Vaccine Certificate : लसपुराण
मंगल कार्यालयाच्या आवारात वर्हाडी मंडळींची धामधूम सुरू होती. सनईच्या सुरांनी वातावरण मंगलमय झाले होते. प्रवेशद्वाराजवळ भरजरी वस्त्रे घातलेल्या स्त्री-पुरुषांचा घोळका अंतर राखून उभा होता. सेवक येणार्या प्रत्येकाचे तापमान मोजत होते. लस घेतल्याचे सर्टिफिकेट (Vaccine Certificate) दाखवा, तरच प्रवेश मिळेल, असं ती मंडळी सांगत होती. त्यावर 'आम्ही मुलाकडचे आहोत.
ही काय बोलण्याची पद्धत आहे का?' वगैरे गोष्टी त्यांना सुनावल्या जात होत्या. साहेब, माफ करा. नियम म्हणजे नियम. आमच्याशी वाद घालू नका, असे सेवक म्हणाले. त्यावर तू कुणाशी बोलतो आहेस, ते माहीत आहे का? मी सेनेचा कार्यकर्ता आहे. सेवक शांतपणे म्हणाले, 'तुमचे साहेब इतके शांत. तुम्ही का इतका गोंधळ करताय?' त्यावर तो कार्यकर्ता चपापला.
तेवढ्यात भरपूर दागिने घातलेल्या एक वयस्कर बाई गर्दीतून आत शिरू लागल्या. त्यांना अडवत सेवक म्हणाला, 'बाई, टेंपरेचर घेतल्याशिवाय आणि सर्टिफिकेट दाखविल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही.' त्यावर रागाने त्या म्हणाल्या, 'असा अपमान करायचा होता तर लग्नाला बोलवायचं कशाला?' लवकर रिक्षा मिळाली नाही म्हणून मी चालत आले आहे. त्यामुळे अगोदरच चिडले आहे. त्यात इथे वेटिंग करून माझा पारा चढला आहे. (Vaccine Certificate)
त्यामुळे माझं टेंपरेचर नॉर्मल असणारच नाही. ते मोजून काही फायदा होणार नाही. सोडा मला आत. मी नवर्या मुलाची मावशी आहे. एरव्ही मुलांकडच्या माणसांचा किती मान ठेवला जातो. इथेतर एंट्रीपासूनच अपमान करायला सुरुवात झालेली आहे, तरी पोरांना सांगत होते, अॅरेंज्ड मॅरेज करा; पण कुठं ऐकताहेत! लव्ह मॅरेज केलं की, ही किंमत करतात मुलीकडचे लोक वरपक्षाची.
तुम्ही जर मला आत सोडलं नाही, तर मी इथंच रुसून बसणार आहे.' त्यावर हसत सेवक म्हणाला, 'बाई, आमचा वेळ घेऊ नका. ज्यांच्याकडे सर्टिफिकेट नाही त्यांना मोकळ्या मैदानावर स्क्रीन लावून लग्न सोहळा दाखविण्याची व्यवस्था केलेली आहे. तिथूनच आशीर्वाद द्या. रुसणार्या लोकांचीही तिथंच व्यवस्था केलेली आहे.' त्यावर चिडत त्या बाई म्हणाल्या, 'अरे, तुझ्या आईच्या वयाची आहे मी. माझ्या जागी तुझी आई असती, तर तू तिला असंच ताटकळत ठेवलं असतं का?' त्यावर तो म्हणाला, 'मी स्वतः माझ्या आईला लसीचे दोन डोस देऊन आणले आहे. डोस घेतल्यापासून बारा लग्नांत जेवण करून आलेली आहे म्हातारी. तुम्ही माझ्याशी वाद घालण्यापेक्षा लस घेतल्याचं सर्टिफिकेट दाखवावं की!' बाई रागाने म्हणाल्या, 'सर्टिफिकेट काय दागिना आहे का? गळ्यात घालून गावभर मिरवायला. मी दुसर्या गावाहून लग्नासाठी आले आहे इथे.
पत्रिकेत सर्टिफिकेट आणा, असं कुठं लिहिलं होतं? मी मोबाईलही वापरत नाही, मग कसं दाखवायचं तुला सर्टिफिकेट?' सेवक म्हणाला, 'बाई, तुम्ही बाजूला उभ्या राहा. लोक खोळंबले आहेत. तुमची केस आपण नंतर बघू.' बाई रागाने म्हणाल्या, 'आम्हाला हे नियम लावताय. नवरा-नवरीला हे नियम लावणार का? त्यांनी लस घेतली नसेल, तर त्यांनाही अडवणार का?' हसत हळू आवाजात सेवक म्हणाला, 'कुणालाही सांगू नका; पण नवर्या मुलीनेच लस घेतलेली नाही. तिलाही घरी पाठवलंय. बघूया आता काय होतंय ते.'
बाई आवासून बघतच राहिल्या.

