बंडू : बाबा, माफीनामा म्हणजे काय?
बाबा : माफीनामा म्हणजे माफी मागणे.
बंडू : बाबा, माफी आणि माफीनामा यात काहीच फरक नाही का?
बाबा : माफी म्हणजे तोंडी माफी मागणे आणि माफीनामा म्हणजे लेखी माफी मागणे.
बंडू : लेखी माफी मागण्याची वेळ एखाद्यावर का येते?
बाबा : एखादी गोष्ट चुकीची आणि खोटी आहे, हे माहीत असूनही केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी एखादी गोष्ट रेटून केली की, लेखी माफी मागावी लागते. त्याला माफीनामा असे म्हणतात. विधाने जितक्या ताठ मानेने केली जातात, तितकीच मान खाली घालून माफीनामा लिहावा लागतो. बंडू, माफीनामा फारच वाईट रे! अशी वेळ नवाब असो की सामान्य माणूस, कुणावरही येऊ नये बघ!
बंडू : माफीनामा म्हणजे इज्जतीचा पंचनामा की!
बाबा : साधासुधा नाही सगळ्या लोकांत इज्जतीचा पंचनामा होतो माफीनाम्यामुळे!
बंडू : तरीही लोक असे का करतात?
बाबा : प्रसिद्धीसाठी आणि चमकत राहण्यासाठी!
बंडू : प्रसिद्ध होण्यासाठी इतर गोष्टीही करता येतात की बाबा?
बाबा : चांगल्या गोष्टी कळण्यासाठी अभ्यास लागतो बंडू.
बंडू : म्हणजे माफीनामा ज्यांना द्यावा लागला, त्यांचा अभ्यास नाही, असं म्हणायचं आहे की काय तुम्हाला?
बाबा : दुसर्यांवर आरोप करण्यासाठी स्वतः अभ्यास करण्याची गरज नसते. दहावी-बारावीच्या परीक्षांत पेपर लिहिणार्या विद्यार्थ्यांना जसे इतर लोक कॉप्या पुरवत असतात तसं या आरोप करणार्यांनाही कॉप्या पुरविल्या जातात; पण माफीनामा कॉप्या पुरविणार्यांना द्यावा लागत नाही.
बंडू : बाबा माफीनामा टाळण्यासाठी काय केले पाहिजे?
बाबा : धांदात खोटे बोलणे आणि बेछूट आरोप करणे सोडून द्यावे लागते. इतरांकडे बोट दाखवताना उरलेली चार बोटं आपल्याकडे आहेत, हे लक्षात ठेवले पाहिजे.
बंडू : हे लक्षात ठेवण्यासाठी काय केले पाहिजे?
बाबा : एक म्हणजे 'वड्याचं तेल वांग्यावर' न काढणे आणि दुसरं म्हणजे दुसर्याच्या चमच्यानं पाणी न पिणे!
बंडू : वा बाबा! असे झाले तर नवाबचा रुबाब जाणार नाही.
बाबा : एक नंबर बोललास!