Drone force : ड्रोन फोर्स होणार सशक्त | पुढारी

Drone force : ड्रोन फोर्स होणार सशक्त

ड्रोनचा (Drone force) वापर केवळ टेहळणीसाठी न करता हल्ल्यांसाठी करण्याचा प्रयत्न भारताकडून अनेक वर्षांपासून सुरू आहे. अलीकडच्या काळात भारताने अमेरिका आणि इस्रायलशी करार केले. त्यावरून भारत मानवरहित विमानांच्या माध्यमातून शत्रूच्या तळांना नेस्तनाबूत करण्याची ताकद कमावत आहे, असे संकेत मिळतात.

चीन आणि पाकिस्तान या दोन शेजारी देशांबरोबर असलेल्या संबंधांमधील तणाव वाढलेला असतानाच भारत देशांतर्गत संशोधन आणि परदेशी खरेदी या दोन्ही मार्गांनी सुधारित ड्रोन तंत्रज्ञान प्राप्त करून आपली लष्करी ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. या क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे दर्शन भारताच्या संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) 17 नोव्हेंबर रोजी ड्रोन स्वार्मच्या उड्डाणाद्वारे घडविले. या ताफ्यात 25 ड्रोन होते आणि ते एकाच वेळी उडत होते.

या ड्रोन स्वार्मने अनेक परिस्थितींमधील ताकदीचे दर्शन घडविले. उदाहरणार्थ, एखाद्या लक्ष्याला घेरणे, पूर्वनियोजित हल्ला करणे आदी. भारतात ड्रोनचे असे पहिले प्रदर्शन जानेवारी महिन्यात भारतीय वायुसेनेने केले होते. त्यावेळी 75 स्वदेशी ड्रोन एकाच वेळी उडविण्यात आले होते. यावेळीही ड्रोननी चित्तथरारक मोहिमांची प्रात्यक्षिके दाखविली होती आणि त्यात आक्रमक मोहिमांचाही समावेश होता.

संबंधित बातम्या

भारतात स्थानिक पातळीवर अनेक ड्रोन प्लॅटफॉर्म आहेत. विकास आणि वापराच्या विविध टप्प्यांवर हे प्लॅटफॉर्म आहेत. एका अहवालानुसार, यात भविष्यातील सर्वांत उत्कृष्ट ड्रोन एक बॉम्बवर्षाव करणारे विमान असेल आणि ते अत्यंत घातक असेल, असे सांगितले जाते. अहवालानुसार, भविष्यातील ड्रोन फोर्सचा आधार ठरू शकणार्‍या या ड्रोन विमानाची टॅक्सी ट्रायल सुरू झाली आहे. सध्या हा प्रकल्प प्रारंभिक टप्प्यात आहे. (Drone force)

परंतु, तो यशस्वी झाल्यास एका घातक लढाऊ विमानाच्या तोडीस तोड असे हे ड्रोन असेल आणि ते बॉम्बव्यतिरिक्त गाइडेड क्षेपणास्त्रेही डागण्यास सक्षम असेल. हे ड्रोन अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी युक्त असेल. भारत आपली आक्रमण क्षमता वाढविण्यासाठी ड्रोन मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. टेहळणी ड्रोनचा वापर भारतीय लष्कर अनेक वर्षांपासून करीत आहे. भारताच्या ड्रोन सेनेतील बहुतांश ड्रोन इस्रायलमध्ये तयार झालेले आहेत.

वस्तुतः अलीकडच्या काळात ज्या प्रकारे भारताने अमेरिका आणि इस्रायलसारख्या देशांशी जे करार केले आहेत, त्यावरून भारत मानवरहित विमानांच्या माध्यमातून शत्रूच्या तळांना नेस्तनाबूत करण्याची ताकद कमावत आहे, असे संकेत मिळतात. गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात सुरक्षेची जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे ही गरजही बनली आहे.

ड्रोनचा वापर केवळ टेहळणीसाठी न करता हल्ल्यांसाठी करण्याचा प्रयत्न भारताकडून अनेक वर्षांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी अजरबैजान-अर्मेनिया यांच्यात झालेल्या युद्धातून धडा घेऊन भारताला असलेली ही गरज अधिक अधोरेखित झाली आहे. जगभरातील सुरक्षाविषयक आणि लष्करी तज्ज्ञ असे मानतात की, युद्धात अजरबैजानच्या निर्णायक विजयात ड्रोनने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अजरबैजानच्या ताफ्यातील बहुतांश ड्रोन विमाने तुर्की आणि इस्रायलमध्ये तयार झालेली होती. (Drone force)

भारत आपल्या टेहळणीविषयक कामांसाठी इस्रायलमधील ड्रोनचा वापर आधीपासूनच करीत आहे. यावर्षी ऑगस्टमध्ये डीसीएम श्रीराम इंडस्ट्रीज या भारतीय कंपनीने जायरॉन डायनॅमिक्स या तुर्कीतील ड्रोन उत्पादक कंपनीमधील 30 टक्के भागीदारी खरेदी केली आहे.

इस्रायलने तयार केलेल्या हेरॉन या टेहळणी ड्रोनवर शस्त्रास्त्रे तैनात करण्याची प्रक्रियाही भारताने सुरू केली आहे. सुमारे चाळीस कोटी डॉलर किमतीच्या या प्रकल्पांतर्गत भारतासोबत इस्रायल या ड्रोनवर लेसर गाइडेड बॉम्ब आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे तैनात करणार आहे. याखेरीज रणगाडारोधी गाईडेड क्षेपणास्त्रेही त्यावर बसविण्यात येतील.

गेल्या काही वर्षांत भारत सरकारने अमेरिकेच्या प्रीडेटर आणि रीपन ड्रोनच्या धर्तीवर आक्रमक, हल्ला करणार्‍या ड्रोनची फौज तैनात करण्याचे प्रयत्न गतिमान केले आहेत. याच प्रयत्नांतर्गत भारत अमेरिकेकडून एमक्यू-9 रिपन ड्रोनचे 20 स्काय गार्डियन आणि 10 सी गार्डियन व्हर्जन मिळविण्याच्या तयारीत आहे. तीन अब्ज डॉलरच्या अंदाजित किमतीवर अमेरिका हे ड्रोन भारताला उपलब्ध करून देईल, असे मानले जाते. यावर्षी डिसेंबरमध्ये ड्रोनची ही ऑर्डर भारताकडून दिली जाण्याची शक्यता
आहे.

– जयदीप नार्वेकर

Back to top button