सहकाराचे जाळे विस्तारणार

सहकाराचे जाळे विस्तारणार

मुरलीधर मोहोळ पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सहकार आणि विमान वाहतूक विभागाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी त्यांना मिळाली. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्यासोबत काम करण्याची संधी, आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी, केंद्रीय मंत्री म्हणून पुणे, महाराष्ट्र आणि देशासाठी काम करताना त्यांचे काय व्हिजन आहे, या संदर्भात त्यांनी दैनिक 'पुढारी'शी सविस्तर संवाद साधला. 'पुढारी'चे नवी दिल्ली प्रतिनिधी प्रशांत वाघाये यांनी घेतलेली विशेष मुलाखत.

प्रश्न : पुण्याच्या खासदाराला तीन दशकांहून अधिक काळानंतर मंत्रिपद मिळाले, केंद्रीय मंत्रिपद, त्यातही सहकार आणि नागरी उड्डाण अशी खाती अपेक्षित होती का?

उत्तर : मुळात मी मंत्री होणार हेच अनपेक्षित होते, त्यामुळे खाती कुठली मिळणार, हा प्रश्नच नव्हता. एक कार्यकर्ता म्हणून आजवर जी-जी जबाबदारी मिळत गेली. त्याला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. यात नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर यासोबतच पक्षाचा पश्चिम महाराष्ट्राचा प्रभारी आणि राज्याचा सरचिटणीस म्हणून जबाबदारी मिळाली.

प्रश्न : पुण्याचे महापौर होता, नेमका तेव्हा कोरोना काळ होता. त्या परिस्थितीत शहर हाताळले, महापौर परिषदेत देशपातळीवर काम केले, हे काम मंत्रिपद मिळवून देण्यात उपयोगी ठरले?

उत्तर : कोरोना काळात शहराचा प्रथम नागरिक म्हणून, कुटुंबप्रमुख म्हणून काम केले. पुणे शहरातील प्रत्येकाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणे, ही मोठी जबाबदारी होती. तसेच महापौर परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. मी महापौर असताना नगरविकास मंत्रालयाद्वारे महापौर परिषदेचा एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत आणि देशातील सर्व महापौरांसमोर देशातील केवळ दोन महापौरांना बोलण्याची संधी मिळाली, त्यापैकी मी एक होतो.

प्रश्न : सहकारमंत्री अमित शहा यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. याचा फायदा तुम्ही महाराष्ट्रासाठी कसा करून घ्याल?

उत्तर : महाराष्ट्रात सहकाराचे मोठे जाळे आहे. देशात सहकार क्षेत्रात जेवढ्या संस्था आहेत, त्यांपैकी सुमारे 25 टक्के संस्था एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे या क्षेत्रात महाराष्ट्रात आणि देशात समाजातील शेवटच्या माणसापर्यंत काम करायला खूप वाव आहे. विशेष म्हणजे अमित शहा यांच्या मार्गदर्शनात काम करण्याची मला संधी आहे. मी त्यांना आदर्श म्हणून बघत आलो. त्यांना भेटणे म्हणजे एक पर्वणी असायची. आता मला त्यांच्यासोबत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळणार आहे. मी स्वतःला यासाठी भाग्यवान समजतो. यातून मला खूप शिकायला मिळणार आहे. सहकारातून समृद्धीकडे हा एक मंत्र आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील शेतकरी, ऊसतोड कामगार, साखर कारखाने, दुग्ध उद्योग या सर्व गोष्टींसह सहकार क्षेत्रात येणार्‍या सर्व ठिकाणी काम करण्याची ही खूप मोठी संधी आहे. त्यानुसार सहकाराच्या माध्यमातून देशहिताच्या, शेतकर्‍यांच्या आणि समाजातील शेवटच्या माणसाच्या अपेक्षांचा विचार करून त्या पूर्ण करण्याचे काम करायचे आहे.

प्रश्न : पश्चिम महाराष्ट्रात सहकाराचे मोठे जाळे आहे. तुम्हाला या खात्याचे राज्यमंत्री म्हणून निवडले असे वाटते का?

उत्तर : मला असा कुठला अँगल वाटत नाही; कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, एकदा तुम्ही निवडून आलात की, तुम्ही सर्वांचे होतात. त्यामुळे देशाचे सरकार देशातील प्रत्येक नागरिकासाठी आहे. त्यातल्याच सहकार व नागरी विमान वाहतूक या दोन खात्यांचा राज्यमंत्री म्हणून मी काम करणार आहे. महाराष्ट्र सहकाराच्या माध्यमातून समृद्ध करायचा आहे आणि त्यासाठी मला काय योगदान देता येईल, जास्तीत जास्त काम कसे करता येईल, हा विचार मी करत आहे. सहकाराचे जाळे मजबूत करायचे आहे आणि सहकारी संस्था केवळ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत असे नाही. भाजपच्याही राज्यांत गावपातळीपासून जिल्हा बँकेपर्यंत अनेक सहकारी संस्था आहेत. आमच्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी सहकारात प्रचंड मोठे काम केले आहे आणि आम्ही सरकार म्हणून काम करणार आहोत. देशातील प्रत्येक माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे आमचे सरकार म्हणून कर्तव्य आहे.

प्रश्न : पुण्याच्या विमानतळाचा प्रश्न गेली काही वर्षे प्रलंबित आहे, पुरंदरमध्ये नव्या विमानतळाचा विषय आहे. तुमच्या माध्यमातून या दोन्ही गोष्टी पूर्ण होतील का?

उत्तर: अर्थातच! केंद्र सरकार म्हणून आम्ही देशासाठी काम करणार आहोत; मात्र आपण जिथून येतो, तिथे प्रकर्षाने लक्ष घालावे लागेल.

पुणे, नवी मुंबई, पुरंदरच्या विमानतळांच्या संदर्भात कामाला गती देणे, जमीन अधिग्रहण करणे, तांत्रिक अडचणींवर तोडगा काढणे यासह राज्य सरकारशी समन्वय साधून हे विषय तातडीने मार्गी लावायचे आहेत, यावर मला खूप काम करायचे आहे.

प्रश्न : येणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुमची तयारी कशी असेल?

उत्तर : विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू झाली आहे. पक्षाच्या राज्यस्तरीय बैठका सुरू झाल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात प्रभारी म्हणून आधीपासूनच मी संघटनेत काम करतोय. 58 विधानसभांची संघटनेची जबाबदारी माझ्यावर आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news