तडका : नियम भंग अन् कारवाई

तडका : नियम भंग अन् कारवाई

सरकारी काम कधी होईल, हे कुणीही सांगू शकत नाही. पोलिस सर्वत्र आपले अस्तित्व दाखवत असतात. समजा, तुम्ही रस्त्याने चारचाकी वाहन चालवत आहात आणि चौकात किंवा बाजूला पोलिस उभा आहे, तर कारण नसताना तुमची नजर कावरी बावरी होते. तुमच्याकडे सर्व कागदपत्रे असतात, सर्व काही रीतसर, कायदेशीर असते, तरीही पोलिस दिसला की, घाबरतो हे कटू असले, तरी वास्तव सत्य आहे. समजा, तुम्ही कार चालवत आहात आणि रस्त्यामध्ये एखादा पोलिस उभा आहे, तर काय प्रसंग घडू शकतो, याची कल्पना करा. तुम्ही सीट बेल्ट लावलेला आहे, तुमच्याकडे गाडीची सर्व कागदपत्रे आहेत, खिडकीला काळ्या रंगाची फिल्म नाही, त्यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने पोलिसाला सामोरे जाण्याची मानसिकता ठेवून असता. लांबूनच काचेमधून दिसणारा तुमचा कावरा बावरा चेहरा पाहून ट्राफिक हवालदार गाडी बाजूला घेण्याची खूण करतो आणि पोलिस आणि नागरिक यांचा सामना सुरू होतो.

गाडीची कागदपत्रे दाखवा, विमा आहे का, परवाना आहे का, असे ते सुरुवातीला विचारतील. तुम्ही तत्परतेने ही सर्व कागदपत्रे दाखवल्यानंतर तुम्ही सिग्नल तोडला आहे, असे तुम्हाला सांगतील. तुम्ही घसा कोरडा पडेपर्यंत जरी हवालदारसाहेबांना समजावून सांगितले, तरी ते तुमचे म्हणणे मान्य करतीलच असे नाही. तुमचे असे म्हणणे असते की, मी चौक क्रॉस करत होतो, तेव्हा हिरवा दिवा विझला आणि पिवळा दिवा लागला आणि तेवढ्या वेळात मी चौक पार केला. एकदा का दिवा हिरव्याचा पिवळा झाला आणि तुम्ही पुढे आला असाल तर तुमचा नाइलाज असतो, कारण रस्त्यात थांबता येत नाही. इथे हवालदारसाहेब सांगतात, की तुम्ही पिवळा दिवा दिसल्यानंतरही रस्ता क्रॉस केलात आणि लाल दिवा असताना तुम्ही रेंगाळत चौकात होता. त्यामुळे तुम्ही नियमाचा भंग केला आहे, त्यामुळे तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

दोन-चारशे रुपये दंड असेल तर तो तुम्ही मान्य करता; परंतु तुम्हाला सांगितला गेलेला दंड हा पाच हजार रुपये असतो. बाजूला घेतलेल्या गाडीतून तुम्ही खाली उतरता आणि हवालदारसाहेबांना बाजूला येण्याची विनंती करता. खरे तर कोपर्‍यात बोलावून साहेबांनी तुम्हाला कोपर्‍यात घेतलेले असते. तुमचा इशारा त्यांना समजतो आणि काही एक चर्चा होऊन प्रश्न सुटतो. चौकाचौकांत प्रकरणे मिटवणार्‍या हवालदार मंडळींवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्याच खात्यातील इतर बंधूंची पथके तयार केली आहेत.

रहदारीला शिस्त लावण्याचा प्रयत्न न करता चौकात उभे राहणार्‍या ट्रॅफिक बंधूंवर लक्ष ठेवण्यासाठी एक पोलिसांचेच पथक असेल. आणि पथकामधील आणि चौकातील बंधू-बंधूंमध्ये हातमिळवणी होऊ नये, यासाठी सामान्य नागरिक सोबत असतील ही संकल्पना ज्या कुणाच्या डोक्यात आली असेल त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. पोलिसांसोबत सहकार्याची भावना ठेवून आपला वेळ देऊन सर्वांवर लक्ष ठेवण्याचे काम करणार्‍या नागरिकांचे पण कौतुक केले पाहिजे. लक्ष ठेवणारे पथकातील पोलिस आणि चौकाचौकांत उभे असलेले पोलिस हे सगळे मिळून एका कोपर्‍यात जाऊन काही हातमिळवणी करण्याची शक्यता निर्माण झाली तर त्यांच्यावर लक्ष ठेवणारे नागरिक आहेतच.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news