निकालाचीच ‘परीक्षा’ | पुढारी

निकालाचीच ‘परीक्षा’

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला. परीक्षा न घेता लागलेला हा ऐतिहासिक निकाल आहे. निकालात टक्केवारीचाही उच्चांक झाला. राज्यातील नऊ विभागीय मंडळातील तब्बल साडेनव्यान्नव टक्क्याहून अधिक विद्यार्थी या परीक्षेत पास झालेत.

कोरोनाच्या संकटकाळात विद्यार्थ्यांच्या भवितव्याइतकेच आयुष्य आणि आरोग्यही महत्त्वाचे आहे, हा एक सूर होता. त्यामुळे प्रत्यक्ष परीक्षा घेणे अशक्य होऊन बसले. त्यानंतर ऑनलाईन परीक्षेबाबतही बराच विचारविनिमय झाला. त्यातही अडचणींचा पाढा लांबतच राहिला. अखेर परीक्षा न घेता नववीच्या मूल्यांकनाच्या आधारेच निकाल देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. अर्थात, दहावीच्या अंतर्गत मूल्यांकन चाचण्या आणि तोंडी परीक्षांतील गुणांकनही निकालात ग्राह्य धरले गेले.

नववीच्या गुणांच्या आधारे पन्नास टक्के गुण देण्यात आले तर दहावीतील तोंडी आणि लेखी परीक्षांच्या आधारे पन्नास टक्के गुण देऊन हा निकाल तयार करण्यात आला. हा निकाल तयार करताना विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांनाच एका परीक्षेला सामोरे जावे लागले. त्या अर्थाने ही निकालाचीच एक परीक्षा म्हणावी लागेल. निकाल लागल्यानंतर संकेतस्थळावर गुणपत्रिकाच दिसत नव्हत्या. दिवसभर लाखो विद्यार्थी आणि पालक त्यामुळे हैराण झाले. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी सुरू केली. दोषींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी आश्वासित केले. त्यातून आणखी एक परीक्षा सुरू झाली, असेच म्हणावे लागेल.

संबंधित बातम्या

या ऐतिहासिक निकालाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. काही जण हलकीफुलकी प्रतिक्रिया व्यक्त करत असले तरी शिक्षणतज्ज्ञांनी याविषयी गंभीरपणे विचार करण्याचा आग्रह धरला आहे. काही वर्षांपूर्वी दहावी-बारावीच्या गुणवत्ता याद्या जाहीर करणेच बंद केले. तरीही नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण असलेले गुणवत्ता यादीत आल्याचे मानले गेले. एक तर निकालाची टक्केवारी अधिक असल्याने चांगल्या महाविद्यालयात अकरावीच्या प्रवेशासाठी प्रचंड चढाओढ होणार आहे. कोरोनाच्या संकटातून शिक्षण विभागालाही मोठा धडा मिळाला, असेच म्हणावे लागेल.

यापुढे नव्या शैक्षणिक धोरणानुसार पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि अकरावी-बारावी असे टप्पे असणार नाहीत. तो बदल व्हायला आणखी काही वर्षे लागतील. अर्थात, असा बदल झाल्यानंतरही शैक्षणिक मूल्यांकनाची पद्धत याविषयीच्या धोरणाबाबत विचार करण्याची ही वेळ आहे. दहावीनंतर आता बारावीचाही निकाल लागेल. दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांना राज्याच्या शिक्षण खात्याने मोठा दिलासा दिला, असेच म्हणावे लागेल. कारण, विद्यार्थ्यांची काही एक चूक नसताना एका महत्त्वाच्या टप्प्यावर त्यांची भवितव्याची गाडी थांबली होती. एका अर्थाने हा शैक्षणिक चक्काजामच म्हणावा लागेल. तो चक्काजाम आता संपला.

विद्यार्थी पुढच्या मार्गाला लागले. आता त्यांची पुढची दिशा कशी असेल हा खरा प्रश्न आहे. कारण, पूर्वी वार्षिक परीक्षा नावाच्या एका आव्हानाला सामोरे जावे लागायचे. आता आठवीपर्यंत विनापरीक्षा पास केले जाते. त्यातच गेल्यावर्षी नववीची परीक्षाही झाली नव्हती. त्यामुळे पहिली ते दहावीपर्यंत परीक्षा न देता पास झालेले विद्यार्थी असा काही जण उल्लेख करतात, तो सर्वस्वी चुकीचा आहे.

कोरोनाची स्थिती वेळीच नियंत्रणात येऊन परीक्षा घेता आल्या असत्या तर यातील बहुतांशी विद्यार्थी उत्तीर्णच झाले असते, याबद्दल कुणालाही शंका असण्याचे कारण नाही. त्यामुळे या निकालानंतर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करावे की नाही, असा प्रश्न पडणार्‍यांना आपल्या नव्या पिढीच्या गुणवत्तेबद्दल खात्री नाही असेच म्हणावे लागेल. ज्या निकालाची जबाबदारी विद्यार्थ्यांवर नाही त्यांना कमी लेखून चालणारच नाही. पूर्वी फार गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जायचे आणि आता परिस्थिती फारच खालावली असा जुना चष्मा लावून बघणार्‍यांनी शैक्षणिक सुधारणा आणि विषयांच्या वाढलेल्या व्याप्तीकडेही लक्ष द्यायला हवे. गेली दोन वर्षे जे विद्यार्थी आयुष्याच्या निर्णायक टप्प्यावर होते त्यांचे आत्मबळ कसे वाढेल याकडेही लक्ष द्यायला हवे. महत्त्वाच्या टप्प्यावर शाळा, कॉलेज बंद. त्यातही ऑनलाईन क्लासेसचा केविलवाणा प्रयोग आणि नंतर थेट निकाल जाहीर झाल्यामुळे या विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावेल, या पद्धतीनेच पुढची पाऊले उचलणे गरजेचे आहे. शेवटी ही एक देशाची नवी पिढी आहे.

त्यांच्यातील काहींमध्ये शैक्षणिक गुणवत्ता कमी असू शकते. ती असतेदेखील. पण, परीक्षा झाली नाही म्हणून त्यांच्या पात्रतेबद्दल सरसकट एकच विचार करणे खूपच चुकीचे आहे हे लक्षात घ्यायला हवे. ही पिढी आणखी नव्या आव्हानांना तोंड द्यायला तयार आहे. त्यांच्या पुढचा प्रवास अजून खडतर असणार आहे. तो प्रवास करताना त्यांना मदत करता आली नाही तर किमान त्यांच्याबाबतीत शंका उपस्थित करू नये. त्यांना प्रोत्साहन आणि पाठबळ दिले तर परीक्षा न देता (न घेताही म्हणा हवे तर) पास झालेले हे विद्यार्थी आयुष्यातील परीक्षेत तावून सुलाखून निघतील हा विश्वास ठेवायला हवा. परीक्षा घेता आल्या नाहीत किंवा घेऊ शकलो नाही हा व्यवस्थेचा भाग आहे. आपण व्यवस्थेला, शिक्षण खात्याला किंवा कुणालाही याबद्दल जबाबदार धरू शकत नाही. त्यामुळे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.

Back to top button