अवघा देश गेल्या दोन दिवसांपासून सुन्न आहे. पाकिस्तान या पारंपरिक शत्रूला टक्कर देण्याबरोबरच आता चीनसारख्या महाबलाढ्य शक्तीच्या वाढत्या कारवायांना हाणून पाडण्याचे अवघड शिवधनुष्य लिलया पेलणारा, देशाच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्या मजबूत खांद्यांवर घेतलेला आपला सेनापती, तिन्ही संरक्षण दलांचा प्रमुख अचानक एका अपघाताने आपल्यातून निघून गेला. आधुनिक तंत्राचा ध्यास घेऊन, सैन्यदल, नौदल आणि हवाई दल या लष्कराच्या तिन्ही घटकांमध्ये परस्पर समन्वय साधून देशाला संरक्षणसज्ज करणारा, डोकलाममध्ये चिन्यांना रोखण्यापासून ते पाकव्याप्त काश्मिरातील उरीमध्ये सर्जिकल स्ट्राईकची आक्रमक कारवाई करणारा सेनापती बिपीन रावत यांचा अपघाती मृत्यू देशाला व्याकूळ करणारा आहे.
भविष्यवेधी दूरदृष्टी असलेले, पोलादी, पारंपरिक कल्पना, प्रथा-परंपरांना धक्का देत नवनव्या योजनांचा अंगीकार करणारे उमदे, भारदस्त व्यक्तिमत्त्व असे जनरल रावत यांचे वर्णन करता येईल. ते 11 गोरखा रायफल्सच्या तोफखाना दलात 1978 मध्ये रुजू झाले आणि आपल्या चमकदार कर्तृत्वाने लष्करी सेवेची एक-एक पायरी चढत गेले. लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख, उपलष्करप्रमुख अशा जबाबदार्या पार पाडल्यानंतर ते 2016 मध्ये लष्करप्रमुख झाले. सेवेत त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ असलेले लेफ्टनंट जनरल परवीन बक्षी आणि पी. एम. हरिझ यांना डावलून त्यांना लष्करप्रमुख करण्यात आले ते त्यांच्या अतुलनीय गुणवत्तेमुळेच. देशाने आपल्यावर टाकलेला हा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला.
सिक्कीम-भूतान-तिबेटला लागून असलेल्या डोकलाम येथे 2017 मध्ये चिनी सैन्यासमोर आपले जवान 73 दिवस समर्थपणे उभे राहिले ते जनरल रावत यांच्या नेतृत्वाखालीच. त्यानंतर सीमेजवळ रस्ता तयार करण्याच्या चीनच्या प्रयत्नांना बिपीन रावत यांच्यामुळे अटकाव झाला. ती मोहीम सीमेवरील सिलिगुडीसारख्या लष्करीदृष्ट्या संवेदनशील ठिकाणासाठी महत्त्वपूर्ण होती. तिन्ही दलांत समन्वय असला पाहिजे आणि या तिन्ही दलांनी एकमेकांना पूरक अशी कामगिरी केली पाहिजे, असे मत गेली अनेक वर्षे मांडण्यात येत होते.
कारगिलमध्ये पाकिस्तानने 2001 मध्ये केलेल्या आगळिकीला आपण चोख प्रत्युत्तर देऊन कारगिल पुन्हा मुक्त केले खरे; पण त्याचवेळी या चर्चेने पुन्हा उचल खाल्ली आणि या तिन्ही दलांचे संयुक्त नेतृत्व उभे केले पाहिजे, असे मंत्र्यांच्या समितीने स्पष्ट केले; मात्र प्रत्यक्षात 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' म्हणजे तिन्ही दलांचे प्रमुख या पदी बिपीन रावत यांची नियुक्ती करण्यात आली, ती ते लष्करप्रमुख म्हणून निवृत्त झाल्यावर म्हणजेच डिसेंबर 2019 मध्ये. हे पद म्हणजे देशाच्या संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी असलेले पद होते. या पदाला रावत यांनी केवळ न्यायच दिला, असे नाही तर आपल्या प्रतिभेने, संरक्षण दलातील आपल्या प्रदीर्घ अनुभवाने, तंत्रज्ञानापासून लष्करी कूटनीतीच्या व्यासंगाने या पदाला वेगळाच आयाम दिला.
