लुधियाना येथील स्फोट | पुढारी

लुधियाना येथील स्फोट

लुधियाना येथील जिल्हा न्यायालयात गुरुवारी आत्मघातकी स्फोट झाला. त्यामुळे पुन्हा एकदा पंजाब हादरला आहे. न्यायालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी असा स्फोट घडवण्यामागे लोकांमध्ये असुरक्षेची आणि दहशतीची भावना निर्माण करणे हा हेतू असू शकतोच. त्याबरोबर पंजाबातील सुरक्षा व्यवस्था, पोलिस यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणा यांचेही अपयश या घटनेने चव्हाट्यावर आले आहे. या घटनेने पंजाबात पुन्हा 1980 च्या दशकाप्रमाणे दहशतवाद डोके वर काढणार काय, अशीही आशंका व्यक्त होऊ शकते. या स्फोटाच्या घटनेमागे अनेक वेगवेगळे पैलू असू शकतात आणि त्यातील कोणताही पैलू असला, तरी लोकांच्या मनात पुनरपि भीती पैदा करायला तो कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळेच गुरुवारची ही स्फोटाची घटना सर्वसाधारण अशा सदरात टाकून चालणार नाही. गेल्या सहा महिन्यांत सत्तारूढ काँग्रेस पक्षात बरीच उलथापालथ झाली. भाजपमधून काँग्रेस पक्षात दाखल झालेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांच्या वावदुकी वागण्याने पक्षाची धुणी चव्हाट्यावर धुतली गेली आणि ज्या अमरिंदर सिंग यांचा पंजाबातील काँग्रेसच्या विजयात सिंहाचा वाटा होता, त्यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. सिद्धू यांचा मुख्यमंत्रिपदावर डोळा होता; पण त्यांचे विदूषकी चाळे लक्षात घेऊन काँग्रेस हायकमांडने त्यांची डाळ शिजू दिली नाही आणि चरणजितसिंग चन्नी यांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लावण्यात आली. या घडामोडीत अमरिंदर सिंग पक्षातून बाहेर पडले. आता काँग्रेस पक्षातील या घडामोडीने राज्यात जी राजकीय अस्थिरता निर्माण झाली, तिचाही संदर्भ या स्फोटाच्या घटनेबाबत घेणे जरुरीचे आहे. राज्यातील अस्थिरता अशा घातपाती घटनांच्या पथ्यावर पडल्याचे यापूर्वीचेही अनुभव आहेत. पाकिस्तान अशा संधीची नेहमीच वाट पाहत असतो, याचाही अनुभव काश्मीर आणि पंजाबात आलेला आहे. 1980 च्या दशकात पाकिस्तानने खलिस्तानी दहशतवाद्यांना हाताशी धरून हाच प्रयोग पंजाबात केला होता. अकाली दलाने आनंदपूर साहेल येथे ठराव करीत पंजाबला अधिक स्वायत्तेची मागणी केली. खलिस्तान दहशतवाद्यांना त्यामुळे चांगलेच पाठबळ मिळाले. पुढे जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा भस्मासुर निर्माण झाला. अमृतसरमधील सुवर्ण मंदिर त्याने ताब्यात घेतले आणि ते खलिस्तानी दहशतवाद्यांचा बालेकिल्ला बनवले. सुवर्ण मंदिराची दहशतवाद्यांच्या तावडीतून मुक्तता करण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार मोहीम राबवावी लागली. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आय.ए.एस.च्या पूर्ण पाठबळाने खलिस्तानवाद्यांनी 1980 च्या दशकात पंजाबात नंगानाच घातला. त्यातून तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, जनरल अरुणकुमार वैद्य, संत लोंगोवाल आदींच्या हत्या झाल्या. दहशतवादी हल्ल्यात बारा हजार लोकांचे बळी गेले आणि समृद्ध पंजाबवर अवकळा पसरली. हा इतिहास सांगण्याचे कारण असे की, या ना त्या निमित्ताने पाकिस्तानला भारतामध्ये छुपे युद्ध ज्याला ‘प्रॉक्सी वॉर’ म्हणतात, ते चालवायचे आहे.

