लवंगी मिरची : सहकाराच्या नावानं चांगलीच धामधूम | पुढारी

लवंगी मिरची : सहकाराच्या नावानं चांगलीच धामधूम

लवंगी मिरची 

ज्ञानू : येशा, सहकाराच्या नावानं चांगलीच धामधूम चाल्लीये नव्हं का ग्येल्या दोन तीन दिवसांत ?

यशवंता : मग… चालनारच ना! आक्षी दिल्लीहून स्वारी आलीये ना…!

ज्ञानू : पन इरादा काय हाय या येवढ्या मोठ्या मोहिमेचा ?

यशवंता : आरं, येवढं कळना का तुला? मोठ्या सायबांच्या कंटरोलमदे असलेला ‘सहकारगड’ काबीज करायचाय ना त्यांना…
ज्ञानू : बरूबर, बरूबर… त्यामुळंच आल्याआल्याच दिल्लीकरांनी लय बेस भाषण ठोकलं, म्याबी आईकलं ते टीवीवर… मला तर गड्या लईच पटलं त्यांचं. सहकाराची पार रयाच गेलीये आपल्या महाराष्ट्रात… साकर कारखानं आजारी काय पडले, काई लिलावात गेले, तुमा-आमा शेतकर्‍यास्नी भाव मिळना धड. आता तर कारखानं खासगी करण्याचा सपाटाच लागलाय. कसा टिकणार सहकार म्या म्हनतो? दिल्लीकरांनी परवाच सांगितलं ठनकावून, आता खासगीकरण बंद. आमी सहकार जगवणार, कारखानं शेतकर्‍यांच्याच ताब्यात राहणार.

यशवंता : ज्ञान्या, अगदीच बावळट हायेस रे तू? आरं, कारखान्यांची ही अशी अवस्ता कुनी येका नेत्यानं केली का येकाच पक्षाच्या मंडळींनी केली? हे बघ, आपल्या राज्यात कारखानं हायेत दोनशे. त्यातले सव्वाशे कारखानं तोट्यात. आतापातूर चाळीस कारखान्यांचं दिवाळं वाजलंय अन् पस्तीसवर कारखानं खासगी लोकांनी विकत घेतल्यात. घेतल्यात तर घेतल्यात; पण ते बी मातीमोलभावानं. आदी कारखानं लुटायचे, ते आजारी झाले की लुटनार्‍यांनीच विकत घ्यायचे. आरं, दोनदोनशे कोटींची मालमत्ता असलेले कारखाने धा-पाच कोटींतघ्यायचे. तू दिल्लीकरांच्या भाषनाणं पाघळला ना, त्यांच्याच पकशाच्या मंडळींनीबी किती कारखानं घेतल्यात बघ जरा…

ज्ञानू : मला बावळट म्हणतोस अन् येकतर्फी बाजू मांडतो व्हय येशा? आरं, मला सांग, आपल्या सायबाची कमांड हाय किनई सहकारावर? निसत्या सहकारावर न्हाई तर आपल्या राज्यातल्या किती क्षेतरांवर त्यांची कमांड हाये! तुला बरूबर म्हाईतीये. त्यांच्या मनात आसलं तर इतं येखादी गोस्ट होतीया अन् नसलं त्यांच्या मनात तर व्हत नाई. त्यांनीच ठरवलेला मुक्यमंत्री झाला कानाई ? अन् ते मुक्यमंत्री किती दिवस राहणार, तेबी तेच ठरवणार. आसं आसंल तर मंग कारखान्यांची ही अशी अवस्ता होईपतूर ते निसते बघत का राह्यले? त्यांच्याच्यानं हुईना म्हनून तर दिल्लीकरांना या मोहिमेवर यावं लागलं ना? आता बघच तू महाराष्ट्रातला सहकार पुना कसा फुलतो ते?…
यशवंता : फारच बाजू घेतोय की तू दिल्लीकरांची. बरं बाबा, माझंबी र्‍हाऊ दे अन् तुजंबी. बघूच आता या सार्‍यानं तरी सहकारात उजेड पडतोय का ?

घोडामैदान जवळच हाये आता… रामराम…

Back to top button