हवामान बदलांचा ‘अवकाळी’ मारा!

हवामान बदलांचा ‘अवकाळी’ मारा!
Published on
Updated on

वाढते प्रदूषण, तापमानवाढी परिणाम म्हणून झालेले हवामान बदल (Climate change) आता तीव्र होत चालले आहेत. वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे शांत, सुंदर निसर्गातील अनिश्‍चितता वाढत असून त्याचा प्रकोप पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत एकापाठोपाठ एक नैसर्गिक संकटे आली. याचा सर्वाधिक फटका अन्‍नदात्या शेतकर्‍याला आणि सामान्य जनतेला बसत आहे.

हवामान बदलांमुळे (Climate change) ओढावणार्‍या नैसर्गिक आपत्तींनी जगभरातील लोकसंख्या बाधित होत आहे. महाराष्ट्रात गेल्या 8-15 दिवसांतील स्थिती पाहिल्यास राज्याच्या अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने वेगळेच संकट निर्माण केल्याचे दिसले. संकटे एकमेकांना हाकारे घालतच येतात, असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय राज्यातील जनतेला वारंवार अनुभवास येत आहे. सामान्यतः जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत पडणारा पाऊस शेतीसाठी चांगला, उपकारक मानला जातो; पण इतर वेळचा पाऊस शेतीसाठी मारक असल्याने त्याला अवेळी आलेला पाऊस म्हटले जाते.

आताच्या अवकाळी पावसास कारण म्हणजे, अंदमानच्या समुद्रात गेल्या आठवड्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला. राज्यात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. या दरम्यान जोरदार वारे वाहिले. साहजिकच, अशा प्रतिकूल वातावरणामुळे शेतपिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले. त्यामुळे या पावसाने शेतकरी अधिक संकटात सापडला.

वस्तुतः, गेले काही महिने सातत्याने पाऊस धुमाकूळ घालत आहे. त्यातून शेतकर्‍यांची उभी पिके नष्ट होत आहेत. अशा वेळी भाजीपाल्याच्या उत्पादनातून दैनंदिन अर्थचक्र चालू ठेवण्याचा शेतकर्‍यांचा प्रयत्न होता; पण त्यालाही अडथळा निर्माण झालेला पाहायला मिळतो. त्यात केळी, पपईसह द्राक्षबागा, कांद्याच्या पिकांचे नुकसान झाले. या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. आंबा पिकाचेही मोठे नुकसान होत आहे. (Climate change)

साधारणपणे गेल्या दोन-तीन महिन्यांचा आढावा घेतला, तर आजपर्यंत विदर्भापासून कोकणापर्यंत किंवा खानदेशापासून पश्‍चिम महाराष्ट्रापर्यंत नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने अतिवृष्टी, महापूर, वादळ याचेच प्रमाण जास्त राहिले आहे. ज्या काळामध्ये अशा मोठ्या पावसाची किंवा वादळ, वार्‍याची शक्यता नसते त्या काळात ही संकटे एखाद्या आक्रमणाप्रमाणे चालून आली.

त्यातून आता बचाव करण्याची शेतकर्‍याकडे किंवा सामान्य माणसाकडे कोणतीच सिद्धता नसते. नुकसान होण्याचीच जास्त शक्यता असते आणि तसाच अनुभव सध्या येत आहे. कोकणातल्या निसर्ग वादळापासून सुरू झालेेेले हे थैमान अजूनही चालूच आहे. अलीकडे काही वर्षांपासून अनपेक्षितपणे या सर्व प्रकारच्या आपत्ती या रौद्ररूप धारण करताना दिसताहेत आणि त्याचा सर्वाधिक फटका शेतकरी, शेतमजूर, सामान्य माणसाला बसत आहे.

अशा प्रकारच्या अडचणींच्या काळात नियोजन किंवा व्यवस्थापन या गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे. योग्य वेळी, योग्य ठिकाणी आहे त्याच व्यवस्था उपलब्ध दाखवणे किंवा करून देणे म्हणजेच व्यवस्थापन असते. आतादेखील नुकसानग्रस्त शेतकर्‍याला तातडीने मदत मिळाली, तर निश्‍चितच एकाच वेळी शेतकरी आणि सामान्य माणसाला त्याचा लाभ मिळू शकेल.

