

शिवसेना नेते रामदास कदम यांनी 'मातोश्री'विरुद्ध जो जाहीर थयथयाट केला, तो अगदीच कोकणापुरता मर्यादित किंवा स्थानिक म्हणता येणार नाही. परिवहन मंत्री अनिल परब यांनी रत्नागिरीत जाऊन कदम यांचे समर्थक असलेले शिवसेनेचे अनेक पदाधिकारी बदलले आणि कदमविरोधकांची वर्णी या पदांवर लावली. कदम हे शिवसेनेचे नेते असल्यामुळे त्यांना बदलणे तेवढे परबांना शक्य नव्हते. अन्यथा या एकाच दौर्यात त्यांनी कदम यांनाही बाजूला केले असते; पण कदम पडले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते. शिवसेनेमध्ये नेतेपद म्हणजे अष्टप्रधान मंडळात बसण्यासारखे आहे.
संघटनेची ध्येयधोरणे ठरविणार्या नेत्यांमध्ये कदमांचीही गणना होते. परब यांनी जे संघटनात्मक बदल जाहीर केले ते संघटनात्मक किती आणि व्यक्तिगत सूडचक्राचा भाग म्हणून किती, हा प्रश्न आहे. परब यांच्या मालमत्तेची आणि खासकरून अवैध रिसॉर्टची माहिती कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्यांपर्यंत पोहोचवली आणि सोमय्या थेट रिसॉर्टवर जाऊन सेल्फी काढून आले.
याचा हिशेब परब यांना चुकता करायचा होता. तो त्यांनी केला. पंख छाटले जात असताना एक शब्दही बोलणार नाहीत ते रामदासभाई कसले? खास पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांनी एकाच वेळी परब, शिवसेनेचे नेतृत्व, 'मातोश्री'त बसून निर्णय घेणारी मंडळी अशा सार्यांनाच अंगावर घेतले. परब यांना आवरा, त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे.
त्यांना जमिनीवर आणा, असे आदेश त्यांनी सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही देऊन टाकले. या संपूर्ण पत्रकार परिषदेत कदम यांनी जी चिंता वाहिली, ती संघटनेची नव्हे, तर आमदार असलेल्या मुलाची, योगेश रामदास कदम यांची! माझ्या मुलाचे करिअर संपविण्याचा कट रचला जात असेल तर सेनेत राहायचे किंवा नाही याचा विचार केला जाईल, असे कदम म्हणाले. पक्षांतराची ही धमकी देताना अंमळ एक महिन्याची मुदतही त्यांनी घेऊन ठेवली.
म्हणजे तोपर्यंत वाटाघाटींना वेळ मिळेल, 'मातोश्री'वर इच्छा नसतानाही जाऊन येता येईल, असा विचार कदम यांनी केला असावा. गेले 40 दिवस शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजारी होते. त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया झाली. वर्षा बंगल्यावर परतल्यानंतरही ते 'बायोबबल'मध्ये राहून शक्य तितके सरकार चालवत आहेत. अशा परिस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील सारे पदाधिकारी एका झटक्यात बदलण्याचा निर्णय घेतला तरी कुणी? उद्धव सक्रिय नसताना शिवसेना कोण चालवत आहे?
ज्यांचे वय झाले त्यांना मंत्रिपद देऊ नका, असे म्हणे कदम यांनी उद्धव ठाकरेंना सुचवले होते. या सूचनेत कदम यांनी स्वत:सह सुभाष देसाई, दिवाकर रावते यांचीही नावे घेतली. मात्र, पुढे सुभाष देसाईंना मंत्रिपद मिळताच आपण व्यथित झालो, असे कदम म्हणतात. ही व्यथा देसाईंच्या मंत्रिपदाची नाही. सेनेच्या पदांवरून कदम समर्थकांची हकालपट्टी करण्याचा निर्णय हा सुभाष देसाईंनीच घेतला. मात्र, हे बदल एक पत्रक काढून जाहीर करण्याचा रिवाज त्यांनी पाळला नाही.
बर्याचदा असे बदल मुखपत्रातूनदेखील जाहीर केले जातात. कदम समर्थकांना हटविण्याचा निर्णय मात्र रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी जाहीर केला. देसाईंनीच आपले पंख छाटले. आपण शिवसेना नेते असताना एका शब्दानेही आपल्याला विचारले गेले नाही, ही खरी कदमांची व्यथा. ती व्यक्त करण्यासाठी कदमांनी देसाईंच्या मंत्रिपदाचा आक्षेप पुढे केला एवढेच!
