ओमायक्रॉन : सावध व्हा !

ओमायक्रॉन : सावध व्हा !
Published on
Updated on

ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या अवताराबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पण दक्षता घ्यावी, असे सरकारने केलेले आवाहन रास्त, योग्य असे असले आणि नागरिकांनी बेफिकिरी बाळगणे चुकीचे ठरेल, हे म्हणणेही वस्तुस्थितीला धरून असले, तरी अतिरेकी निर्बंधांचे पाऊल न उचलण्याची जबाबदारीही सरकारची आहे, हे कुणीतरी स्पष्टपणाने सांगावे लागणार आहे. आफ्रिकेत ओमायक्रॉन विषाणूचा पहिला रुग्ण दोन डिसेंबरला सापडल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच आपल्या देशातही त्या विषाणूचे अस्तित्व आढळून आले आणि सोमवारपर्यंत देशातील ही रुग्णसंख्या 21 वर गेली.

ओमायक्रॉनची लागण झालेल्या देशांतून आलेल्या प्रवाशांबाबत खबरदारी घेऊनही भारतात तो पोहोचला आणि त्याची जबरदस्त संक्रमणशीलता लक्षात घेता तो आणखी पसरण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होते आहे. ही संक्रमणशीलता देशात तिसरी लाट आणण्याइतपत असण्याची शक्यताही वर्तविण्यात येते. या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून आणि सरकारकडूनही विवेकी वागणुकीची अपेक्षा आहे. तितकीच ओमायक्रॉनमुळे घाबरून जाऊ नये, या आवाहनामागची कारणमीमांसा नागरिकांनी समजावून घेणे गरजेचे.

एकतर कोरोनाची लागण 2019 च्या अखेरीस चीनमधील वुहानमध्ये झाल्यापासून त्या विषाणूमध्ये अनेक बदल, म्हणजेच शास्त्रीय भाषेत म्युटेशन झाले. कोरोनाचे अल्फा, बीटा, गामा, डेल्टा आदी प्रकार झाल्यानंतर आता ओमायक्रॉन हा नवा अवतार आला. दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम हा विषाणू आढळून आला. तो फारसा घातक नसला तरी प्रचंड संक्रमक असल्याचे लक्षात आले. कोरोनाच्या इतर प्रकारांपेक्षा ओमायक्रॉनची संसर्गक्षमता पाचशे पटींनी अधिक आहे.

त्यामुळेच आफ्रिकेतील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आणि तो जगभर पसरण्याची चिन्हे दिसू लागली. हा संसर्ग झालेल्या व्यक्तीजवळ काही मिनिटे राहिले तरी दुसरी व्यक्ती बाधित होते, एवढी मोठी संक्रमणक्षमता असल्याने कितीही काळजी घेतली तरी तो जगभर पसरणार, असा अंदाज बांधण्यात आला.

त्यानुसार तो अल्पावधीत 38 वर देशांत पोहोचलाही. आपल्या देशातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या आतापर्यंत 21 वर गेली आहे. असे असले तरी त्यामुळेे अद्याप एकही मृत्यू झालेला नाही, एवढेच नव्हे तर त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याचीही आवश्यकता भासलेली नाही. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, या दाव्याला पुष्टी मिळते.

सर्वात महत्त्वाची गोष्ट सर्वांना ध्यानात घ्यावी लागेल आणि ती म्हणजे कोरोनाचे अस्तित्व या पृथ्वीवर प्रदीर्घ काळ राहणार आहे. माणसाला त्याच्यासोबतच जगावे लागणार आहे, हे कोरोनाचा पहिला अवतार आला तेव्हाच स्पष्ट झाले होते. कोरोनाच्या रचनेमध्ये सातत्याने बदल होत राहणार, हेही त्यावेळी लक्षात आले होते.