यंदाचे वर्ष संकटांचेच वर्ष आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. सर्वांत चिंतेची बाब म्हणजे जगातल्या काही प्रतिष्ठित हवामान संस्थांनी पुढचे सहा-आठ महिने अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हा संपूर्ण इशारा लक्षात घेऊन सरकारी यंत्रणांनी योग्य ते नियोजन करण्याची अत्यंत आवश्यता आहे.

पडलेले बाजारभाव आणि अचानकपणे बदलणारे हवामान या दुहेरी संकटात शेतकरी सापडला असतानाच या पावसाने महागाईचा नवा रट्टा सामान्य माणसाच्या डोक्यात हाणला आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, धान्ये, सीएनजी, घरगुती आणि व्यावसायिक गॅस, मोबाईल सेवा आदी सर्वांच्याच किमती प्रचंड वाढल्या आहेत.

कोरोनाच्या घुसमटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न सामान्य माणूस करत आहे. कोट्यवधीच्या संख्येने लोकांचा रोजगार बुडाला असून विस्कटलेली सगळी घडी पूर्ववत करण्याचा कठोर प्रयत्न सामान्य माणूस करत आहे. अशातच त्याला अवकाळी पाऊस, कोरोना, तसेच महागाईचा हा भडका सहन करावा लागत आहे.

अनेक प्रकारच्या चक्रीवादळांनी महाराष्ट्रातली निम्म्याहून अधिक शेतीव्यवस्थेला तडाखा दिला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकणचा बराचसा भाग पावसाच्या हाहाकारामध्ये अक्षरक्ष: धुवून निघाला आहे. चक्रीवादळाने आणि अवकाळीने माणसांचेच नव्हे, तर पशुपक्ष्यांचेही बळी घेतले आहेत.

या संपूर्ण नुकसानीचे आकडे हे संकटाची भयानकता अधिक ठळकपणाने दाखवतील. परंतु, मदतीच्या आकड्यांनीदेखील तेवढीच मानवता आणि उदारता दाखवली पाहिजे. केवळ वेधशाळांचा इशारा पुरेसा ठरणार नसून त्यावर उपाययोजनांचा उतारादेखील तयार ठेवावा लागेल.

गेल्या 10-12 वर्षांत महाराष्ट्रातल्या विविध स्वरूपांच्या नैसर्गिक आपत्तींचा गंभीरपणे अभ्यास होणे आवश्यक आहे. कोणत्या प्रकारच्या आपत्ती वारंवार येत आहेत, याचे स्वरूप काय आहे, दरवर्षी त्याच त्याच पद्धतीने संकटे का येत आहेत, यामागची कारणे निश्‍चितपणे सापडू शकतात. संकटानंतर मदत तर द्यावी लागतेच.

परंतु, संकटापूर्वी काही पूर्वतयारी करता येईल का, याचादेखील आता अधिक गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा पूर्वअंदाज यायला अजून काही दिवस जातील; परंतु त्या सरकारी आकडेवारीपेक्षा तातडीची आवश्यक ती मदत म्हणून शेतकरी आणि अन्य घटकांना दिलासा देण्याची गरज आहे. अवकाळी पाऊस, वादळे, महापुरासारखी संकटे सांगून येत नाहीत, हे जरी खरे असले, तरी संकटानंतरची मदत ही सांगून व्यवस्थितपणे करता येऊ शकते.

याचा विचार करता त्या-त्या विभागात, जिल्ह्यात सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देऊन सर्वच अवकाळग्रस्त शेतकर्‍यांना ते लागू झाले पाहिजेत. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर कधीही राजकारण होता कामा नये. कर्जमाफी, विमा योजना या सर्व माध्यमांतून शेतकर्‍यांना तातडीने नुकसानभरपाई मिळाल्यास आजपर्यंत विविध संकटांनी मोडकळीस आलेला अन्‍नदाता त्याचा संसार सावरू शकेल. या अस्मानी संकटाचा विचार करता फक्‍त कागदी घोडे न नाचविता प्रशासनाने लोकहिताला प्राधान्य देऊन आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले पाहिजे.

– मोहन मते

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news