न्यूझीलंड सरकारचा ‘नो स्मोकिंग’ निर्णय

न्यूझीलंड सरकारचा ‘नो स्मोकिंग’ निर्णय
Published on
Updated on

न्यूझीलंडने संपूर्ण देशभरात तंबाखू आणि धूम्रपानावर बंदी घालून व्यसनमुक्त समाजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. हा निर्णय अनुकरणीय आहे.

देशाला व्यसनमुक्त करण्याच्या द़ृष्टीने काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड सरकारने तंबाखू आणि धूम्रपान बंदीबाबत महत्त्वाची घोषणा केली. ही घोषणा जगासाठी आदर्श ठरणार आहे. यावर्षीपासून न्यूझीलंडमध्ये 14 किंवा त्यापेक्षा कमी वयोटातील मुलांना सिगारेट ओढण्यास मनाई असेल. याशिवाय न्यूझीलंडमध्ये तंबाखू विक्री करणार्‍या ठोक विक्रेत्यांच्या संख्येवरही अंकुश बसणार आहे. एवढेच नाही, तर या सर्व उत्पादनांत निकोटीनची पातळी कमी केली जाणार आहे.

न्यूझीलंडच्या आरोग्यमंत्री आयशा वेराल यांनी म्हटले की, युवकांना सिगारेट ओढण्याची सवय लागणार नाही, यासाठी आम्ही खबरदारी घेत आहोत. त्यामुळे युवकांच्या नवीन गटाला सिगारेट विकण्यास किंवा पुरवठा करण्यास विक्रेत्यांना पायबंद घातला जाणार असून तो गुन्हा समजला जाणार आहे. यात सुधारणा झाली नाही, तर सिगारेट ओढण्याचा दर हा पाच टक्क्यांपेक्षा कमी करण्यास अनेक वर्षे लागतील आणि अशा स्थितीत सरकार लोकांना वार्‍यावर सोडून देण्यास तयार नाही. सरकारी आकडेवारीनुसार, सध्या न्यूझीलंडमध्ये 15 वयोगटापर्यंत 11.6 टक्के युवक सिगारेट ओढतात. हाच आकडा सर्वसाधारण युवकांपर्यंत 29 टक्क्यांपर्यंत जातो. सरकारने 2022 च्या शेवटपर्यंत यासंदर्भात कायदा तयार करण्याच्या उद्देशाने जूनमध्ये विधेयक मांडण्याचे ठरवले आहे. त्यानंतर या निर्बंधाला 2024 पासून टप्प्याटप्प्याने अमलात आणले जाणार आहे. त्याचा प्रारंभ हा विक्रेत्यांची संख्या कमी करण्यापासून होईल. त्यानंतर 2025 मध्ये निकोटीनचे प्रमाण कमी करणे आणि 2027 पासून सिगारेटमुक्त पिढी तयार करणे, हे ध्येय निश्चित केले आहे.

प्रत्यक्षात तंबाखू आणि धूम्रपानाचे वाढते सेवन हे आजच्या काळात नवीन आव्हान आहे. जगभरात तंखाखू सेवनामुळे दरवर्षी सुमारे 1,05,38,234 कोटी रुपयांचे (140,000 कोटी डॉलर) नुकसान होते. जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या नवीन तंबाखू कराच्या आधारावर तंबाखूमुळे आरेाग्यावर वाढता खर्च आणि उत्पादकांत होणारी घसरण याचे आकलन होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, संपूर्ण जग सध्या कोरोनाशी सामना करत आहे. अशा स्थितीत तंबाखूवर निर्बंध घालणे आणि त्यासंबंधी धोरणात सुधारणा केल्यास भविष्य आणखी आरोग्यदायी राहू शकते.

जागतिक आरेाग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, तंबाखूमुळे दरवर्षी सरासरी 82 लाख लोकांचा बळी जातो. त्यापैकी 70 लाख मृत्यूचे थेट कारण हे तंबाखू सेवन आहे, तसेच 12 लाख लोकांच्या मृत्यूला अप्रत्यक्षपणे सिगारेट किंवा तंबाखू कारणीभूत आहे. कारण, सिगारेटच्या धुराच्या संपर्कात येणार्‍या लोकांचा जीवदेखील धोक्यात सापडतो. जगभरात तंबाखूचे सेवन करणार्‍या 130 कोटी लोकांपैकी 80 टक्के लोक हे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत राहतात. धूम्रपानामुळे श्वसनविकार होतो आणि हे सर्वश्रूत आहे. अनेक आजारांमागे धूम्रपान आणि तंबाखू कारणीभूत आहे. हृदयविकार, कर्करोग, श्वसनविकार, मधुमेह होण्यास निकोटीन सेवनाची सवय कारणीभूत आहे. एवढेच नाही, तर कोरोना वाढण्यासाठी सिगारेट आणि तंबाखू सेवनही जबाबदार धरले आहे.

तंबाखू कोणत्याही रूपातून घेतली, तरी ती आरेाग्यासाठी हानिकारक आहे. लोकांनी सिगारेट ओढण्याचे प्रमाण कमी करावे, यासाठी सिगारेटच्या पाकिटावर त्याच्या दुष्परिणामाचे फोटो ठळकपणे छापण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय सरकार आणि स्वयंसेवी संस्थांकडूनही जनजागृती मोहीमही राबविली जाते, तरीही नशापान करण्याची सवय कमी होताना दिसून येत नाही. भारतात दरवर्षी 10.5 लाख लोकांचा मृत्यू हा तंबाखूमुळे होतो. 90 टक्के लोकांना फुप्फुसाचा कर्करोग, 50 टक्के लोकांना अस्थम्याचा, तसेच 25 टक्के लोकांना हृदयविकाराचा त्रास होतो.

न्यूझीलंडकडून जगाने शिकण्याची गरज आहे. तंबाखू आणि धूम्रपान विरोधात जागतिक चळवळ उभारायला हवी. मानवतेचे हित जोपासण्यासाठी आणि महसुलाची पर्वा न करता निस्वार्थीपणे आपल्या देशाला व्यसनमुक्त करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू करायला हवेत.

– सुचित्रा दिवाकर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news