शरद पवार यांच्यासाठी दिल्ली किती दूर?

शरद पवार यांच्यासाठी दिल्ली किती दूर?
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 2024 च्या लोकसभा निवडणुकीत चमत्कार घडवण्याची चर्चा झाली. पवार यांनी देशाचे नेतृत्व करावे, ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्‍त केलेली भावना आणि वास्तवाचा अदमास घेण्याचा प्रयत्न…

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे कर्तृत्व, विकासातील योगदान, शाहू, फुले, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा, सामाजिक जाण, भूमिका आणि अभ्यास मोठा आहे. देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यात निश्‍चितच आहे. महाराष्ट्राला दिशा देणार्‍या या नेत्याने आता देशाचेही नेतृत्व करावे, ही त्यांच्या तमाम कार्यकर्त्यांची भावना आहे आणि ती आजची नाही. मात्र, तितकेच पुरेसे आहे काय?, पवार यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी उदयास येणार काय? देशाला ठोस विरोधी पक्ष मिळणार काय? यासारखे कळीच्या प्रश्‍नांवर आताच चर्चा झाली पाहिजे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना त्या विदेशी असल्याच्या मुद्द्यावर पवार यांनी विरोध केला, पवार काँग्रेस पक्षातून बाहेर पडले, त्यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व दिले गेले नाही. त्यालाही आता वीस वर्षे लोटली. केंद्रीय राजकारणात पवार यांचा त्यावेळी मोठा दबदबा होता. तिसर्‍या आघाडीचे प्रयोग जोरात सुरू होते. जनमताचा कौलही कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने नव्हता. त्यावेळीही काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्याचा भाजपसह तिसर्‍या आघाडीचा अजेंडा होता. पवार यांच्याकडे आघाडीचे नेतृत्व देण्यावर काही घडले असते, तर ते तेव्हाच घडण्याची शक्यता अधिक होती; पण आघाडीच्या राजकारणात पवार यांना पक्षीय संख्याबळ देता आले नाही. काँग्रेसमधील फूट पथ्यावर पडेल आणि मोठ्या संख्येने खासदार बाहेर पडतील, पवार यांच्या पाठीशी उभे राहतील, असे वाटत होते. तसे झाले नाही. अर्थात, काँग्रेसच्या माघारीमुळे भाजपला चाल मिळाली आणि एनडीए पुढे झाली.

केंद्रातील सत्तेला पर्याय देण्याची, देशासमोरील सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्याची, विचारसरणीतील भेद मांडण्याची पवार यांची धडपड आहे आणि ती प्रकर्षाने जाणवते. भाजपाला पर्याय देण्याची भाषा बोलणार्‍या मोजक्याच नेत्यांपैकी ते आघाडाीचे आहेत. दिल्लीच्या सत्तेबद्दल 'आपल्याकडे संख्याबळ आहे कुठे?' असा प्रतिसवाल ते करतात. चार-पाच खासदारांच्या बळावर ही लढाई जिंकता येत नाही, याचे भान त्यांना आहे. दुसरीकडे त्यांना एकतर केंद्रात पुन्हा एकदा सत्ताबदल शक्य आहे, हे दिसू लागले आहे किंवा त्या शक्यतांची पडताळणी त्यांना करायची आहे. महाराष्ट्रातील सत्ताप्रयोगाने त्यांना मोठे बळ मिळाले. केंद्रीय सत्तास्थानी भाजप बहुमतात बसला असला, तरी प्रादेशिक राजकारणात तो हुकमी एक्‍का नाही. पश्‍चिम बंगालच्या निवडणूक निकालाने भाजपला बाजूला सारण्याच्या पवार आणि ममता यांच्या महत्त्वाकांक्षेला पुन्हा पालवी फुटली. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील द्रमुक आणि वायएसआर काँग्रेसचे संख्याबळ मोठे आहे. ते पक्ष ऐन मैदानात कोणती भूमिका घेणार, हा प्रश्‍न वेगळा. शिवसेनेची (19) ताकदही कामी येणार आहे. तृणमूल काँग्रेसची संख्या 22 आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अवघे पाच खासदार. सर्व मिळून हे बळ शंभरावर जात नाही, तरीही पवार आणि ममता हे दोन नेते नव्या आघाडीसाठी सरसावले आहेत. ममतांना काँग्रेस नको आहे. आपल्या नेतृत्वाखाली आघाडीची मोट नव्याने बांधता येईल, असा त्यांचा होरा आहे. काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय हे राष्ट्रीय राजकारण शक्य नाही, असे पवार यांना वाटते. मात्र, काँग्रेसला वगळून काहीच घडणार नसले, तरी त्या शक्यताही पडताळल्या जात आहेत. जुन्या चुका टाळण्याची खबरदारी पवार घेत असले, तरी अनेक पर्यायांवर चर्चा सुरू झाल्या आहेत. काँग्रेसला वगळून प्रादेशिक पक्षांची आघाडी, काँग्रेसच्या सहभागाने समविचारी पक्षांची आघाडी, काँग्रेसच्या पाठिंब्याने नवी आघाडी, असे हे पर्याय असतील. मात्र, काँग्रेसची भूमिका निर्णायक असेल, यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजही हा पक्ष बेदखल केलेला नाही. ही झोपलेली काँग्रेस कधी जागी होईल, हे सांगता यायचे नाही. काँग्रेसला पोखरून काढायचे काम काँग्रेसपेक्षा तिसर्‍या आघाडीने केले होते. भाजपसाठी राजकीय पटलावर मोठी जागा करून दिली होती, हा इतिहास आहे.