पारंपरिक, जुनाट पद्धती फेकून देण्याचा निर्भयपणा त्यांनी दाखवला. लष्कराची ताकद आता जवानांची संख्या वाढवून मजबूत करण्याचे दिवस गेले. यापुढील युद्धे पूर्वीच्या पद्धतीने खेळली जाणार नाहीत. अत्याधुनिक तंत्राचा अवलंब करायला हवा, असे ते म्हणत. त्यामुळेच जवानांची संख्या काही लाखांनी कमी करून तो खर्च आधुनिकीकरणाकडे वळवण्याचा विचार त्यांनी मांडला. लष्कर आणि हवाई दलाने एकत्रितरीत्या केलेला सर्जिकल स्ट्राईक यशस्वी झाल्याने नव्या पदाची उपयुक्तता त्यांनी सिद्ध केली. संरक्षण दलाचे आधुनिकीकरण म्हणजे केवळ अमेरिका, रशियाकडून आयती शस्त्रे-अस्त्रे विकत घेणे नव्हे,
तर देशांतर्गत उद्योगांच्या साथीने स्वदेशी तंत्रज्ञानाला चालना देणे, यावर त्यांनी भर दिला. पहिल्या टप्प्यातील देशी शस्त्रे-अस्त्रे सत्तर टक्क्यांपर्यंतच्या क्षमतेची झाली तरी चालतील, पुढच्या टप्प्यात आपण जागतिक तोडीचे तंत्रज्ञान आत्मसात करू; पण स्वदेशीवर भर दिला पाहिजे, असे मत मांडून त्याची अंमलबजावणीही केली. स्वदेशीची केवळ नारेबाजी करणार्यांचे अनुकरण केले नाही, तर तो विचार प्रत्यक्षात उतरवला. पाकिस्तान हा आपला शत्रू खरा; पण त्याला आपण कधीही नमवू शकतो, आपला खरा बलाढ्य शत्रू चीन आहे, हे ओळखून चीनच्या कुटिल कारवायांना जनरल रावत यांनी समर्थपणे तोंड दिले.
त्यामुळेच ड्रॅगनने कितीही फुत्कार सोडत कुटिल कारवाया केल्या, तरी त्या आतापर्यंत अयशस्वी ठरल्या. काही वेळा चीनला माघार घ्यावी लागली. भारताचे धोरण विस्तारवादी अन् इतर देशांची जमीन हडप करण्याची पिपासू असलेले नाही, तर आमच्या सीमेचेच रक्षण करणे, एवढेच आमचे उद्दिष्ट आहे, असे सांगत ते चीनला टोलाही मारत; मात्र हिंदी महासागरावर आमचेच प्रभुत्व असेल, असे सांगण्याचा कणखरपणाही ते दाखवत.
आगामी काळात देशाला आपली संरक्षण क्षमता वाढविण्याबरोबरच पाकिस्तान, चीनच्या कारवायांकडे लक्ष द्यावे लागणार आहेच, त्याचबरोबर तालिबानसारख्या अतिरेकी शक्तींचा शिरकाव आपल्या देशात होणार नाही, यासाठी डोळ्यांत तेल घालून सिद्ध राहावे लागणार आहे. तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख या पदाची जनरल रावत यांची मुदत आणखी दोन वर्षांची होती. त्यानंतर ते निवृत्त झाले असते, तरी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ देशाला होतच राहिला असता.
देशातील सर्वात सुरक्षित मानले गेलेले रशियन बनावटीचे हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले आणि आगीच्या ज्वाळांनी वेढले गेले. रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हा केवळ अपघात होता का, याची चौकशी करण्याचा निर्णय आता झाला आहे आणि त्याचे निष्कर्ष यथावकाश येतीलच; पण देशाने गमावलेला आपला लढवय्या सेनापती परत येणार नाही. या बहाद्दूर वीराला त्रिवार वंदन..!