल्ट स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे. हे डिव्हाईस तुमच्या दिवसभरातील घडामोडींचे छोटे-छोटे व्हिडीओ क्लिप्स बॅकग्राऊंडमध्ये रेकॉर्ड करते आणि त्यांचे एका सर्च करता येण्याजोग्या टाईमलाईनमध्ये रूपांतर करते. याचे सर्वात हटके वैशिष्ट्य म्हणजे, या कच्च्या डेटावरून हे यंत्र स्वतःहून एआयच्या मदतीने दैनिक व्लॉग, कॉमिक पेजेस, रील आणि रोजनिशी तयार करून देते. म्हणजेच, प्रवासात किंवा एखाद्या कार्यक्रमात मोबाईल हातात न धरताही तुम्ही तुमचे सुंदर क्षण जतन करू शकता.
याच्या समोरील भागावर हलका स्पर्श करताच यातील प्रगत एआय यंत्रणा सक्रिय होते. या गॅजेटमधील सेन्सर्स आजूबाजूच्या हालचाली आणि आवाजाचा कानोसा घेऊन महत्त्वाचे क्षण ओळखून घेतात. विशेष म्हणजे, तुम्ही गर्दीत किंवा प्रवासात असताना हे डिव्हाईस तुमच्या चालण्याचा वेग आणि समोरील द़ृश्ये यांचा ताळमेळ ठेवून रिअल-टाईममध्ये नोंदी करत राहते. दिवसभर हे यंत्र बॅकग्राऊंडमध्ये राहून तुमचे डोळे जे पाहतात, ते सर्व काही अचूक टिपत जाते.
तांत्रिक बाजू का विचार केला तर, यात 1080 पिक्सेल व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि 4के फोटो सपोर्ट आहे. याची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर 9 ते 13 तास आरामात चालते, जी दिवसभराच्या इव्हेंटस्साठी पुरेशी आहे. या गॅजेटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची प्रायव्हसी! हे डिव्हाईस ‘लोकल-फर्स्ट स्टोरेज’ संकल्पनेवर काम करते, म्हणजेच तुमचा डेटा आधी डिव्हाईसमध्येच सुरक्षित राहतो आणि तुमच्या परवानगीशिवाय तो क्लाऊडवर जात नाही. हे गॅजेट विशेषतः ट्रॅव्हलर्स, क्युरेटर्स, आणि सतत वेगवेगळ्या परिषदा किंवा कार्यक्रमांना हजेरी लावणार्या लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या मोठ्या म्युझियमला भेट दिली, तर तिथे फिरताना हे गॅजेट तुमच्या नकळत तिथल्या महत्त्वाच्या गोष्टी टिपून ठेवते.
किमतीचा विचार केला, तर हे गॅजेट आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 199 डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 18 ते 20 हजार रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहे. हे गॅजेट ब्लॅक, व्हाईट आणि ग्रीन अशा तीन आकर्षक रंगांमध्ये खरेदी करता येते. जे लोक फॅशन, तंत्रज्ञान आणि दैनंदिन जीवनाचा डिजिटल रेकॉर्ड ठेवण्यास उत्सुक आहेत, त्यांच्यासाठी हे गॅजेट उत्तम आहे.