भाजप तेव्हा कुठे होता?

भाजप अजून राजकीय पटलावर आपल्या उत्कर्षबिंदूवर पोहोचलेला नाही, असे वक्‍तव्य अलीकडेच पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने केलेे होते. त्याची नोंद विरोधी पक्षांनी किती व कशी घेतली माहिती नाही. पण, ती बाजू तपासून घेतल्यास भारतीय राजकारणाच्या मंचावर, जनमानसावर अधिराज्य गाजवण्याचे आणखी काही 'प्रयोग' या पक्षाला करायचे आहेत, असे दिसते. भाजपला सत्तेवर आणण्याच्या आणि सत्ता टिकवून ठेवण्याच्या दीर्घकालीन धोरणाचा तो महत्त्वाचा टप्पा येथून पुढे म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सुरू होईल, असे दिसते. देशाला एका समान धाग्यात बांधण्याचे आणि दुसरे पर्याय उभे राहू न देता आपली अपरिहार्यता स्पष्ट करण्याचे आणि ती देशावर नकळतपणे लादण्याचे ते धोरण यापुढील राजकारणाची दिशा ठरवेल. सत्तेसाठीची ठोस पार्श्‍वभूमी तयार करण्यात, जनमानसाच्या मनोभूमीवर मनसोक्‍त खेळण्यात भाजपला आलेले 'यश' हे त्यामागचे खरे कारण. अनेक प्रश्‍न डोक्यावर असताना, महागाई, बेकारी, बेराजेगारी, इंधनाच्या दराने शंभरी ओलांडली असताना लोक अजुनही गप्प का आहेत? ते रस्त्यावर येत नाहीत, आंदोलने करीत नाहीत, आक्रोश मांडत नाहीत, ते का? या प्रश्‍नांतच ते कारण दडले आहे. त्यामुळेच प्रश्‍न आहेत कुठे, असाही प्रश्‍न दुसर्‍या बाजूने (सरकारच्या) विचारला जाऊ शकतो. देशाच्या राजकारणाचा 'तुटका-फुटका' कौल बाजूला पडून आता भाजप केंद्रित आणि विशेषत: पंतप्रधान मोदीकेंद्रित एकपक्षीय राजकारणाचे वारे आहे. एनडीएची गरजच उरणार नाही, अशी पक्षाची वाटचाल आहे. जनमानसातील खदखदीला तोंड फोडण्यात विरोधी राजकीय पक्ष किती यशस्वी होतात, त्यावरच विरोधी सशक्‍त आघाडीच्या शक्यतांना बळ मिळेल.

'समाजातील प्रत्येक घटकात देश बदलण्याची ताकद आहे, त्याचे दु:ख समजून घ्या, त्या आधारावर समाजकारण, राजकारण केल्यास देशाचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही', हे पवार यांनी केलेले आवाहन कार्यकर्त्यांचे खरे दिशादिग्दर्शन करणारे आणि वस्तुस्थितीला धरून आहे. सत्तेसाठी या सत्याच्या मार्गावरून जाण्याची कोणाची तयारी आहे काय, हा खरा प्रश्‍न आहे. काँग्रेसी विचारांचे आणि चळवळीचे आकुंचन, नेतृत्वाचा कमकुवतपणा, सर्वसमावेशक राजकारणाची संपत चाललेली गरज या बाबी सर्वाधिक चिंतेच्या म्हणाव्या लागतील. देशाला राजकीय पर्याय देण्याची ताकद याच विचारात आहे.

– विजय जाधव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news