किशोरवयीनांमधील वाढती व्यसनाधीनता

किशोरवयीनांमधील वाढती व्यसनाधीनता

Published on

[author title="डॉ. अनिल न. मडके" image="http://"][/author]

तंबाखू आणि संबंधित उत्पादने जसे की, बिडी, सिगारेट, गुटखा, मावा, मिशेरी, टोबॅको पेस्ट , तपकीर, पान-तंबाखू, पानमसाला, ई-सिगारेट ही आरोग्याला धोकादायकच असतात. तंबाखूमुळे तोंड, गाल, घसा, फुफ्फुस, अन्ननलिका, पोट, स्वादुपिंड, आतडे , यकृत, स्त्रीबीज कोश, मूत्रपिंड आणि मूत्राशयाचा कॅन्सर होणे, हृदयविकार, रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होऊन मेंदूचा स्ट्रोक होणे, सीओपीडी – दमा यासारखे दीर्घकालीन श्वसनविकार उद्भवणे, नपुंसकत्व येणे असे आजार होण्याची शक्यता अधिक असते. आज (31 मे) जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या निमित्ताने…

तंबाखूजन्य पदार्थांच्या दीर्घकाळ वापरामुळे चिंता, नैराश्य आणि मानसिक विकारांना आमंत्रण मिळते. गरोदरपणात तंबाखूचा वापर करणार्‍या स्त्रियांच्या पोटी कमी वजनाचे वा विकृती असलेले बाळ जन्माला येऊ शकते. सिगारेटच्या धुरात अनेक विषारी घटक असतात. त्यातील चाळीसहून अधिक घटक कॅन्सरला कारणीभूत असतात. फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होणार्‍या मृत्यूंपैकी 90 टक्के व्यक्तींमध्ये तंबाखू हा कारणीभूत घटक असतो. तंबाखूमुळे जगभरात दरवर्षी साठ लाख मृत्यू होतात. 2030 मध्ये हा आकडा ऐंशी लाखापर्यंत पोहोचेल. अजूनही कर्करोगावर ठोस उपचार नाहीत. तंबाखू टाळली तर कर्करोग टाळू शकतो. धूम्रपान करणार्‍या व्यक्ती स्वतःबरोबर सभोवतालच्या व्यक्तींचे आरोग्य धोक्यात आणतात.

एखादी व्यक्ती स्वतः धूम्रपान करत नाही; पण धूम्रपान करणार्‍याच्या सान्निध्यात येते, तेव्हा तिलाही अनेक आजार होण्याचा धोका निर्माण होतो. एखादी व्यक्ती बाहेर धूम्रपान करून घरी येत असेल, तर त्या व्यक्तीच्या कपड्यांबरोबर धूम्रपानाचे कण चिकटून येतात आणि ते कपडे हाताळणार्‍या व्यक्तींसाठी धोकादायक ठरू शकतात. जागतिक तंबाखूविरोधी दिनाच्या निमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने एक घोषवाक्य जाहीर केले जाते. या वर्षीचे घोषवाक्य आहे, ते म्हणजे 'तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण.'

तंबाखू किंवा सिगारेटचे व्यसन हे तारुण्याच्या वळणावर लागण्याची शक्यता अधिक असते. जगात 13 ते 15 वर्षे या वयोगटातील जवळपास पावणेचार कोटी मुले-मुली तंबाखू किंवा तंबाखूशी संबंधित उत्पादनांचा वापर करतात. दहापैकी नऊ व्यक्ती आपली तंबाखू, सिगारेट वयाच्या अठरा वर्षांपूर्वी सुरू करतात. आणि महत्त्वाचे म्हणजे, गंमत म्हणून एक सिगारेट ओढणार्‍या तीनपैकी दोन व्यक्ती पुढे दररोज सिगारेट ओढायला लागतात. तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन करणार्‍या कंपन्यांचे लक्ष्य केवळ अधिक नफा एवढेच असते.

आजकाल आरोग्य प्रबोधनामुळे अनेक जण तंबाखूचा वापर कमी करत आहेत. तंबाखूमुळे कर्करोग झालेले अनेक जण जीव गमावत आहेत. परिणामतः तंबाखूजन्य पदार्थांचे ग्राहक कमी होत आहेत. आणि नवीन ग्राहक तयार करण्यासाठी या कंपन्या वेगवेगळ्या पद्धतीने जाहिराती करून किशोरवयीन मुलांना व्यसनाच्या आहारी जाण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत आहेत. तंबाखू कंपन्यांचे लक्ष्य केवळ विक्री आणि नफा एवढेच असते. त्यांचे लक्ष नव्या पिढीच्या आरोग्याकडे कुठे असायला? ई-सिगारेट हीदेखील तंबाखूइतकीच धोक्याची आहे, हे मुलांच्या लक्षात येत नाही.

निकोटीन हा एखाद्याला तीव्र व्यसनाधीन बनवणारा घटक आहे. तंबाखूची एक चिमूट किंवा सिगारेटचा केवळ एक झुरका व्यक्तीला व्यसनाच्या दरीत ढकलण्यासाठी पुरेसा असतो. केवळ शाळा, अभ्यास, कपडे, सहल, मौज एवढ्याच गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, तर मुलांचे आरोग्यदायी खाणे आणि त्यांना तंबाखूसारख्या व्यसनांपासून दूर ठेवणे हेसुद्धा त्यांच्या निरोगी भवितव्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी थोडा वेळ काढा. त्यांना हे धोके समजावून सांगा. त्यांची संगत कुणाशी आहे, ते शोधा. त्यांचे चांगले मित्र तुम्हीच बना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news