खानदेशी तडका! जळगावच्या राजकारणावर वर्चस्व गाजवण्याचा संघर्ष तीव्र | पुढारी

खानदेशी तडका! जळगावच्या राजकारणावर वर्चस्व गाजवण्याचा संघर्ष तीव्र

जळगावच्या राजकारणावर वर्चस्व गाजवण्याचा संघर्ष तीव्र होत आहे. महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर खास खानदेशी पद्धतीने शरसंधान करत आहेत. यापुढील काळात त्यांची भाषा अधिक जहाल होण्याची चिन्हे आहेत.

झणझणीत, चटकदार खाद्यपदार्थ हे खानदेशचे आणि त्यातही जळगावचे खास वैशिष्ट्य. सध्या येथील राजकीय नेतेमंडळींनीही मसालेदार संवादफेक करत अशाच एकापेक्षा एक रेसिपी सादर करण्याचा धडाका लावला आहे. त्यात सत्ताधारी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी आघाडी घेतली आहे. दोन्ही पक्ष राज्याच्या सत्तेतील भागीदार असले, तरी जळगावच्या राजकारणावरील वैयक्तिक पकड या पक्षांचे प्रमुख नेते विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मजबूत करायची असल्याने त्या निकडीतून केल्या जाणार्‍या वक्तव्यांमुळे जनतेला (आणि भाजपलाही!) ही मेजवानी वारंवार मिळू लागली आहे. तसे पाहिले, तर खानदेशातील राजकीय वादातला तिखटपणा नवा नाही. अलीकडे त्याला स्पेशल तडका दिला जाऊ लागला आहे एवढेच. जिल्हा बँक, नगर पंचायत आदी निवडणुकांच्या निमित्ताने ‘आमटी’ला आणखी उकळ्याही दिल्या जात आहेत. यामुळे खानदेशवासीयांची जिव्हा तृप्त होत नसली, तरी कर्णेंद्रिये मात्र चांगलीच सुखावत आहेत.

मुळात खानदेशला मिळमिळीत, बेचवपणाचे वावडे आहे. जे वाढाल ते चमचमीत हवे. राजकीय बल्लवाचार्य येथील लोकांची ही गरज संपूर्ण रस घेऊन पूर्ण करत असतात. शिवसेनेचे बलदंड नेते गुलाबराव पाटील हे त्यापैकीच एक. आक्रमक, बोचर्‍या वक्तृत्वासाठी ते प्रसिद्ध आहेत. राज्याचे पाणीपुरवठामंत्री असले, तरी बोलताना आपल्या विधानात पाणी मिसळून ते सौम्य करण्याची गरज त्यांना कधीच भासलेली नाही. उलट, हाच आपला यूएसपी असल्याचे पक्के ठाऊक असल्याने, चर्चा होईल अशी विधाने करण्याची पुरेपूर काळजी ते घेतात. त्यातून मुबलक टाळ्या-शिट्याही वसूल करतात. पानटपरी चालकापासून ते शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये जागा मिळवण्यापर्यंतच्या त्यांच्या प्रवासात ही कला चांगलीच उपयोगी ठरली. वक्तृत्वगुण विकसित करून राजकीय लक्ष्य गाठल्याचे त्यांचे हे उदाहरण सामान्य कार्यकर्त्यांसाठी आदर्शवत ठरावे असेच आहे; मात्र केवळ भाषणबाजी करून काही होत नाही, त्यासाठी विकासकामेही करावी लागतात, असा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी बोदवड नगर पंचायत निवडणूक प्रचारसभेत दिला. अर्थात, या विकासकामांचा दर्जा स्पष्ट करण्यासाठीही त्यांना त्यांचे भाषा कसबच कामाला आले. राष्ट्रवादी काँगे्रसचे नवे आशास्थान नाथाभाऊ खडसे यांच्या आमदारकीच्या काळातील रस्त्यांपेक्षा सरस रस्ते आपण केल्याचा दावा करताना त्यांनी या रस्त्यांना थेट ज्येेष्ठ अभिनेत्री व भाजपच्या खासदार हेमामालिनी यांच्या गालाची उपमा दिली. सार्वजनिकरीत्या असे वक्तव्य करणे एकूणच महिलावर्गाच्या सन्मानाला तडा देण्यासारखे आहे, यात शंकाच नाही. त्यावर तशा तीव्र प्रतिक्रियाही उमटल्या. खुद्द हेमामालिनी यांनी, सर्वसामान्य व्यक्ती असे बोलली, तर एकवेळ समजण्यासारखे आहे; परंतु लोकप्रतिनिधींकडून अशा भाषेचा वापर होणे आक्षेपार्ह ठरते, असे म्हणत नाराजी व्यक्त केली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर याही आक्रमक झाल्या. सुदैवाने गुलाबरावांना त्यांच्याकडून चुकीचा शब्द सुटल्याची जाणीव झाली आणि त्यांनी माफीही मागितली. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सकारात्मकता ओतप्रोत भरून राहिलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पाटलांच्या विधानाकडे नकारात्मकतेने पाहिले गेल्याचे सांगत या उपमेमुळे हेमामालिनी यांचा सन्मानच झाल्याचे म्हटले! त्यामुळे मूळचे गुलाबरावांचे विधान अधिक वादग्रस्त की राऊत यांनी त्याचे केलेले समर्थन, असा प्रश्न पडला आहे.

तोडीस तोड विधाने करण्यात माहीर असलेले खडसे यात मागे राहणार नव्हतेच. एका टपरीवाल्याला मी मंत्री बनवला, अशा शेलक्या शब्दांत त्यांनी गुलाबरावांच्या विकास संवादाची परतफेड केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडसे यांना ‘बावनकशी सोनं’ संबोधत त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्या पाठोपाठ ‘गुलाबपुष्पां’ची वृष्टी झाल्याने नाथाभाऊंपुढील आव्हान तिहेरी असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपबरोबरच त्यांना गुलाबराव पाटलांच्या रूपाने शिवसेनेशीही संघर्ष करायचा आहे. राष्ट्रवादीत त्यांचा मार्ग निष्कंटक आहे, असेही नाही. सर्वाधिक नगरसेवक निवडून आणणे, भाजपच्या अनेक पदाधिकार्‍यांना राष्ट्रवादीत डेरेदाखल करणे अशा गोष्टींमध्ये त्यांना यश येत आहे. मात्र, राष्ट्रवादीवर पूर्ण वर्चस्व प्राप्त करण्यासाठी त्यांना दोन माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर व डॉ. सतीश पाटील यांचे सहकार्य मिळवावे लागणार आहे. खडसे यांनी पाठपुरावा केलेल्या घरकूल भ्रष्टाचार प्रकरणात देवकर यांना शिक्षा झाली. त्यामुळे देवकर किती साथ देतील, याची उत्सुकता आहे. ही स्वपक्षीय धग, शिवसेनेचे चटके आणि भाजपचे नेते गिरीश महाजन अधूनमधून ओकत असलेली आग यात हे ‘बावनकशी सोने’ कसे उजळते, ते बघायचे.

प्रताप जाधव, नाशिक

Back to top button