आपल्याला त्याच्यावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे आणि तो पूर्णत: नियंत्रणाखाली येण्यासाठी काही काळही जावा लागणार आहे. कोरोना प्रतिबंधासाठी लसनिर्मिती, प्रभावी औषध शोधणे, मास्क-शारीरिक अंतर आदी उपायांची गरज स्पष्ट झाली. त्यापैकी लसनिर्मितीला सुरुवात झाली. कोव्हिशिल्ड, कोव्हॅॅक्सिन तसेच फायझर, मॉडर्ना आदी लसी या प्राथमिक लसी आहेत. कोरोनाला तातडीने प्रतिबंध घालण्यासाठी कमी काळात त्या तयार केलेल्या आहेत. त्यांच्यामुळे कोरोना होण्यापासून बचाव होणार नाही.

मात्र, कोरोना झाल्यावर त्यापासून जीवितहानी होणार नाही. संपूर्ण संरक्षण देणार्‍या लसी यापुढील काळात येऊ शकतील. परंतु; त्याला अद्याप काही काळ जावा लागेल. त्यामुळे डेल्टा किंवा ओमायक्रॉन मुळे संसर्ग होणारच आहे, हेही लक्षात घ्यावे लागेल. म्हणूनच कोरोनाचा संसर्ग झाला किंवा अशा संसर्गग्रस्तांची संख्या कमीअधिक झाली, म्हणजे जगबुडी झाली असे समजून अतिरेकी पावले टाकण्यापासून दूर राहिले पाहिजे. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये लॉकडाऊनचा उपाय योजण्यात आला.

लसच नसल्याने त्यावेळी तो योग्यही होता. मात्र, कोरोना विविध अवतारांनी प्रकट होत जात असताना अवाजवी कडक निर्बंध लादण्याचा उपाय चुकीचा ठरेल. अशा निर्बंधांमुळे जनजीवन विस्कळीत होईलच; पण त्याचबरोबर अर्थव्यवस्थेचेही पुन्हा कंबरडे मोडण्याची मोठी भीती आहे. त्यामुळे योग्य त्या उपायांचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे. त्यात लसीकरणाचे उद्दिष्ट शंभर टक्के गाठण्याचा उपाय सर्वात प्रभावी ठरेल.

आपल्या देशात 16 जानेवारीला लसीकरणाला सुरुवात झाली आणि आतापर्यंत दोन्ही डोसची एकत्रित संख्या 127.61 कोटींवर पोहोचली आहे. त्यातील पहिला डोस 84.8 टक्के नागरिकांना देण्यात आला असून, निम्म्या नागरिकांना दोन्ही डोस देण्यात यश मिळाले आहे. हा एक महत्त्वाचा मैलाचा दगड आपण पार केला असला तरी सर्वच नागरिकांना दोन्ही डोस देण्याचे उद्दिष्टही अल्पावधीत पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे लागेल. तसेच 12 ते 17 वयोगटातील मुलांना लस देण्याचा कार्यक्रमही आखण्यात आला असून, तोही गतीने पूर्ण करावा लागेल.

तसे झाल्यास कोरोनाचा मृत्यूदर अपेक्षेएवढा म्हणजे 0.01 पर्यंत कमी करण्यात यश येऊ शकेल. कोरोनाची ही घातकता नष्ट केल्यासच आपण या विषाणूवर नियंत्रण आणण्यात यश मिळवले, असे म्हणता येईल. तोपर्यंतच्या काळात संशोधकांना प्रभावी औषध शोधण्याच्या प्रयत्नांना यश आल्यास अवघी मानवजातच निःश्वास सोडेल.

मात्र, तोपर्यंत कोरोनाच्या नवनव्या अवतारांनाही धैर्याने सामोरे जाण्याची तयारी आणि मानसिकता निर्माण करावी लागेल. दुखण्यापेक्षा इलाज गंभीर आणि सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारा, हा अनुभव पहिल्या आणि दुसर्‍या लाटेने दिला. आता पुन्हा ओमायक्रॉनच्या निमित्ताने भीतीचे डोंगर उभे करण्याचा आणि लोकांच्या मानसिक खच्चीकरणाचे प्रयत्न होतील. ते वेळीच ओळखून जनजीवनाला धक्का लागू न देता धीरोदात्तपणाने त्याचा सामना करण्यातच शहाणपण. अर्थात, सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news