आधी म्हटल्याप्रमाणे हे सारे सेनेचे अंतर्गत राजकारण केवळ रत्नागिरीपुरते पाहून चालणार नाही. सेनेत गट-तट आणि त्यातून निर्माण होणारे वितुष्ट उदंड झाले आहे. औरंगाबादेत मागच्या लोकसभेला सेना नेते चंद्रकांत खैरे पराभूत झाले. स्व. रायभान जाधव यांचे चिरंजीव हर्षवर्धन रिंगणात उतरल्याने हिंदू आणि त्यातही मराठा मते दुभंगली आणि एमआयएमचे इम्तियाज जलील जिंकले, हा फार सरळसोट निकाल झाला. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला. शहरातून सेनेचे दोन आमदार निवडून आलेले. असे असताना कन्नडपुरते मर्यादित राजकारण करणारे हर्षवर्धन जाधव अख्खा लोकसभा मतदारसंघ कसा फिरवू शकतात? शिवसेनेमध्ये खैरेंना असलेला अंतर्गत विरोधदेखील एमआयएमच्या पथ्यावर पडला.
खैरे हे संत, महंत आणि सज्जन म्हणून ख्यातकीर्त असले तरी सेनेमध्ये त्यांचे विरोधक कमी नाहीत. त्यांचा पराभव हा सेनेतील गटातटाचाच परिणाम समजावा लागतो. अशाच गटबाजीचे आणि वितुष्टाचे खरे तर स्वत: कदम बळी ठरले आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत खेडमधून कदम पराभूत झाले. याचे कारण शिवसेनेचेच नेते असलेले अनंत गीते यांनी कुणबी मतांची सारी रसद तेव्हा भास्कर जाधवांकडे फिरवली. खेडमधून सलग चारवेळा निवडून आलेले कदम यांना गीतेंनी सरळ घरी बसविले.
शिवसेनेने त्यांचे चिरंजीव योगेश कदम यांना मागच्या विधानसभेला दापोलीतून उमेदवारी दिली म्हणून कदम विधानसभेत दिसतात. आता सेनेतील अंतर्गत गटबाजीचा धोका आपल्या मुलालाही असल्याची जाणीव कदम यांना झालेली दिसते. शिवसेनेमध्ये नेतेपद मिळाले की, राजकीय नजर व्यापक व्हावी अशी अपेक्षा असते. नेतेपद मिळूनही कदम यांचे नेतृत्व जिल्हाव्यापीदेखील नाही. जिल्ह्यात आणि कोकणात कदमांचे कुणाशी पटते? त्यांचे रवींद्र मानेंशी शत्रुत्व. माजी आमदार सूर्यकांत दळवींशी वैर. भास्कर जाधव सेनेत असताना त्यांच्याशीही वितुष्ट. जाधव राष्ट्रवादीत जाऊन पुन्हा शिवसेनेत आले तरी हे वितुष्ट वाढलेलेच आहे.
पूर्वी रामदास कदम भास्कर जाधवांवर चारचौघांत दादागिरी करत. आता भास्कर जाधव कदमांना शिवसेनेचा नेता म्हणूनही गणत नाहीत. उलट ते म्हणतात, रामदासभाई म्हणजे सेनेतील 'जितेंद्र'… पांढरेशुभ्र कपडे, पांढरे शूज आणि पोटावर वेणीचा पांढरा पट्टा! रामदास कदम हे असे सेनेच्या वर्तुळात थट्टेचा विषय झाले असले तरी त्यांच्या निमित्ताने शिवसेनेतील कडवट शिस्तीची व्यवस्था किती खिळखिळी झाली आहे याचा अंदाज यावा.
नेते, विभागीय संपर्क नेते, जिल्हा संपर्क नेते अशी एक उतरंड सेनेमध्ये होती. प्रत्येक स्तरावर काम करणार्या नेत्याचे महत्त्व अबाधित होते म्हणूनच दिवाकर रावतेंसारखा नेता मराठवाडा, पश्चिम विदर्भ, कोल्हापूरसारख्या भागांत सेनेची बांधणी करू शकला. अनिल परब कोण आहेत? ते रत्नागिरीचे संपर्क नेतेही नाहीत. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे ते पालकमंत्री आहेत. सुभाष देसाईंनी बोटातली अंगठी फिरवावी तसे पदाधिकारी बदलले आणि परबांनी ते जाहीर केले.
दीड महिन्यापासून एसटी कर्मचार्यांचे आंदोलन मुंबईत सुरू असताना परब यांच्या मदतीला सेनेचा कुणीही मंत्री धावला नाही. असे आंदोलन उभे राहिले की, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तरी धावणार, हा आतापर्यंतचा रिवाज आहे; पण शिंदेदेखील परबांच्या मदतीला धावले नाहीत. कारण, परबदेखील कधी कुणाच्या मदतीला धावून गेल्याची नोंद नाही. रामदास कदमांच्या निमित्ताने शिवसेनेत सुरू असलेली गटबाजी, फंदफितुरी आणि हेव्यादाव्यांचे राजकारण समोर आले. खरे तर हे इतर पक्षांचे आजार. ते शिवसेनेलाही जडले. हा संसर्ग वाढू नये म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख शिवसेनेसाठी कुठला 'बायोबबल' निर्माण करणार आहेत?
विवेक गिरधारी