कृत्रिम बुद्धिमत्तेतील नवक्रांती

कृत्रिम बुद्धिमत्तेतील नवक्रांती

[author title="महेश कोळी, संगणकतज्ज्ञ" image="http://"][/author]

'एआय'च्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) सामर्थ्याबद्दल जगात अनेक प्रश्न, मतमतांतरे आणि शंका-कुशंका असल्या तरी एक गोष्ट निश्चित आहे की, येणार्‍या काळात ते क्रांतिकारी बदलांचे वाहन ठरणार आहे. याचे कारण कृत्रिम बुद्धिमत्ता सतत नावीन्यपूर्ण आणि शक्तिशाली तंत्रज्ञानाला जन्म देत आहे. सध्या 'एआय' तंत्रज्ञानाच्या गुणवत्तेने सुसज्ज सर्च इंजिन उदयास येईल, याची चर्चा जगभरात होत आहे.

'एआय'ने चालवलेले हे सर्च इंजिन वेळप्रसंगी वर्तमानात सर्च इंजिनच्या क्षेत्राचा अनभिषिक्त सम-ाट असणार्‍या गुगलच्या वर्चस्वालाही आव्हान देऊ शकते, असे बोलले जात आहे. 'ओपन एआय'कडून तयार केल्या जाणार्‍या या सर्च इंजिनची घोषणा कधीही होऊ शकते. असे म्हटले जाते की, 'ओपन एआय'ने या प्रकल्पासाठी मोहिमेत मोठ्या संख्येने गुगलच्या तज्ज्ञांचा समावेश केला आहे. त्यामुळे या नव्या सर्च इंजिनबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. तसेच या सर्च इंजिनाबाबत अपेक्षाही वाढल्या आहेत; कारण 'ओपन एआय'च्या चॅटजीपीटी या आविष्काराने आधीच धुमाकूळ घातला आहे. 2022 च्या अखेरीस लाँच झालेल्या चॅटजीपीटीचे सद्यःस्थितीत जगभरात 100 दशलक्ष मासिक वापरकर्ते आहेत.

'ओपन एआय'च्या नवीन सर्च इंजिनच्या आगमनाने चॅटजीपीटीच्या क्षमतांचाही विस्तार होईल, असे सांगितले जात आहे. मायक्रोसॉफ्ट समर्थित 'ओपन एआय'साठी हे एक नवीन यश असेल. त्यामुळे कालातीत ज्ञानाच्या शोधात इंटरनेटवर सर्च इंजिन वापरणार्‍या जिज्ञासूंना अचूक माहिती मिळू शकेल. यासाठी या सर्च इंजिनद्वारे प्रदान केली जाणारी माहिती केवळ तांत्रिक असता कामा नये. मूळ मजकूर असो वा अनुवाद, त्यातील आशय व मांडणीत अचूकता असायला हवी. तसेच ही माहिती तार्किकद़ृष्ट्या सोपी असावी. तसे झाल्यास इंटरनेट जगतात नवीन 'एआय' आधारित सर्च इंजिनकडून क्रांतीचे नवे पर्व सुरू होऊ शकते.

जगातील सर्वाधिक तरुण आणि प्रतिभा असलेला देश असलेल्या भारताला 'एआय' संचालित प्रणालीमध्ये पाय रोवण्यासाठी नवीन पुढाकार घ्यावा लागेल. मायक्रोसॉफ्ट, गुगल इत्यादी अनेक यशस्वी अमेरिकन कंपन्यांत भारतीय प्रतिभा अमूल्य योगदान देत आहे; पण त्याच वेळी या कंपन्यांची उत्पादने भारताचे आर्थिक शोषण करत आहेत. 'एआय'चे धोके आहेत, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. आपला मुकाबला एका शक्तिशाली तंत्रज्ञानाशी आहे. विकासासाठी त्याची गरज आहे; पण त्याच्या धोक्यांपासून सावध राहण्याचीही गरज आहे.

भविष्यात प्रगत देशांकडून त्याचा गैरवापर होण्याची शक्यताही कमी नाही. अशा परिस्थितीत 'एआय'च्या मदतीने या दिशेने सावधपणे पुढे जावे लागणार आहे; पण बाजाराधिष्ठित जागतिक व्यवस्थेकडून शोषण करण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ नये यासाठी त्यासंदर्भातील नियमन योग्य व्हायला हवे. यासाठी कठोर कायदे आणण्याची गरज आहे, जेणेकरून सर्वसामान्यांचे हित जपले जाईल. तंत्रज्ञान असो वा कृत्रिम बुद्धिमत्ता असो, हे एखाद्या ऊर्जेसारखे आहे. तिचा जपून वापर केल्यास मिळणारे फायदे अगणित असतील. याउलट निष्काळजीपणा दाखवल्यास ती खूप घातकही आहे.

सध्याच्या व्यवस्थेतील कृत्रिम बुद्धमत्तेच्या धोक्यांची सरकारांनी काळजी घ्यायला हवी. त्याचा उपयोग मानवाच्या कल्याणासाठी झाला तर चांगलेच आहे; पण ते मानवी नियंत्रणात राहणेही महत्त्वाचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या धोक्यांसाठी आपण स्वत:ला तयार केले नाही, तर ती मानवी संस्कृतीसाठी घातक ठरू शकते, असा इशाराही पाश्चात्त्य जगातील तज्ज्ञ देत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून यंत्रांना मानवाप्रमाणे विचार करण्याची, वागण्याची व निर्णय घेण्याची क्षमता दिली जात असल्याने जगासाठी अनेक प्रकारचे धोके निर्माण होताहेत. अशा वेमी लोकसंख्येच्या बाबतीत जगात प्रथम स्थानी असणार्‍या भारताच्या धोरणकर्त्यांना प्रत्येक हाताला काम देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा धोक्यांचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news