सरळ युद्धात भारताचा पराभव करणे अशक्य असल्याचा तीन युद्धांचा अनुभव असल्याने पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी, लष्कराने आणि आयएएस या कुप्रसिद्ध पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेने या छुप्या युद्धाचा सातत्याने पाठपुरावा चालवला आहे. काश्मिरातील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक करीत व्याप्त पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले. त्यामुळे काश्मिरातील दहशतवादी हल्ल्यांना बराचसा आळा बसला आहे आणि त्यामुळेच पंजाबातील अस्थिर राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन आयएएसने आपले कुटिल उपद्व्याप पुन्हा सुरू केले असू शकतील, अशी शंका घ्यायला वाव आहे. बॉम्बस्फोट घडवणार्‍याचा छिन्नविच्छिन्न देह मिळाला आहे. त्यावरून हे आत्मघातकी हल्लेखोराचेच कृत्य असावे, याला बळकटी येते. आत्मघातकी हल्लेखोर हे वैशिष्ट्य कोणाचे असते, हे सांगायची गरज नाही. ते जगजाहीरच आहे. त्यामुळे या हल्ल्याबाबत संशयाची सुई पाकिस्तानप्रणीत दहशतवादी संघटनेच्या दिशेने रोखली गेली, तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पंजाबात आता लवकरच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. काँग्रेस, भाजप, अकाली दल यांच्याबरोबर केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही मैदानात उतरणार आहे. अमरिंदर सिंग यांच्या पक्षत्यागाने काँग्रेसची बाजू काही प्रमाणात तरी कमकुवत झाली आहे. अकाली दलाने भाजपबरोबरची युती संपुष्टात आणली आहे, तर भाजपला मदत करण्याच्या तयारीत अमरिंदर सिंग आहेत. आम आदमी पक्षाने पंजाबात बस्तान बसवायला प्रारंभ केला आहे. अशा लढतीत कोण बाजी मारणार, हे चित्र सध्या तरी अस्पष्ट आहे. त्यामुळे अशा घातपाती घटनांमागे अन्य काही कारण असू शकेल काय, असाही चर्चेचा सूर आहे. अलीकडेच पंजाबात धर्मग्रंथाचा अवमान झाला म्हणून दोघांची हत्या करण्यात आली होती. अशा घटना राजकीय लाभासाठी घडवण्यात आल्या आहेत का, असाही संशय या चर्चेतून व्यक्त होताना दिसत आहे. गेल्या पाच वर्षांत पंजाबात शांतता होती आणि आता निवडणुकीच्या तोंडावरच नेमक्या अशा घटना कशा होतात, असाही प्रश्न प्रतिक्रियांतून व्यक्त होत आहे. अशी शंका घेतली जात असली, तरी ज्या पद्धतीने आत्मघातकी स्फोट झाला, त्यावरून या शंकांना कितपत आधार आहे, असा प्रश्न पडू शकतो. काही राजकीय लाभासाठी न्यायालयासारख्या ठिकाणी आत्मघातकी स्फोट घडवण्याचे घातपाती कृत्य अंगलट येऊ शकते. त्यामुळे दहशतवादी संघटना वगळता तसा कोणाच्या डोक्यात उपद्व्याप येण्याची शक्यता कमी आहे. शक्यता कोणतीही असली तरी पंजाबसारख्या सीमेवरील राज्यात कोणतेही अस्थैर्य निर्माण होणे हे देशाला परवडणारे नाही. असे अस्थैर्य शत्रूच्याच पथ्यावर पडेल. त्यामुळे पंजाबातील सुरक्षा यंत्रणा, गुप्तचर यंत्रणा आणि पोलिस यंत्रणेने अधिकाधिक सतर्क राहण्याची गरज आहे. पुन्हा असे प्रयत्न होण्यापूर्वीच ते उधळून लावण्याची आणि त्यामागील कर्त्या-करवित्यांचा पर्दाफाश करण्याची गरज आहे.

Back to top button