New Irrigation Projects | सिंचनाचा नवा अध्याय

Marathwada vartapatra
मराठवाडा वार्तापत्र
Published on
Updated on

उमेश काळे

कोल्‍हापूर, सांगलीतील पुराचे पाणी राज्यातील दुष्‍काळी प्रदेश विशेषत: मराठवाड्याकडे वळविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कोल्‍हापूर दौर्‍यात घोषित केले. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे सिंचनाचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्‍थितीत रविवारी (दि. ९) कोल्हापुरात विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन झाले. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी कोल्‍हापूर, सांगली जिल्‍ह्यांना पुराचा फटका सहन करावा लागतो, या दोन्‍ही जिल्‍ह्यांतील पुराचे वाहून जाणारे ३५ ते ४० टीएमसी पाणी कॅनॉलने प. महाराष्ट्रातील दुष्‍काळी क्षेत्रात व पुढे ‘उजनी’मार्गे मराठवाड्यात पोहोचविण्यात येईल, ही घोषणा केली. या घोषणेमुळे कृष्‍णेच्या पाण्याबद्दल मराठवाड्याच्या असणार्‍या अपेक्षा पुन्‍हा उंचावल्‍या आहेत.

कृष्‍णेचे पाणी मराठवाड्यात वळविणे ही तशी अशक्‍य वाटणारीच बाब. परंतु, राज्यकर्त्यांनी ठरविले तर अशक्‍य काही नसते. व्‍यापक दृष्टिकोन, दुर्दम्‍य इच्‍छाशक्‍ती, जनतेचा पाठिंबा असल्‍यास बदल घडविणे सहज शक्‍य होते. या अगोदर लातुरात २०१६ मध्ये रेल्‍वेने मिरज येथून कृष्‍णेचे पाणी पोहोचविण्याचा अद्‌भुत आणि यशस्‍वी प्रयोग फडणवीस यांच्या कार्यकाळातच झाला होता. प्रस्‍तावित योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेले सविस्‍तर विवेचन पाहता त्‍यास गती मिळण्याची आवश्यकता आहे.

वास्‍तविक या दोन्‍ही जिल्‍ह्यांतील पुराची समस्‍या सोडविण्यासाठी यापूर्वीच महाराष्ट्र रेझिलिएन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमआरडीपी) तयार करण्यात आला होता. मध्यंतरीच्या काळात त्‍याकडे फारसे लक्ष न दिल्‍यामुळे योजना कागदावर राहिली. त्‍यानंतर सरकारने ‘मित्रा’च्या (महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन) माध्यमातून योजनेवर काम केले. वाहून जाणारे पाणी कॅनॉलने मराठवाड्यामध्ये नेण्याची योजना आहे. ही योजना प्रत्‍यक्षात उतरल्‍यास मराठवाड्यातील दुष्‍काळी भागाचे चित्र पालटण्यास मदतच होणार आहे. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि फडणवीस उपमुख्यमंत्री असताना मराठवाड्याकडे पाणी कसे वळविता येईल, याचा आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्‍यानंतर या प्रस्‍तावावर प्राथमिक विचार झाला खरा, परंतु त्‍यास गती आली नाही. आता मुख्यमंत्र्यांनी कोल्‍हापूर दौर्‍यात केलेले सूतोवाच पाहता यंत्रणेने आराखडा, तांत्रिक बाबी पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावयास हवे. आता या योजनेवर काम झाले आहे, त्‍यात पुराचे पाणी शंभर कि.मी. लांबीच्या बोगद्यातून गुरुत्‍वाकर्षणाच्या सहाय्याने उजनी धरणात सोडण्याचे ठरले आहे. ३,२०० कोटींची योजना असून, पहिल्‍या टप्‍प्‍यासाठी ९२३ कोटींच्या प्रस्‍तावास मान्‍यताही देण्यात आली आहे. दुसर्‍या टप्‍प्‍यात पुराचे पाणी बीड, धाराशिव, सोलापूर, पुणे जिल्‍ह्यांतील दुष्‍काळी प्रदेशाकडे वळविण्यावर भर राहणार आहे. ही योजना खर्चिक वाटत असली, तरी योजना पूर्णत्‍वास गेल्‍यानंतर त्‍याचे लाभ नजरेत भरतील. वास्‍तविक, बच्‍छावत लवादाने दिलेल्‍या निर्णयानुसार महाराष्ट्राला कृष्णा खोऱ्यातील वाट्याला आलेले पाणी ३१ मे २००० पर्यंत वापरणे बंधनकारक होते; अन्यथा हे पाणी दक्षिणेतील राज्यांकडे गेले असते. त्‍यामुळे १९९६ मध्ये ‘कृष्णा खोरे विकास महामंडळा’ची स्‍थापना करण्यात आली आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्‍यात लक्ष घालून कालव्‍यांची कामे मोठ्या प्रमाणात केली. कृष्‍णा खोरे बॉड काढून, स्‍वयंसेवी संस्‍था, सहकारी संस्‍थांच्या मदतीने पाणी अडविण्याची कामे तातडीने करण्यात आली. कृष्‍णेचे पाणी जलदगतीने मागास भागाला मिळावे म्‍हणून कृष्‍णा मराठवाडा सिंचन प्रकल्‍प योजनाही कार्यान्‍वित करण्यात आली आहे. त्‍यातील काही कामे झालेली असल्‍याने मूळ योजना राबविण्यात फारशा अडचणी येणार नाहीत. अर्थात, पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पाणी वाटप करताना दुजाभाव निर्माण होणार नाही, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे.

कृष्‍णा खोर्‍याच्या २१ टीएमसी पाण्यावर मराठवाड्याचा हक्‍क असल्‍याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्‍हणणे आहे. हे पाणी मिळाल्‍यास १ लाख २ हजार ३६० हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करता येईल. पर्यायाने पावसावर अवलंबून असणार्‍या शेतीला चांगले दिवस येतील. शिवाय, मोठ्या शहरांतील पिण्याच्या पाण्याची समस्‍याही दूर होईल. मराठवाड्यातील अनेक लोकप्रतिनिधी, पाणी विषयाच्या अभ्यासकांनी कृष्‍णेचे पाणी मिळावे म्‍हणून प्रयत्‍न केले आहेत. या प्रयत्‍नांना मुख्यमंत्र्यांनी केलेल्‍या नव्‍या घोषणेमुळे बळच मिळाले आहे. गोदावरी, कृष्‍णा आणि तापी या तीन नदी खोर्‍यांमध्ये मराठवाडा विभागलेला आहे. गोदावरी खोरे सर्वात मोेठे ८९ टक्‍के क्षेत्र असणारे असले, तरी नाशिक, अहिल्‍यानगरशी हक्‍काच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तापीचे अडीच टक्‍के, तर कृष्‍णा खोरे ८.९ टक्‍के क्षेत्रावर आहे. हक्‍काचे पाणी हा विषय नेहमीच या भागासाठी आंदोलनाचा ठरतो. त्‍यामुळेच मुख्यमंत्र्यांची घोषणा दिलासादायक आणि मराठवाड्यात सिंचनाचा नवा अध्याय लिहिणारी ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news